शहाद्यात नगरसेवकाचा खून

0
शहादा। ता.प्र.- येथील गरीब नवाज कॉलनीत आज दुपारी दीड वाजेच्या सुमारास पालिकेतर्फे टँकरने पाणीपुरवठा करण्यात येत असतांना पाणी भरण्यावरून माजी नगरसेवक व विद्यमान नगरसेविकांच्या मुलांमध्ये बाचाबाची झाली. या बाचाबाचीचे रुपांतर हाणामारीत झाले. यात एक जण जखमी झाला.
या जखमी व्यक्तीला पाहण्यासाठी पालिकेचे विद्यमान बांधकाम सभापती सद्दाम सलिम तेली हे रूग्णालयात गेले असता त्यांच्या पाठीमागून येवून एकाने धारदार तलवारीने वार केला. त्यात ते मयत झाले आहेत.
त्यानंतर संतप्त समाजबांधवांनी दगडफेक करुन, दुकाने, वाहनांची जाळपोळ सुरु केली. यात चार पोलीसांची वाहने, दोन वाहने, दोन मोटरसायकली, तीन दुकानांचे नुकसान झाले आहे.
या घटनेमुळे शहादा शहरात तणावाचे वातावरण निर्माण झाले असून पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. या घटनेतील दोषीच्या अनेक प्रतिष्ठानांना जाळण्याचा प्रयत्न सुरु होता.
दरम्यान, रात्री साडेनऊच्या सुमारास पुन्हा झालेल्या दगडफेकीत पोलीस उपअधीक्षक, पोलीस उपनिरीक्षकासह दोन पोलीस जखमी झाले आहेत.

शहरात पाणी टंचाई असल्याने पालिकेतर्फे टँकरने पाणी पुरवठा सुरु आहे. शहरातील गरीब नवाजमधील सैय्यद मुजफ्फरअली सैय्यद लियाकत अली हा विद्यमान नगरसेविका सैय्यद सायराबी लियाकत अली यांचा मुलगा आहे.

तो टँकरने पाणीपुरवठा करण्याचे काम करतो. आज दि.14 रोजी दुपारी दीड वाजेच्या सुमारास गरीब नवाज वसाहतीत पाण्याचे टँकर उभे होते.

पाणी पुरवठा सुरु असतांना माजी नगरसेवक शेख मेहमुद शेख अहेमद उर्फ मुन्ना याने आमच्या घराकडे अगोदर पाणी द्यावे, असे सांगितले.

परंतू शेख याने थोडया वेळेनंतर टँकर पाठवितो असे सांगितले. त्याचवेळी माजी नगरसेवकाचे दोघे पूत्र मजहर शेख मुन्ना, माजीद शेख मुन्ना, टिपू शेख मुख्तार अल्लारखा शेख मुख्तार, जावेद शेख अहेमद मुन्ना उर्फ अहेमद शेख मुन्ना यांनी हातातील तलवार व चाकूने सैय्यद मुजफ्फर व सैय्यद नाशिद अली लियाकत अली यांना डोक्याला व पोटावर वार करुन जखमी केले.

त्या दोघांना तातडीने एका खाजगी रूगणालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले. यावेळी एमआयएमचे नगरसेवक तथा विद्यमान बांधकाम सभापती सद्दाम सलिम तेली हे त्यांना पाहण्यास जात असतांना त्यांना सार्वजनिक ठिकाणी गाठून त्याच्या पाठीमागून काही युवकांनी पाठीवरुन धारदार तलवारीने वार करीत जखमी केले.

त्यामुळे ते गंभीर जखमी झाले. त्यांना तातडीने शहरातील खाजगी रुग्णालयात उपचार करण्यात आले. परंतू प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्यांना धुळे येथे हलविण्यात आले. मात्र, त्यांचा मृत्यू झाला.

दरम्यान गरीब नवाज वसाहतीत हजारो संख्येने जमाव जमला होता. शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांना प्रसंगावधान राखत म्हसावद, सारंगखेडा, तळोदा येथील पोलीस ताफा व दोन राज्य राखीव पोलीस तुकडयांना पाचारण केले.

दुपारी या घटनेचे लोण शहरभर पसरले होते. त्याचदरम्यान बांधकाम सभापती सद्दाम तेली यांना माजी उपनगराध्यक्ष शेख मुख्तार शेख अहेमद यांच्या कुटूंबातील युवकांनी तलवार मारल्याने तेली यांच्या समर्थकांनी दुपारी चार वाजता माजी उपनगराध्यक्ष शेख मुख्तार यांच्या घरावर दगडफेक केली. मात्र पोलीस वेळीच पोहचल्याने जमावास पांगविण्यात आलेे.

दुसरी फिर्याद सैय्यद नाशिद अली लियाकत अली यांनी दिली, त्याने म्हटले की, सैय्यद मुजफ्फर आणि लियाकत यास पाहण्यासाठी मी व सद्दाम तेली गेलो असता साजीद उर्फ पेम अहमद शेख बाबुलाल अहमद शेख, जाबीद मुख्तार शेख टिपू शेख मुख्तार व पाच ते सहा लोकांनी बाबुलाल अहमद शेख यांनी हातातील चाकूने वार करून जखमी केले.

या घटनेनंतर दुपारी चार वाजेच्या सुमारास संतप्त जमाव माजी उपनगराध्यक्ष यांच्या घराकडे शेकडो कार्यकर्ते जावून त्यांनी घरावर दगडफेक केली. त्यानंतर त्यांच्या एक इंडीगो व दुसरी तवेरा या दोन्ही वाहनांची तोडफोड करण्यात आली.

नगरपालिका बांधकाम सभापती सद्याम तेली हे जखमी झाल्याची वार्ता दुपारी सुरू झाल्याने शहरातील वातावरण तापले होते.

त्यांच्या तीन चार हजार संतप्त कार्यकर्त्यांनी माजी नगरसेवक शेख मुख्तार शेख अहेमद यांच्या खेतीया रोडवरील अ‍ॅल्युमिनीयम सेक्शनच्या दुकानाकडे मोर्चा वळवित जमावाने दुकानाला आग लावली.

यात शेख मुख्तार यांच्या दोन्ही दुकानी आगीत भस्म झाल्या आहेत. हाणामारीत तीन जखमी तर सात जणांना ताब्यात घेण्यात आले आहे.

दुपारी पाण्याच्या टँकरवरून विद्यमान नगरसेविकेचे दोन्ही पूत्र व माजी उपनगराध्यक्षांच्या भावाच्या मुलांमध्ये शाब्दीक चकमक झाली.

यावेळी तलवार चाकुच्या वापर सर्रास झाला होता. यात सैय्यद नाशिद अली लियाकत अली सैय्यद मुजाफर अली सैय्यद लियाकत अली या दोन्ही भावंडांना डोक्यास, पोटास चाकूने वार केले.

या दोघांना नंदुरबार जिल्हा रूग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. तिसरा जखमी माजी नगरसेवक शेख महेमूद शेख अहेमद यास धुळे येथे हलविण्यात आले.

पोलीसांची उडाली तारांबळ
दुपारी गरीब नवाज वसाहतीत दोन गटात झालेल्या वादविवादाची माहिती पोलीस प्रशासनास कळताच डी.वाय.एस.पी. ए.बी. पाटील, पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवंत यांच्यासह पोलीस कुमक पोहचली.

मात्र, तेथील हजारो कार्यकर्त्यांना पांगविण्यासाठी पोलीस प्रशासाकडे पुरेसा पोलीस फोर्स नव्हता. त्यामुळे त्यांना अडचणीचे ठरले होते.

त्याही परिस्थिती शहादा पोलीस निरीक्षक शिवाजी बुधवत, डी.वाय.एस.पी. पाटील यांनी संतप्त जमावास शांत केले.
दरम्यान, रात्री 9.30 च्या सुमारास पुन्हा संतप्त जमावाने दगडफेक सुरु केली.

यात दगडफेकीत पोलीस उपअधीक्षक महारु पाटील, पोलीस उपनिरीक्षक अमृत पाटील, हे.कॉ. छोटू शिरसाठ, महेंद्र शिंदे हे जखमी झाले आहेत.

LEAVE A REPLY

*