Type to search

नंदुरबार

शहादा मतदार संघात ग्रामीण भागात उत्साह

Share

शहादा । ता.प्र. – शहादा विधानसभा मतदार संघात मतदानाबाबत शहरी भागात कमालीचा निरुत्साह दिसून आला तर ग्रामीण भागामध्ये मतदारांमध्ये मतदानासाठी उत्साह दिसून आला. दुपारी चार वाजेपर्यंत केवळ चाळीस टक्के मतदान झाले होते. सरासरी 70 टक्के मतदान झाल्याचा अंदाज आहे.

सकाळी सात वाजेपासून मतदान सुरू झाले असले तरी आठ वाजेपासून मतदार मतदान केंद्रावर येवू लागले. सकाळी साडेनऊ ते बारा वाजेपर्यंत मतदारांमध्ये उत्साह होता. प्रत्येक मतदान केंद्राच्या बाहेर पाहिजे तशी कार्यकर्त्यांची गर्दी नव्हती. दुपारी तीन वाजता काही मतदार केंद्रांमध्ये कमालीच्या शुकशुकाट होता. कार्यकर्त्यांनी वयोवृद्ध मतदारांना देखील मतदानासाठी आणणे टाळले. काही कार्यकर्ते केवळ नावाला मतदान केंद्राच्या बाहेर उभे होते. मतदार संघात काँग्रेस पक्षाचे उमेदवार पद्माकर वळवी व भाजपाचे उमेदवार राजेश पाडवी यांच्यात चांगलीच लढत झाली आहे. अपक्ष उमेदवार झेलसिंग पावरा यांनी देखील शेवटच्या क्षणापर्यंत लढत दिली आहे. मतदारांना आणण्याकरिता वाहनांची संख्या देखील नव्हती. कार्यकर्ते आपल्या खाजगी वाहनांनी मतदारांना आणत होते. सगळ्याच मतदान केंद्रांवर कडेकोट पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. निवडणूक निर्णय अधिकारी चेतन गिरासे तहसीलदार कुलकर्णी उपविभागीय पोलिस अधिकारी पंडित सपकाळे यांनी आपल्या अधिकार्‍यांसह मतदान केंद्रांवर वेळोवेळी भेटी दिल्या. सर्व मतदान केंद्रावर शांतता होती.

वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाच्या इमारतीत अकरा मतदान केंद्र होते. त्यात एक मतदान केंद्र क्रमांक 176 हे सहेली मतदान केंद्र म्हणून तयार करण्यात आले होते. या मतदान केंद्राला कमान तयार करून सुशोभित करण्यात आले होते. फुगेदेखील लावून रंगीबेरंगी पडदे लावून पूर्ण मतदान केंद्रात सजावट केली होती. तालुका तलाठी डिगराळे यांच्या मार्गदर्शनाखाली हे पहिले मतदान केंद्र तयार करण्यात आले होते. याच्यात सर्व महिला कर्मचारी होत्या. याच विद्यालयाच्या आवारात मतदान क्रमांक 180 हे आदर्श मतदान केंद्र म्हणून तयार केले होते. या मतदान केंद्रालाही सुशोभित करण्यात आले होते दोन्ही मतदान केंद्रावर वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाचे राष्ट्रीय सेवा योजनेचे विद्यार्थी विद्यार्थिनींनी उत्कृष्ट स्वयंसेवक म्हणून काम पाहिले.

दुपारी चार वाजेपासून वसंतराव नाईक माध्यमिक विद्यालयाच्या अकरा मतदान केंद्रांवर मतदारांची कमालीची गर्दी झाली होती. अक्षरशः या मतदान केंद्रावर ती मतदारांच्या रांगा लागलेल्या होत्या. या मतदान केंद्राचा शहरात सर्वाधिक जास्त उत्साह होता. मतदान केंद्राच्या बाहेरदेखील कार्यकर्त्यांची मोठी गर्दी याच ठिकाणी होती. शेठ व्ही.के. शहा येथील मतदान केंद्र संत गाडगे महाराज महाराज प्राथमिक शाळेच्या इमारतीतील मतदान केंद्रांमध्ये कमालीच्या शुकशुकाट होता. मुन्सिपल हायस्कूलच्या तसेच व्हॉलंटरी शाळेच्या काही मतदान केंद्रांवर अतिउत्साह होता. मतदारांची संख्या वाढलेली दिसून आली. एकंदरीत शहरात मतदानाच्या बाबतीत निरुत्साह दिसून आला. ग्रामीण भागात मात्र चांगला प्रतिसाद दिसून आला. गुजरात राज्यात स्थलांतरित झालेल्या मजुरांचा सर्वच उमेदवारांना फटका बसला आहे. कोण निवडून येईल हे शेवटपर्यंत सांगणे कठीण आहे.

शेवटी शेवटी वरूणराजाने हजेरी लावल्याने मतदारांची तारांबळ उडाली. मतदार राजा मतदान करण्यासाठी धावपळ करत होता. मतदारांनी मतदान करण्यासाठी सर्व पक्षाचे कार्यकर्ते आवाहन करीत होते.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!