Type to search

नंदुरबार

शहादा परिसरात पपईवर ‘रिक्षा’ किडीचा प्रादुर्भाव

Share

शहादा | ता.प्र.- तालुक्यात मोठ्या प्रमाणावर शेतकर्‍यांनी पपईची लागवड केली आहे. सध्या पपईला फळधारणा होत असून फळधारणेच्या कालावधीत ‘रिक्षा’ नावाच्या किडीचा प्रादुर्भाव आढळून येत आहे. त्यामुळे पपईची फुलगळ होत असून फळधारणेवर त्याचा परिणाम होत आहे. आधीच संकटात सापडलेल्या शेतकर्‍याला कृषी विभागाच्या मार्गदर्शनाची गरज आहे.

पपई या पिकाला खर्च मोठ्या प्रमाणावर लागतो. यावर्षी शेतकर्‍यांनी १४ रुपयांपासून २५ रुपयापर्यंत रोपांची खरेदी केली. शिवाय उन्हाच्या तीव्रतेने मर रोगाचा प्रादुर्भाव झाला होता. त्यामुळे तीन ते चार वेळा रोपे आणून पुन्हा लागवड करावी लागली. त्याला उन्हाच्या संरक्षणापासून क्रॉप कव्हर लावण्यात आले. ते क्रॉप कव्हर प्रति झाड तीन ते चार रुपये खर्च आला. महागडे रासायनिक खत वेगवेगळ्या कंपन्यांची स्प्रे त्यात व्हायरस मिलीबगसारख्या रोगांचा प्रादुर्भाव सहाजिकच खर्चाचे प्रमाण वाढले. दरवर्षी पपईचा दर कमी अधिक प्रमाणात होत असल्याने दर कमी झाल्यावर शेतकर्‍याला मोठी आर्थिक झळ सोसावी लागते. त्यामुळे पिक परवडेनासे झाले आहे. पपई पीक दरवर्षी वादाच्या भोवर्‍यात सापडते. कधी व्यापार्‍यांकडून कमी दर दिला जातो तर कधी अस्मानी संकट. यावर्षी सुरुवातीलाच निसर्गाच्या संकटाने शेतकरी हैराण झाला असून कसेबसे उधार उसनवार पैसे करून पीक घेत आहे. काही शेतकर्‍यांनी तर कूपनलिका आटल्याने उभे पीक मोडून काढले. ज्या शेतकर्‍यांची पपईत तग धरून उभी आहे. त्यावर सध्या अस्मानी संकटाच्या घाला पडत आहे. विविध आजारांनी त्रस्त असलेल्या या पिकाला सध्या कृषी विभागाकडून मार्गदर्शनाची गरज आहे. कृषी विभागाने गावोगावी बैठका घेऊन मार्गदर्शन केले पाहिजे, अशी मागणी शेतकर्‍यांकडून होत आहे.

डावणीचा प्रादुर्भाव
ज्या शेतकर्‍यांनी एप्रिल महिन्यात पपई पिकाची लागवड केली आहे, ते पीक सध्या फळधारणेच्या अवस्थेत आहे. त्या पिकाला सध्या डावणी रोगाने पछाडले आहे. यात झाड पिवळे पडणे, झाडाची छत्री बारीक होणे, कोरडी पडणे आदी प्रकार घडत आहेत. पपई पीक हे मुख्यतः पानांच्या छत्रीवरच अवलंबून असते. या पिकात पानांची छत्री गेल्यास झाडच कमकुवत होते. त्यामुळे उन्हाळ्यात सावली नसल्याने फळांवर उष्णतेचे चटके बसल्याने फळ खराब होऊन आर्थिक नुकसान होते. शिवाय व्यापारीही माल घेत नसल्याने शेतकर्‍यांचे मोठ्या प्रमाणावर नुकसान होते.

कृषी विभागाने वेळीच दखल घेऊन समस्यांना आळा घालण्यासाठी ठाम उपाययोजना कराव्यात. सध्या पपई पिकावर विविध रोगांचा प्रादुर्भाव होत आहे. फुलगळ होत आहे. एकरी सुमारे ४० ते ५० हजार रुपयांपर्यंत खर्च झालेला आहे. कोणत्या औषधाची फवारणी करावी व कोणती काळजी घ्यावी याबाबत द्विधा मनस्थिती होत असून कृषी विभागाने तात्काळ दखल घेऊन मार्गदर्शन करावे व शेतकर्‍यांनाआर्थिक नुकसानीपासून वाचवावे.
– विशाल पाटील,
पपई उत्पादक शेतकरी,पाडळदा

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!