शहाणपणाला विचारतो कोण?

0

विकासाचे नगारे जनतेच्या कानीकपाळी रोजच्या रोज आदळत असताना त्यांच्या विचार स्वातंत्र्याची मात्र गळचेपी होत असल्याची भावना सध्या देशात बळावत आहे का? विकासाकरता विचार स्वातंत्र्य व व्यक्ती स्वातंत्र्याचा बळी देणे आवश्यकच आहे का? देशाच्या आजवरच्या राजकीय धोरणांमध्ये सत्तापालटानंतर बरेच बदल घडून येत आहेत.

तथापि ते बदल राबवताना विचार स्वातंत्र्य अबाधित राखून विकासाकडे वाटचाल करता येणार नाही का? असा परखड प्रश्‍न ज्येष्ठ समाजसेवी कार्यकर्ते डॉ. अभय बंग यांनी जाहीरपणे विचारला आहे. शेतकर्‍यांच्या प्रश्‍नाचा अभ्यास करताना त्यांच्या कुळामुळाचा विचार होणे गरजेचे आहे. शेतकरी आत्महत्येची वाढती आकडेवारी पाहता विकासाच्या आडून फोफावणारा सरकारी दहशतवाद थांबवणे गरजेचे आहे, असा सल्ला ज्येष्ठ अर्थतज्ञ प्रा. एच. एम. देसरडा यांनीसुद्धा दिला आहे.

या दोन्ही व्यक्ती आपल्या सेवाकार्याने व सखोल ज्ञानामुळे विश्‍वविख्यात आहेत. दोघेही राजकारणापासून कोसो दूर आहेत. अलीकडच्या काळात अशा जाणत्यांना देशाच्या राजकारणात स्थानच उरलेले नाही. अर्थात त्यांच्या प्रचंड विधायक व सेवाभावी कार्यामुळे त्यांच्या व्यक्तिमत्त्वाला त्यामुळे कोणताही उणेपणा आलेला नाही.

ती स्वयंप्रकाशी मंडळी आहेत. देसरडा अर्थविषयक अभ्यासासाठी ओळखले जातात. त्यामुळे त्यांचा सल्लादेखील अर्थनीतीच्या संदर्भात दुर्लक्ष करण्यासारखा नाही; पण सध्याच्या युगात शहाण्यांना विचारतो कोण? आधुनिक तंत्रज्ञानाच्या आणि साधनांच्या या संगणक युगात अनुभवी शहाणपणाला सरकारी बाबूंच्या लेखी किंमत उरलेली नाही.

सरकारच्या धोरणविषयक कामकाजात विधायक शहाणपणाची गरज नसावी, असा भ्रम देशात का वाढतो आहे? एका कळीवर हवी ती माहिती आणि कोरडे सल्ले देणार्‍यांच्या फौजा जगभर कार्यरत आहेत. भारतातही तशा फौजफाट्याची कमतरता नाही. केवळ बोटांचा खेळ करून वाटेल त्या दिव्यज्ञानाचे रतीब घरोघर पोहोचवणार्‍या साधनांपासून राजकारणीदेखील अलिप्त का राहतील? समाज माध्यमांचा नको तितका, किंबहुना समाजाला विधायकतेपासून दूर नेणारा वापर करण्याची चढाओढ देशातही भरपूर वाढली आहे.

पत्रकार चित्रा सुब्रमण्यम यांच्या ‘आय एम ए ट्रॉल’ या पुस्तकात सरकारी आशीर्वादाने उभारल्या गेलेल्या सायबरसेनेबद्दल बरीच स्फोटक माहिती आढळते. कोणताही अभ्यास न करता समाज माध्यमांवर ‘अभ्यासपूर्ण’ मते अधिकारवाणीने व्यक्त होत असतात. त्याच मार्गाने सध्या कुणालाही देशभक्त किंवा देशद्रोही ठरवण्याची स्पर्धा देशात सुरू आहे. साहजिकच डॉ. बंगसारख्यांचे सल्ले कितीही योग्य असले तरी ते मनावर घेतले जातील का?

LEAVE A REPLY

*