शहरासाठी केवळ २३२३ द.घ.फूट पाणीसाठा शिल्लक

पाणी जपून वापरण्याचे मनपाचे आवाहन

0

नाशिक | दि. १ प्रतिनिधी –नाशिक शहराला पाणीपुरवठा करणार्‍या गंगापूर धरणात १ मार्च रोजी ३ हजार ५०७ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. याशिवाय गंगापूर, कश्यपी, गौतमी धरणांत सरासरी ६१.५३ टक्के पाणीसाठा शिल्लक असून दारणा धरणात ६४.७८ टक्के पाणीसाठा शिल्लक असल्याची माहिती महापालिकेकडून देण्यात आली.

त्यापैकी शहरासाठी केवळ २३२३.३१ दलघफू पाणीसाठा शिल्लक आहे. त्यामुळे शहरातील नागरिकांना उन्हाळ्यात पाणी जपून वापरण्याचे आवाहन महापालिकेकडून करण्यात आले आहे. १ मार्चपर्यंत गंगापूर धरणात ३ हजार ५०७ दलघफू (६२.२९ टक्के), काश्यपी धरणात १ हजार ७८७ दलघफू (९६.४९ टक्के), गौतमी धरणात ४६८ दलघफू (२५.०५ टक्के) असा एकूण ५ हजार ७६२ दलघफू (६१.५३ टक्के) पाणीसाठा शिल्लक आहे.

३१ जुलैपर्यंत धरणातील पाण्यापैकी ४ हजार ३०० दलघफू पाण्याचे आरक्षण शहरासाठी ठेवण्यात आले होते. त्यापैकी २८ फेब्रुवारीपर्यंत गंगापूर आणि दारणा या धरणांतून १ हजार ९७६.६९ दलघफू पाण्याचा वापर झाला आहे. त्यामुळे आता गंगापूर धरणात २०२९.३२ दलघफू तर दारणात २९३.९९ दलघफू असे एकूण २३२३.३१ दलघफू पाण्याचे शिल्लक आरक्षण आहे. हे पाणी जुलैअखेरपर्यंत पुरवावे लागणार आहे.

सध्या उन्हाळा वाढत असून येत्या काही दिवसात पाण्यावरील निर्बंध अधिक कडक होत जाणार आहेत. त्यामुळे महापालिकेकडून नाशिक शहरातील सर्वच नागरिकांनी काटकसरीने पाणी वापर करत नाशिक महापालिकेला सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे. शहरातील नागरिकांकडून पाण्याचा अपव्यय केला जातो.

पिण्याचे पाणी हे घरातील बगीचे तसेच वाहन धुणे आदी कामांसाठी वापरले जाते. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पाण्याचा अपव्यय होतो. आरक्षित पाण्याचा अंदाज घेत हा वापर असाच राहिला तर मे महिन्यात पाण्यासाठी हाल होऊ शकतात. त्यामुळे महापालिकेच्या वतीने पाणी बचतीचे आवाहन करण्यात आले आहे.

LEAVE A REPLY

*