अहमदनगर शहरावर जलसंकट?

0

दीडशे कोटींच्या थकबाकीमुळे नगरकरांच्या घशाला पडणार कोरड

 महावितरणचा मध्यरात्रीनंतर वीज तोडण्याचा इशारा

अहमदनगर (प्रतिनिधी)- शहराला पाणीपुरवठा करणार्‍या महापालिकेच्या पाणीयोजनेचा वीजपुरवठा तोडण्याचा इशारा महावितरणने पुन्हा दिला आहे. मनपा पाणी योजनेचे वीज बिलापोटी थकबाकीची रक्कम 150 कोटी रुपयांपर्यत पोेहोचली आहे. थकबाकीची ही रक्कम न भरल्यास पाणी योजनेचा वीज जोड तोडण्याचा इशारा महावितरणने दिला आहे. यामुळे नगरकरांचा घसा ऐनपावसाळ्यात नगरकरांच्या घशाला कोरड पडण्याची शक्यता आहे. आज (शनिवारी) मध्यरात्री 12 वाजता थकबाकी भरण्याची मुदत संपणार आहे, त्यानंतर केव्हाही कारवाई होवू शकते, असे महावितरणकडून सांगण्यात आले.

मागील पंधरा दिवसांपासून नगर शहरातील पाणीपुरवठा विस्कळित झाला आहे. विळद जलशुद्धीकरण केंद्रातील स्लुस व्हॉल्व्ह नादुरुस्तीनंतर मुळा धरणाजवळील बाभुळगाव गावाच्या परिसरातील पाणी पुरवठा करणारी जुनी पाइपलाइन फुटल्याने शहरात पुरेशा दाबाने पाणीपुरवठा होत नाही. या परिस्थितीत शनिवारी (15 जुलै) महावितरणच्या वीज वाहिनी दुरुस्ती कामामुळे उपनगराचा पाणीपुरवठा बंद ठेवण्यात आला. त्यातच आता वीजबिल थकबाकीमुळे पाणी योजनेचा वीजपुरवठा तोडला गेला तर नव्याने पाणीटंचाईच्या संकटाचा सामना नगरकरांना करावा लागणार आहे.
महावितरणने मार्च महिन्यांत अशा प्रकारे एका दिवशी केवळ 12 तास पाणीयोजनेचा वीजपुरवठा बंद ठेवला होता. यामुळे शहरातील पाणी पुरवठा तीन ते चार दिवस विस्कळीत झाला होता. त्यावेळी राजकीय हस्तक्षेपामुळे आणि मनपा प्रशासनाने वीज बिलापोटी साडेआठ कोटींचे धनादेशही महापालिकेकडून घेतले. हे धनादेश महापालिकेकडून वटले असले तरी दरम्यानच्या काळात पाणीयोजनेचे चालू बिल भरण्याकडेही दुर्लक्ष झाल्याने पुन्हा वीज बिल थकबाकी वाढली आहे.

 मध्यवस्तीत आज कमी दाबाने पाणी  मध्यवस्तीत आज कमी दाबाने पाणी   महावितरणकडून मनपा पाणी योजनेच्या वीज पुरवठा यंत्रणेच्या दुरुस्तीचे काम करण्यात येत आहे. यामुळे आज चार तास वीज पुरवठ्यात शटडाऊन घेण्यात आले. यामुळे सावेडीसह, बोल्हेगाव, नागापूर, सावेडी उपनगरातील गुलमोहोर रोड, पाईपलाईन रोड तसेच औरंगाबाद रोडवरील लक्ष्मीनगर, सूर्यनगर, निर्मलनगर या भागांसह स्टेशन रोड परिसर, सारसनगर, विनायकनगर, मुकुंदनगर, केडगाव, नगर-कल्याण रोडवरील शिवाजीनगर परिसरासातील पाणीपुरवठा बंद होता. उद्या रविवारी (16 जुलै) शहराच्या मध्यवस्तीतील भागासही उशिरा व कमी दाबाने पाणी पुरवठा होणार असल्याचे मनपाकडून सांगण्यात आले.

मनपाला पाणी पुरवठा योजनांची थकबाकी भरण्यासाठी मुदत देण्यात आलेली आहे. ही मुदत शनिवारी मध्यरात्री 12 वाजता संपणार आहे. त्यानंतर महावितरणकडून केव्हाही कारवाई होवू शकते. थकबाकी भरण्यासंदर्भात मनपाकडून शनिवारी दुपारी 12 वाजेपर्यंत कोणताही प्रतिसाद मिळलेला नाही.
-सुधाकर जाधव, शहर कार्यकारी अभियंता, महावितरण कंपनी.

LEAVE A REPLY

*