शहरात भरदिवसा घरफोड्यांचे सत्र ; विविध घटनांमध्ये साडेतीन लाखाचा ऐवज लंपास

0

नाशिक : निवडणुका संपताच शहरात पुन्हा एकदा गुन्हेगारीने डोके वर आढले आहे. मागील आठवडाभरात शहरात आठ ते दहा घरफोड्या उघडकीस आल्या असून या घरफोड्यांनी नागरीक हैराण झाले आहेत. नुकत्याच वेगवेगळया ठिकाणी झालेल्या ती घरफोडींमध्ये चोरट्यांनी सुमारे साडे तीन लाख रूपयांचा ऐवज चोरून नेला. त्यात दोन भरदिवसा झालेल्या घरफोडीसह मंदिरातील तिजोरी फोडण्याचा समावेश आहे.

या प्रकरणी रविवार पेठेतील खरे सदन येथे राहणारे वैभव अनिल नवले यांनी सरकारवाडा पोलीस ठाण्यात तक्रार दाखल केली आहे. नवले हे मंगळवारी सकाळी ठाणे येथे बहिणीस भेटण्यासाठी कुटूंबासह गेले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी भरदिवसा त्यांच्या बंद घराचे कुलूप तोडून लोखंडी कपाटातील सुमारे 2 लाख 72 हजार रूपये किमतीचे सोन्याचांदीचे दागिणे चोरून नेले. याप्रकरणी सरकारवाडा पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला अ असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक जे.के.गोसावी करीत आहेत.

बजरंगवाडी येथे मंगळवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी बंद मंदिराच्या मुख्यप्रवेशद्वाराचे कुलूप तोडून नंतर गाभाजयातील तिजोरीचे कुलूप तोडले व रोकड चोरून नेली. याप्रकरणी उपनगर पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास सहाय्यक निरीक्षक एस.के.माळी करीत आहेत. तिसरी घटना संताजीनगर भागात घडली येथे राहणारे शेख खाजा शेख लाल शेख हे रविवारी सायंकाळी कुटूंबियांसह खरेदीसाठी घराबाहेर पडले असता ही घटना घडली. अज्ञात चोरट्यांनी त्यांच्या बंद घराचे कुलूप बनावट चावीने खोलून कपाटातील सुमारे 57 हजार 500 रूपये किमतीचे दागिणे चोरून नेले.

याप्रकरणी मुंबईनाका पोलिसात गुन्हा दाखल करण्यात आला असून अधिक तपास उपनिरीक्षक पाटील करीत आहेत. तर विहीतगाव येथील विठ्ठल मंदिरात झालेल्या घरफोडीत चोरट्यांनी तिजोरी फोडून सुमारे 7 हजार रूपयांची रोकड चोरून नेली. त्यात नोटा व चिल्लरचा (नाणी) समावेश आहे. याप्रकरणी शिवाजी कारभारी हांडोरे यांनी तक्रार दाखल केली आहे.

LEAVE A REPLY

*