शस्त्रक्रियेविनाच परतल्या महिला

0

उंबरेत भुलीच्या इंजेक्शनचा तुटवडा  आरोग्य केंद्राला आली अवकळा

उंबरे (वार्ताहर) – केवळ भुलीचे इंजेक्शन उपलब्ध नसल्याने तीन महिला रुग्णांना कुटुंब नियोजन शस्त्रक्रियेविनाच माघारी फिरावे लागले. गेल्या दोन दिवसांपासून हे इंजेक्शनच उपलब्ध नसल्याची धक्कादायक माहिती उंबरे येथील प्राथमिक आरोग्य केंद्राच्या वैद्यकीय सूत्रांनी दिली. त्यामुळे आता इंजेक्शन नसताना अत्यवस्थ रूग्ण दाखल झाला तर त्याचे करायचे काय? असा संभ्रम येथील प्राथमिक आरोग्य केंद्राला पडला आहे. विशेष म्हणजे नऊ गावातील लाभार्थी रूग्ण येथील केंद्रात आरोग्यलाभ घेतात.

 
दरम्यान, नगर जिल्ह्यात महामार्गावरील दारूविक्रीवर गदा आल्याने तळीरामांनी नशेसाठी तर्र व्हायला चक्क भुलीच्या इंजेक्शनचा वापर सुरू केला असल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे.
उंबरे प्राथमिक आरोग्य केंद्राची इमारत सुमारे 75 लाख रुपये खर्च करून उभारण्यात आली आहे.

 

याठिकाणी सर्वाधिक कुटुंब नियोजनाच्या शस्त्रक्रिया केल्या जातात. श्‍वानदंशाच्या लसीही येथून मोठ्या प्रमाणात दिल्या जातात. दररोज 70 ते 80 रूग्ण उपचार घेतात. येथे वैद्यकीय सेवा चांगल्या प्रकारे देण्यात येत असल्याने येथे नेहमी रूग्णांची गर्दी असते. या रूग्णालयाकडे जिल्हा परिषदेचे माजी सदस्य अ‍ॅड. सुभाष पाटील यांचे सातत्याने लक्ष असल्याने येथील औषधांचा साठाही मुबलक प्रमाणात आहे.

 

तर यापूर्वी अ‍ॅड. पाटील यांनी जि. प. कडून मिळणारा इंधन भत्ता या प्राथमिक आरोग्य केंद्राला वेळोवेळी दिल्याने अनेक गोरगरीब जनतेला अनेकविध औषधोपचार सहजगत्या उपलब्ध झाले आहेत. परंतु या प्राथमिक आरोग्य केंद्राच्या शस्त्रक्रिया विभागाची अत्यंत दयनीय अवस्था झाली आहे.
अ‍ॅड. पाटील यांनी या केंद्राकडे जिल्हा परिषदेच्या माध्यमातून चांगला दृष्टीकोन ठेवून केंद्राला भरभरून आर्थिक मदत केली आहे. तीच परंपरा कायम ठेवून विद्यमान जि.प. सदस्या शशिकलाताई पाटील यांनीही या केंद्राला सहकार्य करावे, अशी अपेक्षा ग्रामस्थांनी व्यक्त केली आहे.

 जमिनीवरील फरशा खचून गेल्या असून जागोजागी खड्डे पडले आहेत. येथे शस्त्रक्रिया करताना वैद्यकीय अधिकार्‍यांना मोठ्या गैरसोयींना सामोरे जावे लागत आहे. येथे ठराविकच कामगार केंद्राची देखभाल करीत असून अन्य कामगार या विभागाच्या स्वच्छतेकडे कानाडोळा करीत आहेत. 

LEAVE A REPLY

*