व्रताची चतुर्थ तपपूर्ती!

0
दैनिक ‘देशदूत’ने नाशिक आवृत्तीचा 49 वा वर्धापनदिन काल साजरा केला. अनेक मित्र, हितचिंतक, प्रतिष्ठित, सन्माननीय नागरिक आणि असंख्य वाचकांच्या सहभागामुळे ‘देशदूत’चा अर्धशतकापुढे वाटचाल करण्याचा उत्साह दुणावला आहे.

प्रादेशिक वृत्तपत्रांसाठी सध्याचा काळ पुरेसा प्रोत्साहक नाही. कधीकाळी वृत्तपत्र हे ‘असिधाराव्रत’ मानले जात होते. आता सर्वत्र वाढलेल्या व्यावसायिकतेला वृत्तपत्र व्यवसायही अपवाद नाही. प्रादेशिक वृत्तपत्रांना सध्या अनेक अडचणींना तोंड द्यावे लागते. तथापि वाचकांचा विश्वास व त्यांचे निखळ प्रेम ‘देशदूत’च्या वाटचालीसाठी नेहमीच प्रेरणास्त्रोत ठरले आहे. निष्पक्ष भूमिका व जनहिताला प्राधान्य देणारे धोरण हा वसा ‘देशदूत’ने कायम जोपासला आहे.

गरज भासली त्या-त्या वेळी प्रवाहाविरुद्ध पोहण्याचे साहस ‘देशदूत’ सहज करू शकला. लोकशाहीत समाजहिताला न्याय मिळाला पाहिजे ही ठाम भूमिका ‘देशदूत’चे बलस्थान आहे. शेतकरी, नोकरदार, उद्योजक, व्यावसायिक, सामान्यजन यांच्या व्यापक हिताचा विचार ‘देशदूत’ गेली 48 वर्षे सतत करीत आहे. पुढेही तेच करीत राहील. दैनिक सुरू होण्यापूर्वी जवळपास पाच वर्षे ‘देशदूत’ साप्ताहिक स्वरुपात वाचकांनी पाहिला आहे.

कुसुमाग्रजांसारख्या अनेक समाजहितैषी मान्यवरांचे आशीर्वाद प्रारंभापासून ‘देशदूत’च्या पाठीशी आहेत. त्यांच्याच प्रेरणेने सुरू झालेला ‘ज्ञानवंत-गुणवंत गौरव सोहळा’ हा ‘देशदूत’साठी समाजातील कर्तृत्वाला प्रोत्साहन देणारा कार्यक्रम आहे. महिलांच्या कर्तृत्वाला सलाम करणार्‍या ‘कर्मयोगिनी’ पुरस्काराचा नमनाचा टप्पा नुकताच पार पडला. येत्या 8 सप्टेंबरला समाजातील गुणवंत तरुणाईच्या कामगिरीला ‘तेजस’ पुरस्काराचे कोंदण प्राप्त होणार आहे.

उण्यापुर्‍या चार तपांच्या कालखंडात वृत्तपत्र उद्योगाच्या तांत्रिक बाजूंमध्ये अनेक बदल झाले. आधुनिक साधनांचा प्रवेश झाला. अद्ययावतता कायम ठेवण्यासाठी ते सर्व बदल ‘देशदूत’ने वेळोवेळी आत्मसात केले आहेत. ‘डिजिटल आवृत्ती’ ही त्याचे ताजे स्वरूप! त्या माध्यमाने विदेशातील वाचकांना ‘देशदूत’ उपलब्ध झाला आहे. त्याचा प्रत्ययही ‘कर्मयोगिनी’ पुरस्कार वितरणप्रसंगी आला. पुरस्काराने सन्मानित केलेल्या कर्मयोगिनींची माहिती 102 देशांपर्यंत पोहोचली.

यंदाच्या वर्धापनदिनाला पर्यावरण संवर्धनासाठी प्रबोधनाचा प्रयत्न ‘देशदूत’ने केला. शुभेच्छा देण्यासाठी पुष्पगुच्छांऐवजी शक्यतो एखादे रोप उपयोगात आणण्याचे आवाहन वाचकांना केले होते. त्यालाही अनेकांनी प्रतिसाद दिला. असंख्य वाचक, हितचिंतक आणि मित्रांनी ‘देशदूत’ कार्यालयाला काल भेट दिली व दूरध्वनीवरून शुभेच्छा दिल्या. संध्याकाळी स्नेहमिलनातही अनेक मान्यवर सहभागी झाले. त्याचे सविस्तर वृत्त नंतर वाचकांना मिळेलच. सर्व स्नेहीजनांचे मन:पूर्वक आभार!

LEAVE A REPLY

*