Type to search

धुळे

वेल्हाणे येथे श्रमदानातून साकारला वनराई बंधारा

Share

धुळे । तालुक्यातील वेल्हाणे येथे यावर्षी भयंकर दुष्काळामुळे प्रचंड पाणीटंचाईला सामोरे जावे लागत आहे. पिण्याच्या पाण्याचा प्रश्न आहेच पण गुरांना देखील पाणी मिळत नाही. गावाचा दुष्काळ कसा दूर होईल हा प्रश्न गावातील युवकांना भेडसावत होता. सामाजिक कार्यात नेहमीच अग्रेसर असणारी स्वामी विवेकानंद बहुद्देशीय संस्थेने गावात श्रमदानाचे आवाहन केले. या श्रमदानासाठी गावातील पंचवीस ते तीस युवक धावून आले व गावातील प्रमुख नाल्यावर उत्तम दर्जाचा वनराई बंधारा श्रमदानातून उभारला.

पाणीटंचाईच्या नैसर्गिक संकटातून गावाचा पाण्याचा प्रश्न सोडविण्यासाठी तसेच आज सारखी परिस्थिती यापुढे निर्माण होऊ नये म्हणून स्वामी विवेकानंद संस्थेने केलेल्या श्रमदानाच्या आवाहनास साथ देत गावातील युवकांनी श्रमदानाच्या माध्यमातून आधी दोन ते तीन फूट खोल खोदकाम करून त्यात दगडी पिचिंगने बंधार्‍याचा पाया मजबूत केला व त्यानंतर त्याच्यावर सिमेंटच्या गोण्यांमध्ये माती भरून त्या रचून परत आजूबाजूने माती लावून वनराई बंधारा साकार केला. या श्रमदानासाठी गावात पण सध्या बडोदा, मुंबई, पुणे येथे वास्तव्यास राहणार्‍या काही युवकांनी देखील श्रमदान केले. या वनराई बंधार्‍यात जवळपास बर्‍यापैकी पाणी अडवले जाईल त्यामुळे शेतातील विहिरींना फायदा होणार असून गुरांना पिण्यासाठी पाणी देखील इथे उपलब्ध होईल. स्वामी विवेकानंद संस्थेने आयोजित केलेल्या या श्रमदानात अनेक श्रम वीरांनी श्रमदान केले.

या श्रमदानाप्रसंगी संस्थेचे अध्यक्ष जयदीप पवार, प्रवीण बोरसे, रवींद्र सूर्यवंशी आनंदा मराठे, प्रवीण हनुमान मराठे, अनिल शिंदे, अविनाश वाघ, निलेश पवार, स्वप्निल पवार, मयूर मराठे, गणेश चिकणे, संदीप मोरकर, कैलास माळी, अक्षय बोरसे, विजय माळी, भाऊसाहेब मिस्तरी, ऋषिकेश मोरकर, जयेश ठाकरे, सुनील माळी, विनोद मराठे, स्वप्निल बोरसे, पंकज पाटील, चंद्रकांत बोरसे, प्रदीप मोरे, समाधान पिंजण, चेतन पवार, प्रवीण कोळी, राजेंद्र पाटील, जयेश राजपूत, निलेश चित्ते, भाऊसाहेब कोळी आदींनी परिश्रम घेतले.

यापुर्वी स्वामी विवेकानंद बहुउद्देशीय संस्थेच्या युवकांनी निसर्ग संवर्धन व सामाजिक जाणिवेतून गावातील जेष्ठ व जाणकार मंडळीच्या मार्गदर्शनाखाली परिसरात वृक्ष लागवड करुन त्यांची जोपासना, पक्षांसाठी पिण्याच्या पाण्याची सोय, गावात वाचनालय सुरु केले, शाळा महाविद्यालयाचे विद्यार्थी व गावकर्‍यांच्या सोयीसाठी प्रयत्न करुन मुक्कामाची बस सुरु केली. बसस्थानक परिसरात प्रवाशांसाठी पाणपोई, रक्तदान शिबीर तसेच राष्ट्रीय सण व महापुरुषांच्या जयंती पुण्यतिथीच्या निमित्ताने प्रबोधनाचे तसेच विविध समाजोपयोगी कार्यक्रमांचे आयोजन गावातील युवक नेहमीच करतात.

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!