विश्वस्त व ग्रामस्थांमध्ये संघर्षाची चिन्हे

0

घोषणा नको कृती हवी शिर्डी ग्रामस्थांचा साईबाबा संस्थानच्या अध्यक्षांसह विश्‍वस्तांविरूध्द एल्गार

 

शिर्डी (प्रतिनिधी) – दहा महिन्याच्या कालावधीत केवळ घोषणाबाजी केली. आता घोषणा नको कृती हवी, अशी जोरदार मागणी करत शिर्डी ग्रामस्थांनी साईसंस्थान विश्वस्त मंडळाच्या चालू बैठकीत घुसून कासवगतीने चाललेल्या कामाचा निषेध नोंदविला. दरम्यान शिवसृष्टीसाठी तिकीट न आकारता मोफत भक्तांसाठी खुले करावे, अन्यथा हा प्रकल्प सुरू होऊ देणार नाही, असे बजावले.

 

90 दिवसांवर साईंचा समाधी शताब्दी सोहळा आला असताना घोषणा बहाद्दर विश्वस्त मंडळ काय काम करणार? एका वर्षात काय काम केले, केलेल्या कामाचा लेखाजोखा सांगा, अशा शब्दात शिर्डीचे प्रथम नगराध्यक्ष कैलासबापू कोते यांनी अध्यक्ष डॉ. सुरेश हावरे व विश्वस्तांची कानउघडणी केली. तुम्ही जर काम करणार नसाल तर विश्वस्तांना शिर्डीत यापुढे प्रवेश मिळणार नाही .

 

 

 

प्रसंगी मुख्यमंत्री शिर्डीत आलेच तर त्यांचाही आम्ही निषेध करण्यास मागेपुढे पाहाणार नाही, असा इशारा शिर्डीतील सर्वपक्षीय ग्रामस्थांनी दिला.
दरम्यान शिर्डी ग्रामस्थांचा रूद्ररूप पाहून अध्यक्ष सुरेश हावरे यांनी ग्रामस्थांच्या सर्व मागण्या मान्य करूच, पण विश्वस्तांच्या यापुढील सर्व बैठ्ठकींपूर्वी ग्रामस्थांच्या सुकाणू समितीशी चर्चा करूनच निर्णय घेतले जातील व समाधी शताब्दी आराखडाही शिर्डीकरांसमोर ठेवला जाईल, असे आश्वासन दिले.

 

 

साईबाबा संस्थान विश्वस्त मंडळ व शिर्डी ग्रामस्थ यांच्या पहिल्या संघर्षाची ठिणगी पडली आहे. विश्वस्त मंडळ केवळ प्रसिध्दी माध्यमातून विविध योजनांची घोषणाबाजी करून शिर्डीकरांची दिशाभूल करत असल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला.

 

 

प्रसादालयापासून पायी मोर्चाने संस्थान विरोधात घोषणा बाजी करीत निघालेले सर्वपक्षीय ग्रामस्थ प्रथम संस्थानच्या मिटींग हॉलमध्ये जाताना पोलीस अधिकारी व संस्थान सुरक्षा कर्मचार्‍यांनी ग्रामस्थांना अडविल्याने ग्रामस्थ संतप्त झाले. तेथेच त्यांनी प्रचंड घोषणाबाजी करत संस्थान विश्वस्तांचा धिक्कार केला. सुरक्षा यंत्रणेस न जुमानता मिटींग हॉलमध्ये प्रवेश करून तिव्र भाषेत आपल्या प्रतिक्रिया व्यक्त केल्या.

 

 

यावेळी कैलास कोते म्हणाले, विश्वस्त मंडळाकडून शिर्डीचा मोठा विकास होईल, अशी अपेक्षा होती. मात्र भ्रमनिरास झाला आहे. शहरातील रस्ते, निळवंडे धरणाची पाईपलाईन, दर्शनबारी, सिनिअर कॉलेज याबाबत कोणतीही ठोस कार्यवाही केली नाही. दोन्ही रुग्णालयाची दुरवस्था झाली आहे. रुग्णवाहिका धक्का मारल्याशिवाय चालू होत नाही, असे असताना राज्यात रुग्णवाहिका वाटायला निघाले हे कितपत योग्य आहे. भक्त रक्तदान करतात. मात्र हे संकलित केलेले रक्त अन्य ठिकाणी विकले जात आहे.

 

 

साईबाबा संस्थानने नवीन भक्तनिवास बांधणार नाही, असा ठराव करावा. साईशताब्दी महोत्सव 90 दिवसांवर आला असताना आता काय कामे करणार? असा सवाल करत संपूर्ण शिर्डीचा विकास झाल्याशिवाय बाहेर एक रुपया जाऊ दिला जाणार नाही. यापुढे तुमची मनमानी चालू देणार नाही, असा इशारा देत शिर्डी ग्रामस्थांच्या सहनशिलतेचा अंत पाहू नका, असा निर्वाणीचा सल्ला देतानाच तुम्ही जर शिर्डीकरांना विश्वासात घेऊन कारभार करणार नसाल तर विश्वस्तांना यापुढे शिर्डीत पाऊल ठेवू देणार नाही, असा इशारा दिला.
माजी विश्वस्त डॉ. एकनाथ गोंदकर म्हणाले, गाव व संस्थान एक रहावे यासाठी सन 2004 साली स्कीम करुन व्यवस्था करण्यात आली आहे.

 

 

 

विश्वस्त मंडळाने शिर्डी ग्रामस्तांना विश्वसात घेऊन काम केल्यास शहराचा विकास होण्यास मदत होईल. संस्थान साईसेवक योजना राबविणार आहे मात्र भविष्यात कायदयाच्या दृष्टीने मोठी समस्या निर्माण होऊ शकते अशी भिती व्यक्त करत व्यवस्थापन मंडळाने अगोदर संस्थान कर्मचार्‍यांना प्रशिक्षण देऊन कामात सुधारणा करावी. यापूर्वीचे विश्वस्त मंडळ कसा कारभार करत होते, याचे विविध उदाहरणे देत काही अत्यावश्यक कामे करताना अगोदर तातडीने काम नंतर मंजुरी असे करावे लागते असे सांगितले.

 

 

शिवसेनेचे तालुका प्रमुख कमलाकर कोते म्हणाले, रुग्णालयात वारंवार मागणी करून देखील सिसीटीव्ही बसविले नाही. हॉस्पिटल, प्रसाद भोजन मोफत असताना शिवसृष्टीसाठी तिकीट कशासाठी? असा प्रश्न उपस्थित करत शिवसृष्टीच्या नावाखाली एका विश्‍वस्ताने संस्थानच्या प्रसादालयात दुकानदारी सुरू केली आहे.

 

 

नगरसेवक अभय शेळके म्हणाले, साईबाबा संस्थानने रुग्णालय, प्रसाद भोजन मोफत देण्यापेक्षा दर्जेदार जेवण व रुग्णांना उपचार द्यावे. शहरातील रस्ते, दर्शनरांगा आदी मुलभूत सुविधा प्रलंबीत आहे. शिर्डीतील हॉटेल व्यवसाय आर्थिक संकटात सापडले असून राज्यात शेतकर्‍यांच्या आत्महत्या तशा भविष्यात शिर्डीत हॉटेल व्यावसायिकांच्या आत्महत्या होतील.

 

 

विजयराव कोते म्हणाले, संस्थानने साईभक्तांना माफक दरात केवळ 50 रुपयात साईचरित्र ग्रंथ उपलब्ध करुन द्यावे, शताब्दीनिमित्त साईरथ तयार करून देशात फिरवून प्रचार, प्रसार करावा. प्रलंबीत रस्तांची कामे तातडीने सुरु करावी.

 

 

यावेळी भानुदास गोंदकर, बाबासाहेब कोते, सुजित गोंदकर, नीलेश कोते, प्रमोद गोंदकर, नितिन कोते, सर्जेराव कोते, सचिन चौगुले, नितिन अशोक कोते, जमादार इनामदार, सलीम शेख, गफ्फारखान पठाण, बाबा माडेकर, साईराम गोंदकर, रामभाऊ मते, भरत चांदोरे उपस्थित होते. यावेळी विश्वस्त भाउसाहेब वाकचौरे, सचिन तांबे, योगिता शेळके, प्रताप भोसले, कार्यकारी अधिकारी रूबल गुप्ता, उपकार्यकारी अधिकारी संदीप आहेर आदी उपस्थित होते.

 

साईसंस्थान यापुढे नविन भक्तनिवास बांधणार नाही, शहरातील रस्त्यांची कामे, दर्शनरांग, शिर्डीतील घनकचरा प्रकल्प, सिनियर कॉलेज,गार्डन, स्वच्छतेसाठी नगरपंचायतला दरमहा 25 लाख रुपये आदी कामे मंजुर करण्यात आली असुन प्राधान्याने ही कामे केली जाणार आहे. रुग्णालयातील नविन मशिनरीच्या निविदा काढल्या असुन लवकरच नविन मशिन येणार आहे. डॉक्टरांची भरती केली जाणार असुन रुग्णालयाचे काम केले जाणार आहे. यापुढे साईसंस्थान व शिर्डी ग्रामस्त यांचा समन्वय ठेवुन काम केले जाईल. ग्रामस्तांच्या सुचनांचा आदर केला जाईल .
-डॉ. सुरेश हावरे,अध्यक्ष साईसंस्थान शिर्डी

 

साईबाबा संस्थानच्या प्रसादालयात एका विश्वस्तांच्या आग्रहाखातर संस्थानने अतिशय माफक दरात जागा उपलब्द करून दिली.आणी याठिकाणी साईभक्तांना वीस रूपये तिकीट ठेवण्यात आले.हा प्रकार अतिशय निंदनिय असुन हा प्रकल्प साईभक्तांना पुर्णपणे मोफत करावा व याठीकाणी कोणत्याही प्रकारची विक्री होता कामा नये.जर संस्थानने हा प्रकल्प तिकीट लावून सुरू केलाच तर आम्ही तेथे जावून कुलूप लावू व या प्रकरणी जबाबदार असलेल्या विश्वस्ताला झोडपून काढू .
-प्रमोद गोंदकर,सामाजीक कार्यकर्ते,शिर्डी

 

 

आम्ही चोर दरोडेखोर आहोत काय
साईबाबा संस्थानचे अध्यक्ष झाल्यावर या विश्वस्त मंडळाला आम्ही विकासकामांसाठी सर्वोतोपरी मदत केली.सहकार्याची भुमीका घेतली.मात्र हावरे व इतर विश्वस्तांनी केवळ घोषणाबाजी करून शिर्डी ग्रामस्थांची व साईभक्तांची घोर फसवनुक केली.समाधी शताब्दी सोहळा व शिर्डी संदर्भात शांततेच्या मार्गाने आम्ही चर्चा करायला आलो तर येथे विश्वस्तांनी हत्यारधारी सुरक्षायंत्रणा व पोलीसबळ तैनात केले.आम्ही काय दरोडेखोर आहोत काय.अशा शब्दात ग्रानस्थांनी संतप्त भावना व्यक्त केल्या.

LEAVE A REPLY

*