विश्वचषकासाठी आज भारतीय संघाची घोषणा

0
मुंबई । विश्वचषकासाठी भारतीय संघाची घोषणा उद्या सोमवारी मुंबईमध्ये होणार आहे. विश्वचषकासाठीच्या बहुतेक खेळाडूंची निवड निश्चित मानली जात असली तरी दुसरा यष्टीरक्षक आणि चौथ्या क्रमांकाचा फलंदाज म्हणून कोणाचा विचार होणार याबद्दल उत्सुकता आहे.

2015 च्या विश्वचषकानंतर भारतीय संघाने चौथ्या क्रमांकासाठी अनेक प्रयोग केले. पण यातील एकही प्रयोग यशस्वी झाला नाही. मागच्या वर्षी ऑक्टोबर महिन्यापासून भारताने अंबाती रायडूला चौथ्या क्रमांकावर संधी दिली तरी ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या एकदिवसीय मालिकेमध्ये रायडू अपयशी ठरल्यामुळे चौथ्या क्रमांकासाठी पुन्हा एकदा नव्या नावाची चर्चा सुरू आहे. रायडूऐवजी विजय शंकरला संधी मिळू शकते. त्याने गेल्या काही महिन्यांमध्ये त्याच्या फलंदाजीची चुणूक दाखवली आहे. तसेच इंग्लंडच्या वातावरणामध्ये मध्यमगती गोलंदाज म्हणून विजय शंकरचा गोलंदाजीसाठी फायदा होऊ शकतो. अशात निवड समिती, कर्णधार विराट कोहली आणि प्रशिक्षक रवी शास्त्री विजय शंकरच्या नावाला पसंती देऊ शकतात.

विश्वचषक संघात दुसरा यष्टीरक्षक म्हणून दिनेश कार्तिक किंवा ऋषभ पंत यांच्यापैकी एकाला संधी मिळू शकते. धोनी विश्वचषकासाठी भारताचा पहिला यष्टीरक्षक असेल, हे निश्चित आहे. भारताकडून सलामवीर म्हणून के.एल. राहुलला संधी मिळण्याची शक्यता आहे. भारतीय संघात हार्दिक पंड्याही पुनरागमन करेल.

विश्वचषकासाठी भारताचा संभाव्य संघ : विराट कोहली (कर्णधार), रोहित शर्मा (उपकर्णधार), शिखर धवन, ऋषभ पंत, केदार जाधव, एम.एस. धोनी, हार्दिक पंड्या, भुवनेश्वर कुमार, जसप्रीत बुमराह, मोहम्मद शमी, कुलदीप यादव, युझवेंद्र चहल, रवींद्र जडेजा, के.एल. राहुल, विजय शंकर.

LEAVE A REPLY

*