विशेष भूसंपादन अधिकार्‍यांची खुर्ची जप्त

0
धुळे । दि.12 । प्रतिनिधी-भूसंपादीत जमिनीचा मोबदला देण्यास टाळाटाळ केल्याने विशेष भूसंपादन अधिकारी पंकज चौबळ यांची खुर्ची आज जप्त करण्यात आली. तक्रारदार शेतकर्‍यांमार्फत ही कारवाई करण्यात आली.
मौजे नांथे, अजंदे बुद्रुक, भावेर, पिंपळतांडे या शिरपूर तालुक्यातील शेतकर्‍यांच्या जमिनी निम्न तापीप्रकल्प पाडळसरे पाटबंधारे विभाग अंमळनेर साठी संपादीत झालेल्या आहेत.
विशेष भूसंपादन अधिकार्‍यांनी दिलेल्या निवाड्याप्रमाणे हेक्टरी 72 हजार रुपये एवढी रक्कम शेतकर्‍यांना मिळाली आहे. मात्र सदरची रक्कम कमी मिळाल्याने शेतकर्‍यांनी दिवानी न्यायालयात धाव घेतली होती.

त्यावर न्यायालयीन प्रक्रिया पूर्ण होवून वाढीव भरपाई रक्कम तीन लाखाप्रमाणे मिळावी असा निकाल दिला आहे. मात्र साडेतीन वर्ष होवून देखील सदरची रक्कम शेतकर्‍यांना मिळालेली नाही.

या रक्कम वसुलीसाठी शेतकर्‍यांनी दरखास्त दाखल केले आहे. वाढीव रक्कम न दिल्याने विशेष भूसंपादन अधिकारी क्र.1 धुळे, कार्यकारी अभियंता हातनुर कालवा चोपडा यांची जंगम मालमत्ता जप्तीचे आदेश न्यायालयाने दिले आहे.

या आदेशानुसार 23 फेब्रुवारी 2017 रोजी कोर्टाचे बेलिफ भूसंपादन अधिकार्‍याकडे गेले असता त्यांनी अवमान करून शेतकर्‍यांना अपमानास्पद वागणूक दिली होती.

त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांकडे शेतकर्‍यांनी तक्रार दिली होती. त्यानंतरही दखल न घेतल्याने आज चौबळ यांची खुर्ची जप्त करण्याची कारवाई करण्यात आली.

शेतकर्‍यांचे भूसंपादीत जमिनीच्या वाढीव रक्कमेपोटी एकूण 91 लाख रुपये शेतकर्‍यांचे घेणे आहे. ही रक्कम मिळत नसल्याने कोर्टाच्या आदेशावरुन ही कारवाई करण्यात आली.

आमच्या जमिनी संपादीत करुन त्यासाठीचा वाढीव मोबदला देण्यास टाळाटाळ केली जात आहे असे गोपालसिंग राजपूत, सुनिल राजपूत, दशरथ राजपूत, योगेंद्रसिंग राजपूत, मीनाबाई पाटील, राजेंद्रसिंग राजपूत आदिंनी सांगितले.

LEAVE A REPLY

*