Type to search

नंदुरबार

विविध मागण्यांसाठी कॉंग्रेसचे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर आंदोलन

Share

नंदुरबार | केंद्र सरकारच्या चुकीच्या धोरणांमुळे आर्थिक मंदीचे वातावरण निर्माण झाले आहे. आर्थिक मंदीमुळे अनेक उद्योगधंदे व्यवसाय आणि सेवा ठप्प झालेल्या आहेत. परिणामी युवक, शेतकरी, शेतमजूर तसेच समाजातील गरीब आणि दारिद्र्यरेषेखालील लोकांना त्रास सहन करावा लागत असल्याचा आरोप आ.चंद्रकांत रघुवंशी यांनी केला असून विविध मागण्यांसाठी जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी प्रशासनाला विविध मागण्यांचे निवेदन सादर केले आहे. यावेळी कार्यकर्ते व पदाधिकार्‍यांनी जिल्हाधिकारी कार्यालयाच्या पायर्‍यांवर बसून शासनविरोधी घोषणाबाजी दिल्या.

याबाबत जिल्हा कॉंग्रेस कमिटीच्या वतीने देण्यात आलेल्या निवेदनात म्हटले आहे की, ७० वर्षात देशाच्या वित्तीय क्षेत्रात कधी नव्हे अशी परिस्थिती आल्याने निती आयोगाचे अध्यक्ष राजीव कुमार यांनी मध्यमवर्गीयांच्या उत्पन्नवाढीसाठी खासगी क्षेत्राला गुंतवणुकीसाठी प्रोत्साहित करण्याचा सल्ला सरकारला दिला आहे. माजी पंतप्रधान डॉ.मनमोहन सिंग यांनी अर्थव्यवस्थेला चिंताजनक परिस्थितीतून बाहेर काढण्यासाठी सरकारला विवेकी, विचारी लोकांशी चर्चा करून सुडाचे राजकारण सोडून अर्थव्यवस्था सुधारण्यासाठी उपाययोजना करण्याचे आवाहन केले आहे.

युपीए सरकारच्या कार्यकाळात २०१०-११ मध्ये १०.८ टक्के असलेला जीडीपी २०१९ मध्ये भाजप सरकारच्या काळात ५ टक्क्यांपर्यंत आला असल्याचे निवेदनात नमूद करण्यात आले आहे. निवेदनावर आ.चंद्रकांत रघुवंशी, जिल्हा परिषदेचे बांधकाम सभापती दत्तू चौरे, शेतकरी सहकारी संघाचे अध्यक्ष बी.के पाटील, कॉंग्रेसचे तालुकाध्यक्ष डॉ. सयाजीराव मोरे, जिल्हा सरचिटणीस सुरेश शिंदे, कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती किशोर जिल्हा मजूर फेडरेशनचे माजी सभापती किरण पाटील,कृउबास माजी सभापती देवमन पवार, पंचायत समितीचे माजी सदस्य संतोष धनगर, आदींच्या स्वाक्षर्‍या आहेत.

आरोग्य सेवांची स्थिती चिंताजनक
आरोग्य सेवांची स्थिती अतिशय चिंताजनक असून बालक व मातामृत्यू रोखण्यात सरकारला अपयश आले आहे. २०१४ ते २०१९ या कालावधीत राज्यात १ लाख ९ हजार ६८३ बालकांच्या तर ६५११ गरोदर मातांचा मृत्यू झाला आहे. त्याचप्रमाणे चालू वर्षी स्वाइन फ्लूने १९७ रुग्णांच्या बळी गेला आहे. जिल्हा रुग्णालय, उपजिल्हा व ग्रामीण रुग्णालय यांसह प्राथमिक आरोग्य केंद्राच्या भार कंत्राटी कर्मचार्‍यांवर आहे. आरोग्याच्या हेळसांडपणास अप्रशिक्षित कंत्राटी कर्मचारी आणि रुग्णालयांतील दुरवस्था कारणीभूत असल्याचा आरोप निवेदनातून करण्यात आला आहे.

जनतेच्या प्रश्नांची तातडीने पाऊले उचलावीत
कॉंग्रेस मुक्त भारत अशी घोषणा करणार्‍या भाजपला देशात विरोधी पक्षच नको आहे. या सरकारच्या नाकर्त्या धोरणाच्या विरोधात देशात प्रमुख विरोधी पक्ष म्हणून कॉंग्रेस आवाज उठवण्याचे कार्य करीत असून, जनतेत मोठ्या प्रमाणावर जनजागृती करीत आहे. आर्थिक मंदी, बेरोजगारी, शेतकरी आत्महत्या, महागाई, गुन्हेगारी, महिला अत्याचार आदि प्रश्नांच्या सोडवणुकीसाठी सरकारने तातडीने पावले उचलावीत.
-आ.चंद्रकांत रघुवंशी

निवेदनातील मागण्या
*शेतकर्‍यांना कर्ज आणि थकीत वीज बिलातून मुक्त करावे
* पूरग्रस्त,अवर्षणग्रस्त भागातील शेतकर्‍यांचे संपूर्ण कर्ज माफ करावे
* सरकारी निर्बंध हटवून शेतकर्‍यांना तंत्रज्ञानाचे स्वातंत्र्य द्यावे
* आंतरराष्ट्रीय आयात आणि निर्यात धोरणातील सरकारी हस्तक्षेप थांबवावा
* साप चावून मरण पावलेल्या शेतकर्‍यांना वन्यजीव कायद्याप्रमाणे अनुदान द्यावे
* सातव्या वेतन आयोगाप्रमाणे भत्ते लागू करावेत
* रिक्त पदे भरून बेरोजगार युवकांना नोकर्‍या द्याव्या

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!