विविध मागण्यांसाठी अकोलेत किसान सभेची निदर्शने

0

सरकारच्या श्रमिक विरोधी धोरणांचा धिक्कार

 

अकोले (प्रतिनिधी)- शेतकरी कष्टकर्‍यांच्या विविध मागण्यांना वाचा फोडण्यासाठी अकोले येथे तहसील कार्यालयासमोर किसान सभेच्यावतीने तीव्र निदर्शने करण्यात आली. निराधार योजनेच्या लाभार्थ्यांच्या विविध समस्यांनाही यावेळी वाचा फोडण्यात आली.

 
किसान सभेच्यावतीने या प्रश्नांवर यापूर्वी अकोले तहसीलदार यांना आठ दिवसांपूर्वी निवेदन देण्यात आले होते. प्रश्न न सुटल्यास आंदोलन करण्याचा इशारा देण्यात आला होता. आठ दिवस जाऊनही प्रश्न न सुटल्यामुळे ही निदर्शने करण्यात आली. निदर्शनापूर्वी येथील मार्क्सवादी कार्यालयापासून मोर्चा काढण्यात आला. सरकारच्या श्रमिक विरोधी धोरणांचा धिक्कार करीत निघालेल्या या मोर्चात मोठ्या संख्येने श्रमिक सहभागी झाले होते.

 
निदर्शनांनंतर संपन्न झालेल्या सभेत सर्वच वक्त्यांनी केंद्रातील मोदी सरकारवर व राज्यातील फडणवीस सरकारवर अत्यंत कडक शब्दांत टीका केली. स्थानिक मागण्या मान्य करून लेखी घेतल्याशिवाय आंदोलन मागे घेणार नसल्याची भूमिका घेतल्याने स्थानिक प्रशासनाने आंदोलकांच्या अनेक मागण्या मान्य करत यासंबंधी लेखी दिले. यानंतर घोषणांच्या निनादात आंदोलनाची सांगता झाली.

 

किसान सभेचे जिल्हा कार्याध्यक्ष सदाशिव साबळे, जिल्हा सचिव नामदेव भांगरे, दामू भांगरे, साहेबराव घोडे, लक्ष्मण पथवे, ज्ञानेश्वर काकड, जनवादी महिला संघटनेच्या हलीमा पठाण, आराधना बोर्‍हाडे, जुबेदा मणियार आदींनी मोर्चाचे नेतृत्व केले. दारूबंदी आंदोलनाच्यावतीने हेरंब कुलकर्णी यांनीही मोर्चास पाठिंबा दिला.

 

सर्व शेतकर्‍यांचे कर्ज माफ करा. शेतीमालाला स्वामिनाथन समितीच्या शिफारशीप्रमाणे हमी भाव द्या. वन जीमिनींचे केलेले रतनवाडी व इतर गावांचे दावे स्वीकारा. वन जमीन कसणार्‍यांचे नावे करा. अकोले तालुक्यातील निराधार पेन्शन योजनेच्या लाभार्थींचे मानधन अनेक महिन्यांपासून प्रलंबित आहे. सदरचे मानधन त्वरीत लाभार्थ्यांच्या खात्यावर वर्ग करा. तालुक्यात अनेक गरीब निराधार योजनेच्या लाभापासून वंचित आहेत. गावोगाव लाभार्थी नोंदणीची मोहीम घेऊन सर्व पात्र लाभार्थींना मानधन सुरू करा. अन्न सुरक्षेच्या यादीत नवीन पात्र लाभार्थ्यांंचा समावेश करा. अकोले तालुक्यात संपूर्ण दारूबंदी लागू करा या  मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

LEAVE A REPLY

*