विवाहितेने आई समक्ष जाळून घेतले

0

सासू, सासरे व पतीस अटक, उंबरगाव परिसरातील घटना, विवाहितेचे माहेर भोकर

भोकर (वार्ताहर) – श्रीरामपूर तालुक्यातील भोकर येथील माहेर असलेल्या नवविवाहितेचा भोसलेवाडी येथे सासरी आई समक्ष जळून घेतल्याने मृत्यू झाला असून याप्रकरणी शहर पोलिसात सासरच्या तिघांविरुद्ध आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या प्रकरणी सासू, सासरे व पती या तिघांना अटक करण्यात आली असून मृतदेहाचा काल शोकाकूल वातावरणात दफनविधी करण्यात आला.
भोकर येथील सामाजीक कार्यकर्ते कै.अरविंद रामचंद्र आहेर यांची कन्या कविता हिचा तीन वर्षापूर्वी उंबरगाव परिसरातील भोसलेवाडी येथील सुरेश बर्डे यांच्याशी विवाह झाला. कविताच्या विवाहाला तीन वर्ष होऊनही तिला मूलबाळ होईना म्हणून तिची सासू, सासरे व पती यांच्याकडून नेहमी तिचा छळ केला जायचा. तिला नेहमी मारहाण व शिवीगाळ केली जायची. तिचे वडील काही महिन्यांपूर्वी मरण पावले असल्याने तिचा आधार तुटला होता. याचा फायदा घेऊन सासरची मंडळी नेहमी त्रास देत असत.

त्याप्रमाणे गेल्या आठवड्यात तिला सासरची मंडळी त्रास देऊ लागल्याने तिची आई शकुंतला अरविंद आहेर ही मुलीच्या घरी समजावून सांगून काही दिवस माहेरी आणण्यासाठी गेली असता मंगळवार 9 मे रोजी दुपारी बारा वाजेच्या सुमारास शंकुतला आहेर व तिच्या सासरच्यांची बाचाबाची सुरू झाली. त्यावेळी तिला नेऊ नका, तिला काम जीवावर येते, आजारी असल्याचे कारण सांगून घरात झोपा काढते असे आरोप केले. तसेच लग्न होऊन किती वर्षे झाले तरी तिला मूलबाळ का होत नाही? असे म्हणत तिला व आईला शिवीगाळ सुरू केली.

आपल्या समक्ष आपल्या आईला व माहेरच्यांना शिवीगाळ करत असल्याचा अपमान व नेहमीचा होत असलेला छळ सहन न झाल्याने घराजवळच असलेल्या बाथरूममध्ये जावून कविता हिने अंगावर रॉकेल ओतून घेऊन पेटवून घेतले. यावेळी तिची आई शकुंतला हीतेथेच होती डोळ्यादेखत मुलगी जळते हे बघून तिने तीच्या अंगावर गोधडी टाकून विझविण्याचा प्रयत्न केला त्यात ती गंभीर जखमी झाली.
त्यानंतर होरपळलेल्या विविहितेला तातडीने साखर कामगार हॉस्पीटलमध्ये दाखल करण्यात आले. ते सायंकाळी सात वाजेच्या सुमारास तिची प्राणज्योत मालवली. काल तिचे शवविच्छेदनानंतर शोकाकुल वातवरणात तिचा दफनविधी झाला.
या प्रकरणी शहर पोलीस ठाण्यात कविताचा भाऊ योगेश अरविंद आहेर यांनी दाखल केलेल्या फिर्यादीवरून पती सुरेश धोंडीराम बर्डे, सासरा धोंडीराम सुकदेव बर्डे, सासू सुमन धोंडीराम बर्डे व मावस सासू बेबी बर्डे(पुर्ण नाव माहीत नाही) यांच्या विरूद्ध भादंवि.स. 306, 498(अ), 34 प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपी असलेले पती सुरेश बर्डे, सासरा धोंडीराम बर्डे व सासू सुमन बर्डे यांना पोलीसांनी अटक केली असून मावस सासू बेबी बर्डे हिचा शोध सुरू आहे. आरोपींना आज न्यायालयात दाखल केले जाणार आहे.
याप्रकरणी पुढील तपास पो.नि. प्रवीण लोखंडे यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक मोहन भोसले, पो.काँ. अमोल जाधव करत आहेत.

LEAVE A REPLY

*