विवाहितेची मुलीसह आत्महत्या

0

श्रीगोंदा (प्रतिनिधी) – तालुक्यातील हिरडगाव येथिल विवाहितेने सासरी होत असलेल्या शारिरीक व मानसिक छळास कंटाळून आपल्या दीड वर्षांच्या मुलीसह विहिरीत उडी घेऊन आत्महत्या केली. मयताचे नाव सीमा बापू कांबळे (वय-22) व स्वरा बापू कांबळे (वय- दीड वर्ष) असे आहे. याप्रकरणी पती, सासू, दोन नणंदेसह पाच जणांवर आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल केला आहे.

 

 

कर्जत तालुक्यातील निंबोडी येथील सीमा उदमले यांचा विवाह मार्च 2015 मध्ये श्रीगोंदा तालुक्यातील हिरडगाव येथील बापू देविदास कांबळे यांच्याशी झाला होता. विवाह झाल्यानंतर काही दिवसांतच सासरच्या मंडळींचा त्रास सुरू झाला. महिनाभरापूर्वी सीमा शेतात खुरपण्याचे काम करत असताना मागे राहिल्याने पती बापू कांबळे याने चिंचेच्या झाडाला बांधून मारहाण केली होती. अशाच होणार्‍या सासरच्या छळाला कंटाळून ती माहेरी गेली होती.

 

 

मात्र पुन्हा तिच्या भावाने आणि आईने समजूत घालून हिरडगाव येथे सासरी आणून सोडले होते. मात्र यानंतर तिला उपाशी ठेवणे, मारहाण करणे अशा घटना रोजच घडत होत्या. पती, सासू, आजी सासू, दोन नणंदा व आजा सासरा यांच्या होणार्‍या नेहमीच्या छळाला कंटाळून सीमा ही आपल्या दीड वर्षांच्या मुलीसह दि. 29 पासून घरातून निघून गेली होती. त्यानंतर तीचा शोध घेतला असता काल 30 रोजी सीमा व दीड वर्षाच्या स्वराचा मृतदेह शेजारील वस्तीवर असलेल्या विहिरीत आढळून आला.

 

 

याबाबत सीमाचा भाऊ हनुमंत अशोक उदमले (रा. निंबोडी, ता. कर्जत) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून पती बापू देविदास कांबळे, सासू संगीता देविदास कांबळे, नणंद सीमा देविदास कांबळे, आजी सासू भामा रामदास ठवाळ, आजा सासरा रामदास ठवाळ, नणंद स्वाती दीपक गोरे यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

LEAVE A REPLY

*