विरोधकांच्या मागणीला कात्रजचा घाट

0

स्वच्छतेचा ठेका देण्यासाठी पाथर्डी पालिकेची विशेष बैठक

पाथर्डी (प्रतिनिधी) – पाथर्डी शहर स्वच्छतेच्या संदर्भात आयोजित करण्यात आलेल्या विशेष बैठकीत विरोधकांच्या विविध मागण्यांना कात्रजचा घाट दाखवत सत्ताधार्‍यांकडून आपल्या मर्जीतील ठेकेदाराला स्व्चछतेचा ठेका दिला. यामुळे शहर स्व्चछतेचा दिलेला ठेका सुरू होण्याअगोदरच संशयाच्या भोवर्‍यात सापडला. स्वच्छतेच्या अनेक आरोप-प्रत्यारोपाने पाथर्डी नगरपालिकेची बैठक चांगलीच गाजली.
पाथर्डी शहर स्वच्छतेच्या ठेक्याची मुदत संपल्यामुळे नगराध्यक्ष डॉ. मृत्युंजय गर्जे यांच्या अध्यक्षतेखाली स्वच्छतेचा ठेका कोणाला द्यायचा या संदर्भात नगरपालिका कार्यालयात विशेष बैठकीचे आयोजन करण्यात आले होते. या बैठकीला मुख्याधिकारी वसुदा कुरणावळ या शेवगाव येथे टंचाई आढावा बैठकीला उपस्थित असल्याने गैरहजर होत्या. तर उपनगराध्यक्ष बजरंग घोडके, गटनेते नंदकुमार शेळके, बंडू बोरुडे, महेश बोरुडे, नामदेव लबडे, अनिल बोरुडे, मंगल कोकाटे, सुनीता डोमकावळे, दुर्गा भगत, संगीता गटानी, आशिया मणियार, सुनीता बुचकूल आदी उपस्थित होते.
शहर स्वच्छतेच्या ठेक्याबाबत एकूण चार निविदा पालिका कार्यालयाला प्राप्त झाल्या होत्या. त्यात सहा लाख 89 हजार रुपयांची नाशिक येथील मॅक्रो इकॉनामिकल इनव्हायरमेंट सोल्यूशन प्रा. लि. या कंपनीची निविदा सर्वात कमी रुपयाची असल्याची माहिती सभागृहाला देण्यात आली. यावेळी विरोधी गटाचे बंडू बोरुडे यांनी विरोध करत ठेकेदाराकडून किती मजूर देण्यात येणार, किती गाड्या असणार, अटी व शर्ती काय राहणार हे सभागृहाला सांगावे, त्यानंतरच ठेका मंजूर करण्यात यावा अशी मागणी करण्यात आली.
परंतु सत्ताधारी गटाकडून विरोधकांच्या मागणीला कात्रजचा घाट दाखवत स्वच्छतेची निविदा मंजूर करण्यात आली. मागील नगरपरिषदेचा शहर स्वच्छतेचा ठेका ठाणे येथील कंपनीला देण्यात आला होता. मात्र प्रत्यक्षात काम कोण काम करत होते हे जगजाहीर आहे. ठेक्याची मासिक रक्कम कोणकोण वाटून घेत होते हे सुद्धा शहरातील नागरिकांना माहीत आहे. या बाबत काही सत्ताधारी नगसेवकांनी मागील बैठकीत मुद्दा उपस्थित करत चौकशीची मागणी केली होती.

मात्र त्याबाबत कुठलेही पाऊल न उचलता ‘तेरी भी चूप और मेरी भी चुप’ असे म्हणत नवीन काम चांगले करू असे आश्वासन देत मूळ प्रश्नावर पडदा टाकला गेला. स्वच्छतेचा ठेका देण्यापेक्षा पालिकेने स्वतः हे काम करावे अशी मागणी केली. मात्र नगराध्यक्ष गर्जे यांनी पालिकेकडे पुरेसा कर्मचारी वर्ग नसल्याने पालिकेला हे काम करता येणार नाही असे सांगितले.

स्वच्छ भारत अभियानात दाखवण्यात आलेला खर्च डोळे दिपविणारा असून विविध कामांत लाखो रुपयांचा अनावश्यक खर्च दाखवण्यात आला असल्याचा आरोप बंडू बोरुडे यांनी केला. तर नगरसेवक अनिल बोरुडे यांनी ठेकेदाराने कामात हलगर्जीपणा केल्यास ठेकेदाराला दंड करण्याची मागणी केली. सन 2017-18 साठीचा शहर स्वच्छतेचा ठेका देण्यासंदर्भात बोलावण्यात आलेली विशेष सभा अवघ्या 10 मिनिटांत गुंडाळून ई-निविदा मंजुरीचा फार्स पूर्ण करण्यात आला असल्याचा आरोप विरोधकाकांडून करण्यात आला.

LEAVE A REPLY

*