विज्ञानावर सरकारचा अविश्वास?

0
राज्यातील मेळघाटासह इतर आदिवासी भागात कुपोषणाने होणारे बालमृत्यू रोखण्यासाठी राज्य सरकार आता मांत्रिकांची मदत घेणार असल्याच्या बातम्या नुकत्याच प्रसिद्ध झाल्या आहेत. बातमी धक्कादायक असली तरी ती खरी आहे. पुरोगामी महाराष्ट्रातील पुरोगामी सरकारनेच तसा निर्णय घेतला आहे. कुपोषण व बालमृत्यूंच्या जुनाट समस्येबाबत मुंबई उच्च न्यायालयात अनेक जनहित याचिका प्रलंबित आहेत.

या समस्या सोडवण्यासाठी प्रभावी उपाय सुचवावेत, अशी सूचना न्यायालयाने राज्य सरकारला केली होती. त्यानुसार सरकारने ‘अभ्यास’ केला आणि काही उपाय न्यायालयापुढे अधिकृतपणे सादर केले. तांत्रिक-मांत्रिकांची मदत घेण्याच्या इराद्याचाही त्या उपायात समावेश आहे. उपाय सुचवून सरकार थांबले नसून लगबगीने त्याची सुरुवातही केली आहे. अंगारे-धुपार्‍याने रुग्ण बरे करण्याचा दावा करणार्‍या तांत्रिक-मांत्रिकांच्या तावडीतून आदिवासी बांधवांची सुटका करण्याऐवजी राज्याचा आरोग्य विभाग त्यांचीच मदत घेत आहे.

आदिवासी भागातील रुग्णांना सरकारी दवाखाने आणि रुग्णालयांकडे आणणार्‍या तांत्रिक-मांत्रिकांना रुग्णामागे दोनशे रुपये देण्याची योजना आरोग्य विभागाने सुरू केली आहे. अल्पवयीन मुलींचे विवाह, बालवयातच गर्भधारणा आणि मुदतपूर्व बाळंतपणे ही मेळघाटातील बालमृत्यूंची मुख्य कारणे आहेत. त्यावरही सरकारने उपाय सुचवला आहे. अठरा वर्षे पूर्ण असलेल्या मातेला पहिले अपत्य मुलगी झाल्यास त्या मुलीच्या नावे सरकार पन्नास हजार रुपये मुदत ठेव ठेवील. ती मुलगी अठरा वर्षांची झाल्यावर तिला ते पैसे मिळतील.

तुटपुंज्या बक्षिसीला भाळून तांत्रिक-मांत्रिक त्यांच्याकडील ‘गिर्‍हाईके’ सरकारी दवाखान्याकडे वळवतील हा कयासच सरकारचे अंधश्रद्धाळू द्रष्टेपण नाही का? सरकारचा वैज्ञानिक दृष्टिकोन आणि आधुनिक आरोग्य विज्ञानावरचा विश्वास डळमळीत झाला आहे का? सरकारी बक्षिसीपेक्षा उपचाराच्या नावाखाली आदिवासींकडून तांत्रिक-मांत्रिकांना जास्त पैसे मिळत असण्याची शक्यता आहे.

अशा स्थितीत त्यांना दोनशे रुपयांचा मोह पुरेसा ठरेल का? तसा तो ठरत असेल तरी त्यांचा वापर करण्याचा पुरोगामी सरकारचा इरादा वैज्ञानिक दृष्टिकोन व आधुनिक आरोग्य विज्ञानाबद्दल जनतेच्या मनात साशंकता निर्माण करणारा ठरण्याची शक्यता मात्र जास्त आहे. सरकारच्या या अशास्त्रीय भूमिकेबद्दल न्यायालय काय भूमिका घेते याची उत्सुकता जनतेला नक्कीच लागली आहे. मात्र आदिवासी संस्कृतीतसुद्धा काही उपयुक्त पद्धती असण्याचा संभव आहे. विज्ञानाच्या कसोटीवर त्या तपासून सर्वांसाठी त्याचा वापर करण्याचा विचार जरूर व्हावा.

LEAVE A REPLY

*