विचारप्रबोधन का थांबले?

0
पुरोगामी विचारसरणीचा वारसा मिरवणार्‍या महाराष्ट्रात समाजावरील अंधश्रद्धांचा आणि अनिष्ट रुढींचा पगडा अजूनही घट्टच आहे याचा प्रत्यय वारंवार येत आहे. श्रद्धेच्या नावाखाली अमानुष घटना घडत आहेत. गुप्तधनाच्या लालसेने 2 वर्षांच्या निष्पाप चिमुरड्याचा बळी गेला आहे. ही दुर्दैवी घटना चंद्रपूर जिल्ह्यातील खंडाळा गावात घडली. चॉकलेटचे आमिष दाखवून घरासमोर खेळणार्‍या ‘युग’चे अपहरण करण्यात आले होते.

शोधाअंती त्याचा मृतदेहच कुटुंबियांच्या हाती लागला. त्याच्या मृतदेहावर खुणा केलेल्या होत्या. घराशेजारी राहणार्‍या तांत्रिकाने आणि अन्य दोघांनीच त्याचा बळी घेतल्याचे पोलीस तपासात उघड झाले आहे. महाराष्ट्राला थोर समाजसुधारकांचा आणि समाजातील अंधश्रद्धांवर प्रहार करणार्‍या संतांचा वारसा आहे. त्या महाराष्ट्रात आजही माणसे अंधश्रद्धांना बळी पडतात याला काय म्हणावे? माणसे सहज दुसर्‍या माणसाच्या जीवावर उठतात, कोवळ्या जिवांचा बळी घेतात यावर विश्वास कसा बसावा? पण तशा घटना थांबत नाहीत.

काळ बदलत आहे. रोज नवनवे शोध लागत आहेत. समाजमाध्यमांचा बोलबाला वाढत आहे. अत्याधुनिक साधनांनी माणसाचे जगणे सोपे झाले आहे. पण हा बदल फक्त वरवरचा आहे का? प्रत्यक्षात माणसाची वाटचाल उलट्या दिशेने सुरू झाली आहे का? मनामनावरील अंधश्रद्धांचा विळखा कमी करण्यासाठी शासन फक्त कायदे करते. त्या कायद्यांची योग्य अंमलबजावणी का होत नाही? तेवढे झाले तरी परिस्थितीती आशादायक बदल होऊ शकतील.

पण समाजाची मानसिकता बदलणे ही सामूहिक व काहीअंशी वैयक्तिक जबाबदारी आहे. त्यासाठी सामाजिक मुद्यांवर, समस्यांवर आणि अनिष्ट रुढी परंपरांवर विचारमंथन आणि चिंतन पुरेसे नाही. कायद्याच्या बडग्याने त्यावर प्रहारसुद्धा होणे जरूर आहे. पूर्वी माणसांकडे फावला वेळ बराच होता. त्यावेळेत माणसे ठिकठिकाणी एकत्र जमत. विनोदाने पारावर गप्पा मारत वेळ घालवणार्‍यांना रिकामटेकडे समजून या चांगल्या प्रथांचे उच्चाटन झाले आहे.

ते समाजाच्या जडणघडणीला अनिष्ट ठरले का? चार माणसे एकत्र जमली की बोलण्याच्या ओघात सामाजिक दोषांचा विचार सहजपणे होत असे. ते वातावरण आज राहिलेले नाही. अत्याधुनिक साधनांच्या अतिवापरामुळे ही प्रक्रियाच संपुष्टात आली आहे. माणूसपणाच्या जाणिवा रुजण्यासाठी आणि त्या विकसित होण्यासाठी फावला वेळही उपयुक्त ठरतो. समाजाच्या वेगवेगळ्या थरात त्यामुळे विचारमंथन सुरू राहते. ती प्रक्रिया पुढे चालू राहील असे नवे पर्याय विचारवंत सुचवतील का?

LEAVE A REPLY

*