विखे परिवाराच्या प्रत्येक घटकात स्वतंत्र इतिहास निर्माण करण्याची क्षमता : शिंदे

0

महाराष्ट्रातील पहिले पायोनियर काम बाळासाहेबांचे : कदम

 

लोणी (वार्ताहर) –  बाळासाहेब विखे पाटील ही मूर्ती लहान होती, पण दिल्लीत त्यांनी सर्वसामान्यांची बाजू भक्कमपणे मांडून राज्याला आणि विशेषतः नगर जिल्ह्याला न्याय देण्याचे काम केले. पद्मश्री विखे पाटील, बाळासाहेब विखे पाटील, राधाकृष्ण विखे पाटील व परिवाराच्या प्रत्येक घटकात स्वतंत्र इतिहास निर्माण करण्याची क्षमता असल्याचे गौरोद्वगार माजी केंद्रीय मंत्री डॉ. सुशीलकुमार शिंदे यांनी काढले तर ग्रामीण भागात शैक्षणिक क्रांती घडवून आणणारे बाळासाहेबांचे काम महाराष्ट्रातील पायोनियर असल्याचे प्रतिपादन माजी मंत्री डॉ. पतंगराव कदम यांनी केले.

 
प्रवरानगर येथे पद्मभूषण डॉ. बाळासाहेब विखे पाटील यांच्या जयंती समारोह व स्मृतिस्थळ भूमिपूजन समारंभात ते बोलत होते. माजी मंत्री बी.जे. खताळ, विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील, साईबाबा संस्थानचे अध्यक्ष सुरेश हावरे, खा. दिलीप गांधी, खा. सदाशिव लोखंडे, आ. स्नेहलता कोल्हे, आ. अरुण जगताप, आ. बाळासाहेब मुरकुटे, आ. भाऊसाहेब कांबळे, आ. राहुल जगताप, जिल्हा परिषदेच्या अध्यक्षा शालिनीताई विखे पाटील, माजी मंत्री अण्णासाहेब म्हस्के, माजी आमदार पांडुरंग अभंग, माजी आमदार नंदकुमार झावरे, माजी आमदार संभाजीराव फाटके, डॉ. सुजय विखे पाटील, नगराध्यक्षा अनुराधा आदिक, नगराध्यक्षा योगिता शेळके, प्रवरा मेडिकल ट्रस्टचे मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र विखे, जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी रवींद्र बिनवडे, अप्पर कार्यकारी अधिकारी अशोक कोल्हे, संजीवनीचे अध्यक्ष बिपीन कोल्हे, गणेशचे अध्यक्ष मुकुंद सदाफळ, राहुरीचे अध्यक्ष उदयसिंह पाटील, धनश्रीताई विखे पाटील, सुभाष पाटील, अण्णासाहेब शेलार, राजेंद्र नागवडे, शिवाजी गाडे, जयंतराव ससाणे, चंद्रशेखर घुले, राहुल झावरे, साईबाबा संस्थानच्या कार्यकारी अधिकारी रुबल अग्रवाल, नंदकिशोर राठी, बापूसाहेब आहेर, बाळासाहेब भवर, पोपटराव लाटे, डॉ. भास्कर खर्डे, हिराबाई कातोरे आदी मान्यवर यावेळी उपस्थित होते.

 

सुशीलकुमार शिंदे म्हणाले की, बाळासाहेब खासदार म्हणून दिल्लीत आले तेंव्हा त्यांची साधी राहणी बघून ते एवढे अभ्यासू असतील असे कुणाला वाटले नाही. मात्र संसद त्यांनी ग्रामीण भागाचा आणि शेतकर्‍यांच्या प्रश्‍नांवर गाजवली. ते केंद्रात मंत्री झाले तरी त्यांचे राहणीमान बदलले नाही. आम्ही मात्र पदानुसार बदललो. मंत्री सुटाबुटात येत व बाळासाहेब कुर्ता, पायजमा आणि टोपी घालून मंत्रीमंडळाच्या बैठकीला जायचे. उत्कृष्ट इंग्रजी बोलायचे. इतर मंत्री म्हणत, ‘आदमी छोटा है लेकीन बात कामकी और आम आदमीकीही करता है’. त्यांनी राज्याच्या हिताचे निर्णय केंद्राला घेण्यास भाग पाडले. ते जेंव्हा बोलायचे तेंव्हा सर्वांच्या नजरा त्यांच्याकडे असायच्या. समाज यामुळेच नेहमी बाळासाहेबांबरोबर राहिला. त्यांनी जी भूमिका घेतली ती लोकांनी मान्य करून त्यांना साथ दिली. सहकार, शिक्षण, शेती, ग्रामीण विकास या क्षेत्रात त्यांनी झोकून काम केले. कर्तृत्व आणि मेहनतीच्या बळावर पद्मश्री व बाळासाहेब मोठे झाले. राधाकृष्णही त्याचपद्धतीने काम करीत आहेत. आजोबा व वडिलांचा कामाचा वारसा सक्षमपणे ते पुढे नेत आहेत. विखे परिवार बाळासाहेबांच्या कार्याचे चिंतन करून नवा समाज उभा करण्याचे काम करीत असा मला विश्‍वास आहे.

 
पतंगराव कदम म्हणाले, सहकारामुळे नगर जिल्ह्याशी माझा घनिष्ठ संबंध आला. पद्मश्री विखे पाटील यांच्यासोबत सहवास लाभला. त्यांच्यासोबत प्रवास करताना त्यांनी आणलेली भाकरी चालत्या गाडीत खाल्ली. तीच सवय मी माझ्या कार्यकर्त्यांना लावली. बाळासाहेब विखे पाटील यांनी सहकार, शिक्षण आणि शेती क्षेत्रात दिलेले योगदान अद्वितीय आहे. त्यांनी लोणीत सुरु केलेले शिक्षणाचे काम महाराष्ट्रात पायोनियर आहे. मला राजकीय जीवनात त्यांचे मोलाचे मार्गदर्शन लाभले. सामान्यांची जाण असलेला ऐवढा मोठा नेता महाराष्ट्रात होणार नाही. त्यांनी संधी खेचून आणली. निवडणुकीत कुणाला पाडायचे आणि कुणाला निवडून आणायचे हे बाळासाहेबांच्या हातात होते. बाळासाहेबांचे स्मारक महाराष्ट्रातील शेतकर्‍यांनी येऊन पहावे असे व्हावे अशी अपेक्षा त्यांनी व्यक्त केली.

 
बी.जे. खताळ पाटील म्हणाले, कार्ल मार्क्स आणि बाळासाहेब विखे पाटील यांचा जन्म दिवस एकाच तारखेला असणे ही गोष्ट जागतिक इतिहासात नोंदली जाणारी आहे. दोघेही नशीबवान होते. मार्क्सच्या सिद्धांताचे अनुकरण बाळासाहेबांनी जीवनात केले. सहकाराच्या माध्यमातून सामान्यांचा उद्धार झाला. पण आज सहकारात असहकाराने प्रवेश केला आहे असे लोकांना वाटते. हे ठीक नाही. हे कबुल केले नाही तर अधोगतिकडे जावे लागेल. सहकार नीट चालवण्यासाठी बाळासाहेबांची आठवण ठेवावी लागेल. पतंगराव कदम यांच्याकडे बघत ते म्हणाले शिक्षण खाजगी झाल्यापासून ते खूप महाग झाले आहे व सामान्यांच्या आवाक्याबाहेर गेले आहे. याचा विचार करण्याची गरज आहे. शिक्षण देणार्‍यांनी याचा विचार करताना मिळालेल्या संधीचा नीट वापर केला का हे बघायला हवे. लोकशाहीची कदर करा. बाळासाहेबांनी जनतेचे प्रश्‍न योग्य पद्धतीने मांडले. पद्मश्रींचा वारसा सक्षमपणे चालवला. राधाकृष्ण यांनी तो वागणे, बोलणे आणि कृतीतून पुढे न्यावा, आमचे तुम्हाला सदैव आशीर्वाद आहेत.

 
नामदार राधाकृष्ण विखे पाटील यांनी स्वागत व प्रास्ताविक करताना सांगितले की, साहेबांनी परिसराचा कायापालट केला. माझ्या राजकीय वाटचालीमागे त्यांचा संपूर्ण आशीर्वाद राहिला. साहेबांच्या निधनाने मोठे संकट उभे राहिले पण सर्वांच्या पाठबळामुळे बळ आणि दिलासा मिळाला. उभारी घेता आली. साहेब हे मायेचे छत्र होते, त्यांची उणीव सतत भासत आहे. साहेबांचे स्मृतीस्थळावर पद्मश्री व साहेबांचे संपूर्ण जीवन वाटचालीची माहिती समाजाला मिळणार आहे. साहेबांच्या सहकार्‍यांच्या उपस्थितीत हा कार्यक्रम करताना विशेष आनंद होतो आहे. सुरेश हावरे यांनी मनोगत व्यक्त केले तर डॉ. सुजय विखे पाटील यांनी आभार मानले.

 

विद्वान नको, स्ट्राँग कॉमन सेन्स पाहिजे : कदम
डॉ. पतंगराव कदम यांनी आपल्या शैलीत भाषण करताना काँग्रेस हायकमांडलाही चिमटे काढले. ते म्हणाले, आपल्या पक्षात दिल्लीवरून आदेश येतो. खाली काय परिस्थिती आहे त्यांना कळत नाही. ते काय आदेश देतात त्यांना कळत नाही आणि आम्ही काय करायचे ते आम्हाला कळत नाही. मलाच उमेदवारी नाकारली मग मी अपक्ष निवडणूक लढलो आणि निवडूनही आलो. एवढी वर्ष आपल्याच पक्षाचे सरकार असताना इंजिनियरिंग, मेडिकल कॉलेजला परवानगी मिळत नव्हती. वसंतदादा पाटील सातवी शिकलेले आणि सुधाकर नाईक पाचवी शिकलेले होते, त्यांनी मला लगेच परवानगी दिली. नुसतेच विद्वान सरकारमध्ये असून चालत नाही तर स्ट्राँग कॉमनसेन्स असलेली माणसं लागतात. असे सांगतानाच सुशीलकुमार शिंदे हायकमांडकडे वकिली करतात.पण त्याचा उपयोग होत नाही असे वाटते, नाही तर काँग्रेसला असे दिवस आले असते का? अशी मिश्किल टीपण्णी करताच सभागृहात एकच हशा पिकला.

LEAVE A REPLY

*