विकासकामांसाठी कालबध्द प्रक्रीया राबवा!- ना. भुसे

0
धुळे / जिल्हा वार्षिक योजना 2017- 2018 चा नियतव्यय वेळेत खर्च होण्यासाठी प्रशासकीय मान्यतेसह विविध प्रक्रिया वेळेत पार पडण्यासाठी कालबध्द प्रक्रिया राबवावी, असे निर्देश पालकमंत्री ना. दादा भुसे यांनी येथे दिले.
जिल्हा नियोजन समितीची आढावा बैठक आज सकाळी नियोजन भवनात झाली. त्यावेळी ते अध्यक्षस्थानावरुन बोलत होते.
यावेळी रोजगार हमी योजना व पर्यटन मंत्री जयकुमार रावल, जि. प.अध्यक्ष शिवाजीराव दहिते, जिल्हाधिकारी डॉ. दिलीप पांढरपट्टे, आमदार अनिल गोटे, आ. डी. एस. अहिरे, आ. कुणाल पाटील, जि.प.मुख्य कार्यकारी अधिकारी डी. गंगाथरण, पोलिस अधीक्षक एम. रामकुमार, निवासी उपजिल्हाधिकारी तुकाराम हुलवळे, जिल्हा नियोजन अधिकारी एम. आर. वाडेकर व्यासपीठावर उपस्थित होते.

पालकमंत्री ना.भुसे म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेत 2017- 2018 करीता 135.67 कोटी रुपयांचा निधी मंजूर आहे. मंजूर होणारा नियतव्यय वेळेत खर्च होईल, अशी दक्षता प्रत्येक विभागप्रमुखाने घेतली पाहिजे.

2017- 2018 या आर्थिक वर्षातील नियोजित नियतव्ययाच्या खर्चासाठी कालबध्द प्रक्रिया पार पाडावी. त्यासाठी 15 जुलै 2017 पर्यंत सर्व विभागांनी प्रशासकीय मान्यतेसाठी प्रस्ताव सादर करावेत.

20 सप्टेंबरपर्यंत प्रशासकीय मान्यतेसह विविध प्रशासकीय प्रक्रिया पार पाडून ऑक्टोबरच्या सुरवातीला कामांना सुरवात होईल, असे नियोजन केले पाहिजे, असेही पालकमंत्री श्री. भुसे यांनी नमूद केले.

जिल्हा वार्षिक योजना 2016- 2017 अंतर्गत आदिवासी उपयोजना व ओटीएसपीसाठी एकूण रुपये 15725.44 लक्ष निधी मंजूर झालेला होता.

त्यापैकी रुपये 15490.85 लक्ष निधी खर्च झालेला आहे. खर्चाची टक्केवारी 98.50 टकके आहे. जिल्हा वार्षिक योजना 2016- 2017 अंतर्गत अनुसूचित जाती उपयोजनासाठी एकूण रुपये 2597.00 लक्ष निधी मंजूर झालेला होता. त्यापैकी रुपये 2236.01 लक्ष निधी खर्च झालेला आहे.

खर्चाची टक्केवारी 93.36 टक्के आहे. जिल्हा वार्षिक योजना 2016- 2017 अंतर्गत सर्वसाधारण योजनेसाठी एकूण रुपये 14556.00 लक्ष निधी मंजूर झालेला होता. त्यापैकी रुपये 14553.28 लक्ष निधी खर्च झालेला आहे. खर्चाची टक्केवारी 99.98 टक्के आहे, असेही यावेळी सांगितले.

रोजगार हमी योजना मंत्री श्री. रावल म्हणाले, जिल्हा वार्षिक योजनेच्या माध्यमातून जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी नावीण्यपूर्ण उपक्रम राबवावेत. जिल्ह्याच्या सर्वांगीण विकासासाठी विभागप्रमुखांनी नियोजन करावे, असेही त्यांनी नमूद केले.

 

LEAVE A REPLY

*