वाहतूक कोंडी अन् अतिक्रमणाचा विळखा

0

आ. जगताप यांचे जिल्हाधिकार्‍यांना पत्र

अहमदनगर (प्रतिनिधी)- नगर शहरात वाहतूक कोंडी नित्याची झाली असून प्रवासी नागरिकांच्या मनात नगरचे वेगळे चित्र निर्माण होत आहे. शहरातील वाहतूक कोंडीवर उपाययोजना कराव्यात अशी मागणी शहराचे आमदार संग्राम जगताप यांनी जिल्हाधिकार्‍यांकडे केली आहे. सीना नदीपात्रातील अतिक्रमणे हटविण्याची मागणीही जगताप यांनी स्वतंत्रपणे जिल्हाधिकार्‍यांकडे मंगळवारी केली.
जगताप यांनी मंगळवारी सकाळी जिल्हाधिकारी अभय महाजन यांची भेट घेऊन वाहतूक कोंडी व सीना नदीपात्रातील अतिक्रमण यावर चर्चा केली. नगर-पुणे व नगर-औरंगाबाद महामार्ग नगर शहरातून जातात. याच मार्गावर असणार्‍या स्वस्तिक चौक ते महावीर कलादालन येथून अवैध प्रवासी वाहतूक सुरू असते. याच ठिकाणी अवैध प्रवासी वाहतूक करणार्‍या जीप, खासगी बसेस रस्त्यामध्ये उभ्या असल्याने वाहतुकीस अडथळा निर्माण होतो. पर्यायाने प्रवासी नागरिकांना वाहतूक कोंडीस सामोरे जावे लागते. शासकीय कार्यालय, बसस्थानक व महाविद्यालये याच रस्त्यावर आहेत. बसस्थानक याच रस्त्यावर असल्याने जिल्ह्यातील नागरिकांची शासकीय कामासाठी वर्दळ असते. हा रस्ता जिल्हा मुख्यालय म्हणून ओळखला जातो. वाहतूक कोंडीमुळे प्रवाशी नागरिकांच्या मनात नगर शहराचे एक वेगळे चित्र निर्माण होत आहे. वाहतूक कोंडी सोडविणे हाच त्यावर एकमेव पर्याय आहे. जिल्हाधिकार्‍यांनी पोलीस दलाची बैठक घेऊन त्यावर तोडगा काढावा अशी मागणी जगताप यांनी केली आहे.

  सीना नदी व खोकर नाला येथे अतिक्रमण झाले आहेत. अतिक्रमणे काढण्यात यावीत असे आदेश महसूलमंत्र्यांनी दिले होते. मात्र अतिक्रमणे काढण्याबाबत महापालिकेने कोणतीच कार्यवाही केली नाही. नदीपात्रात व लगत अतिक्रमणे वाढत गेल्याने नदीला नाल्याचे स्वरूप प्राप्त झाले आहे. महसूल व महापालिका अतिक्रमणे काढण्याबाबत कोणतीच कार्यवाही करत नाही असा जगताप यांचा आरोप आहे. अतिक्रमणे काढण्यासंदर्भात बैठक बोलविण्याची मागणी जगताप यांनी केली आहे. 

 

LEAVE A REPLY

*