वाळू तस्करांच्या टोळीकडून कामगार तलाठ्याला जिवे मारण्याचा प्रयत्न

0

संगमनेर तालुक्यातील वरवंडी शिवारातील घटना

 

संगमनेर (प्रतिनिधी)- मुळा नदीपात्रातून बेकायदेशिर वाळू उपसा करुन तिची वाहतूक करणारा मालट्रक महसूल पथकाने पकडला. मात्र वाळू तस्करांनी पथकातील कामगार तलाठ्यास बेदम मारहाण करून सदर ट्रक घेवून पोबारा केला. ही घटना संगमनेर तालुक्यातील वरवंडी शिवारात गुरुवारी पहाटे 2.30 वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी आश्‍वी पोलीस ठाण्यात चौघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

 

बेकायदेशिर वाळू उपशाला आळा घालण्यासाठी तहसिलदार साहेबराव सोनवणे यांच्या मार्गदर्शनाखाली भरारी पथकाची नियुक्ती करण्यात आली आहे. पथक प्रमुख मंडलाधिकारी भाऊसाहेब यशवंत एखंडे, तलाठी प्रदिप सुभाष गोरे, कोतवाल बाळासाहेब कोंडाजी कातोरे, कोतवाल राजू भाऊराव कचरे, कोतवाल राजेंद्र निवृत्ती करपे, कोतवाल संजय हरिभाऊ भोसले व चालक राजू सावित्रा गायकवाड यांचे भरारी पथक कार्यवाही करत असतांना वरवंडी शिवारात गुरुवारी पहाटे 2.25 वाजेच्या सुमारास मलकापूरच्या दिशेने मालट्रक येतांना पथकाला दिसला.

 

 

 

सदर क्रमांक एम. एच. 42, बी. 0010 या क्रमांकाचा मालट्रक पथकाने अडविला. सदर मालट्रकमध्ये साडेपाच ब्रास वाळू होती. सदर वाळूचा परवाना आहे का? अशी विचारणा केल्यानंतर चालक मंगेश धोंडीबा शेंडगे (रा. साकुर, ता. संगमनेर) याने परवाना नसल्याचे सांगितले. त्यावर कामगार तलाठी रामदास मारुती मुळे यांनी सदर ट्रक आश्‍वी पोलीस ठाण्यास घेण्यास सांगितला.

 

 

मात्र मंगेश शेंडगे याने सदर ट्रक वरवंडी शिवारात आडबाजूला लावून चावी, बटन, फ्युज काढून ट्रक नादुरुस्त करून तेथून पोबारा केला. महसूल पथकाने सदर ट्रकचा ताबा घेतला. त्यानंतर सकाळी 10.30 वाजेच्या सुमारास मंगेश शेंडगे याचा जोडीदार बाळू पोंदे याने खांबे गावातील एक ट्रक ड्रायव्हरला बोलावून घेतले. सदर ट्रक चालू करून तो आश्‍वी पोलीस ठाण्याकडे घेवून जात असताना मंगेश शेंडगे, बाळू पोंदे, रावसाहेब लहानू खेमनर (रा. साकुर, ता. संगमनेर) अनिल भांडकोळी (रा. चिखलठाणा, ता. राहुरी) यांनी सदर ट्रक अडविला.

 

 

 

ट्रक का अडविला म्हणून त्यांना विचारणा केली असता, त्यातील मंगेश शेंडगे हा लोखंडी गज घेऊन कामगार तलाठी रामदास मुळे यांच्या अंगावर धावला.

 

 

त्यावेळी बाळू पोंदे, रावसाहेब खेमनर, अनिल भांडकोळी यांनी मुळे यांना धरले. ‘ट्रक नेऊ देणार नाही, तुम्हाला जिवे मारून टाकू, ट्रक नेली तर त्याचे परिणाम भोगावे लागतील’ असे म्हणत दमदाटी करत धक्काबुक्की करत मारहाण केली. मुळे यांना त्यांच्या पथकातील इतरांनी सोडविण्याचा प्रयत्न केला असता मंगेश शेंडगे याने त्यांनाही दम दिला. ‘तुम्ही ट्रक नेली किंवा माझ्या विरुद्ध फिर्याद दिली तर मी आत्महत्या करीन, ट्रक पेटवून देऊन तुमचे नाव घेईल’ असा दम भरला. त्यानंतर मंगेश शेंडगे याने ट्रक चालू करून त्याच ट्रकमधून चौघांनी पोबारा केला. सदर घटनेची माहिती कामगार तलाठी मुळे यांनी तहसीलदारांना दिली.

 

 

 

दरम्यान कामगार तलाठी रामदास मुळे यांनी याबाबत आश्‍वी पोलीस ठाण्यात फिर्याद दिली. त्यानुसार पोलिसांनी सदर चौघांविरुद्ध गुन्हा रजिस्टर नंबर 80/17 भारतीय दंड संहिता 379, 341, 394, 353, 332, 504, 506, 34, पर्यावरण कायदा कलम 3/15 नुसार दाखल केला आहे. आरोपी फरार असून अधिक तपास आश्‍वी पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक ए. बी. कटके करत आहेत.

LEAVE A REPLY

*