वाळू घाटांचे आज लिलाव

0

नाशिक । दि. 13 प्रतिनिधी
महसूल विभागाने चार नवीन रेती घाटांच्या लिलावकरिता निविदा मागवल्या असून उद्या मंगळवारी या घाटांचे लिलाव होणार आहेत. या लिलावातून सुमारे 40 लाख रूपयांचा महसूल प्रशासनाला अपेक्षित आहे.

वाळू लिलावाच्या माध्यमातून महसूल प्रशासनाला चांगला महसूल प्राप्त होतो. मात्र गेल्या काही वर्षात इ-लिलाव प्रक्रियेकडे ठेकेदारांनी पाठ फिरवल्याचे दिसून आले. अपसेट प्राईज कमी करूनही ठेकेदार या प्रक्रियेत सहभागी होत नसल्याने याचा परिणाम गौण खनिजाच्या माध्यमातून प्रशासनाला मिळणार्‍या महसुलावर दिसून आला.

असे असले तरी गेल्या काही दिवसांपासून नवीन रेती घाटांचे सर्वेक्षण भूजल विभागाच्या वतीने करण्यात आले. या विभागाच्या परवानगीनंतर नवीन चार वाळू घाटांची लिलाव प्रक्रिया सुरू करण्यात आली. नाशिक तालुक्यातील लहवित येथील दारणा नदीपात्रातील 707 ब्रास वाळू घाटासाठी 4 लाख 94 हजार 900 रुपये किंमत ठेवण्यात आली आहे.

नाशिक तालुक्यातील माडसांगवी येथील गोदावरी नदीपात्रातील गट नं. 47 येथील वाळू घाटासाठी 5 लाख 56 हजार 500 रुपये बोली रक्कम ठेवण्यात आली आहे. या घाटांवर 795 ब्रास वाळूचा उपसा करता येणार आहे. कळवण तालुक्यातील गोसारणे येथील गिरणा नदीपात्रातील 530 ब्रास वाळू उपशाकरिता 3 लाख 79 हजार 480 रुपये रक्कम ठरवण्यात आली आहे.

देवळा तालुक्यातील लोहोणेर येथील गिरणा नदीपात्रातील 1643 ब्रास वाळू घाटाकरिता 24 लाख 67 हजार 786 रुपये रक्कम ठरवण्यात आली आहे. या चार वाळू घाटांच्या लिलावातून 38 लाख 98 हजार 666 रुपये रक्कम ठरवण्यात आली आहे. 14 मार्च रोजी हे लिलाव जाहीर केले जातील.

LEAVE A REPLY

*