‘वाय-फाय’मुळे एसटी हायफाय! ; मनोरंजनात जाणार प्रवासाचा वेळ

0

नाशिक (सोमनाथ ताकवाले) : काळानुरूप एसटी महामंडळानेही ‘परिवर्तन’ केले आहे. मात्र स्मार्टफोनच्या काळात तंत्रस्नेही झालेल्या एसटीच्या सर्वसामान्य प्रवाशांची गरज म्हणून नाशिक विभागात एसटी महामंडळाने सर्वच बसगाड्यांमध्ये ‘वायफाय’ सुविधा देऊ केली आहे. त्यामुळे प्रवाशांना रटाळवाणा वाटणारा प्रवास कालावधी मनोरंजनाच्या वाटेने घेऊन जाणार आहे.

नाशिक आगाराच्या सुमारे 300 बसेसमध्ये खासगी कंपनीच्या मदतीने एसटी महामंडळ बसेसमध्ये वायफाय यंत्रणेची जोडणी करीत आहे. त्यामुळे लांब पल्ल्याच्या आणि शहरात फेर्‍या करणार्‍या सिटी बसच्या तसेच ग्रामीण मार्गावरच्या बसगाड्यांमध्ये प्रवाशांना वायफाय सुविधा मिळणार आहे. त्यात प्रामुख्याने मनोरंजनाचे कंटेन्ट स्मार्टफोनवर उघडणार असल्याने प्रवाशांना चित्रपट, संगीत, गीत ऐकत, पाहत लांबचा, जवळचा प्रवास पूर्ण करता येणार आहे.

वायफाय कनेक्टिव्हिटीसाठी एसटी महामंडळाच्या गाड्यांमध्ये सध्या खासगी कंपनी यंत्र बसवून देत आहे. ज्या गाड्यांवर एसटी महामंडळ ही सुविधा प्रवाशांना देणार आहे प्रवाशांना त्याचा उपयोग स्मार्टफोनवर, लॅपटॉप, टॅब तसेच आयपॉडवर वायरलेस यंत्रणेद्वारे होणार आहे. प्रवाशांना एकदा या पोर्टलवर नोंदणी केली की भविष्यात कधीही बसने प्रवास करण्याची वेळ आली तरी पुन्हा-पुन्हा पोर्टलवर रजिस्टर होण्याची वेळ येणार नाही. त्याचे अ‍ॅप प्रवाशांच्या स्मार्टफोनमध्ये डाऊनलोड झालेले असेल. त्यामुळे जेव्हा केव्हा प्रवासाची वेळ त्या व्यक्तीवर येईल तेव्हा तेव्हा त्याला वायफाय सुविधा आपोआपच बसमध्ये उपलब्ध होईल. अर्थात गाडी कोणतीही असली तरी सुविधा मिळेल. कारण सर्वच बसगाड्यांमध्ये ही सुविधा देण्याची व्यवस्था महामंडळाने आतापासून सुरू केली आहे.

सोशल मीडिया प्रतिबंधीत : एसटी बसेसमध्ये वायफायद्वारे मिळणार्‍या सुविधेमध्ये मनोरंजनाचे साधन ठरणारे पोर्टल असलेल्या मनोरंजन घटकांची यादी असणार आहे. मात्र फेसबुक, व्हॉटस्अ‍ॅप, ट्विटर, इन्स्टाग्राम आदी सोशल मीडिया आणि इतर संकेतस्थळे यात ब्राऊझर होणार नाहीत. प्रवाशांना वायफायद्वारे मिळणारी सेवा ही मनोरंजनासाठी अधिक उपयोगी पडणार आहे. गाणे, चित्रपट यांची यादी दर 15 दिवसांनी अद्ययावत होणार असून त्यामुळे नवनवीन मनोरंजनाचे घटक वायफायद्वारे प्रवाशांना बसमध्ये मिळणार आहेत.

आधुनिक एसटी : काळानुसार बदल करणारे टिकून राहतात. अजून खासगी वाहतुकीच्या साधनांमध्ये वायफाय सुविधा प्रवाशांना मिळत नाही. पण एसटी महामंडळाने अशी सुविधा देऊन आपल्या प्रवाशांना सुखद धक्का दिला आहे, अशी प्रतिक्रिया संदीप शर्मा यांनी दिली. तांत्रिक चाचण्या, रेंज चाचपणी आणि अखंडित सेवेची खात्री झाल्यानंतर प्रवाशांच्या सेवेत एसटीचा वायफाय अँटिना कार्यान्वित होणार आहे.

LEAVE A REPLY

*