वादळात विजेचा खांब अंगावर पडून माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू

0

आश्‍वी खुर्द (वार्ताहर)- संगमनेर तालुक्यातील आश्‍वी खुर्द-शिबलापूर रस्त्यावर भैरवनाथ मंदिरासमोरील विजेचा खांब चक्री वादळात रस्त्याने चाललेल्या मोटरसायकलवर पडल्याने मोटरसायकलवरील माय-लेकाचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे.

 

गुरुवार दिनांक 25 मे 2017 रोजी सांयकाळी 4 वाजेच्या सुमारास परिसरात आकाशात ढग दाटून आले व वादळही सुरू झाले. आश्‍वी खुर्दचा आठवडे बाजार असल्याने सुभाष बबन चारस्कर (वय 31) व त्याची आई सुगंधा बबन चारस्कर (वय 52) हे दोघे जण बाजार करून मोटारसायकलने घराकडे जात असताना आश्‍वी शिबलापूर रस्त्यावर आश्‍वी खुर्द शिवालगत भैरवनाथ मंदिरासमोरील विजेचा खांब चक्रीवादळात चाललेल्या मोटरसायकलवर पडल्याने दोघे मायलेक रस्त्यावर फेकले गेल्याने व सुभाष चारस्करच्या पोटात व त्याच्या आईच्या डोक्यात पोल पडल्याने दोघेही जबर जखमी झाले.

 

दोघानाही ग्रामस्थांनी तात्काळ प्रवरा ग्रामीण रुग्णालयात दाखल केले उपचारादरम्यान सुंगधा चारस्करांचा मृत्यू झाला तर रात्री उशीरा 11 वा उपचार सुरू असताना सुभाष चारस्कराचा अतिरक्तश्राव झाल्याने दुर्दैवी मृत्यू झाला.
हे मायलेक व त्यांचे कुटुंब नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील चितेगाव येथील असून मोलमजुरी करण्यासाठी गेली 15 वर्षांपासून येथे वास्तव्यास असून सध्या लक्ष्मण गायकवाड याच्या शेतात मोलमजुरीवर काम करत होते
सुभाष हा या कुटुंबातील एकुलता एक कर्ता मुलगा होता. त्याच्या पश्‍चात वडील, पत्नी, दोन मुले, एक मुलगी असा परिवार आहे.

 

 

आज सकाळी दोघांचे शवविच्छेदन केल्यानंतर दुपारी अत्यंत शोकाकुल वातावरणात आश्‍वी खुर्द स्मशानभूमीत दफन करण्यात आले. यावेळी मोठा जनसमुदाय उपस्थित होता.

 

 
सुभाष चारस्कर व त्याची आई सुंगधा चारस्कर या अदिवासी कुटुंबावर काळाने मोठा घाला घातला असून शासनाने तात्काळ या कुटुंबाला आर्थिक मदत द्यावी अशी मागणी आश्‍वी ग्रामस्थांनी केली आहे. घटनास्थळी आश्‍वी पोलीस स्टेशनचे पोलीस उपनिरीक्षक सुरेश शिंदे, पोलीस हेड कॉन्स्टेबल कावरे यांनी पंचनामा केला तर संगमनेर तहसील कार्यालयातील अधिकार्‍यांनीही या कुटुंबाला भेट दिली.

LEAVE A REPLY

*