वादग्रस्त संभाषण प्रकरणी आ. हिरेंची चुप्पी

पालकमंत्र्यांकडून चौकशीचे संकेत

0

नाशिक | दि. ३ प्रतिनिधी – पक्षाच्या उमेदवारांना मते देऊ नका असे सांगितल्याची आ. सीमा हिरे यांची एक कथित ध्वनिफित सोशल मीडियावर व्हायरल झाली. या प्रकरणाची पालकमंत्री यांनी दखल घेत या प्रकरणी चौकशी करण्याचे संकेत दिले. दरम्यान, आज यासंदर्भात एका कार्यक्रमात आ. हिरे यांनी पालकमंत्र्यांची भेट घेऊन खुलासा केल्याचे समजते. मात्र याबाबत आ. हिरेंशी संपर्क साधला असता त्यांनी असा कोणताही खुलासा केला नसल्याचे सांगत या प्रकरणी चुप्पी साधणेच पसंत केले.

महापालिका निवडणुकीत उमेदवारी वाटपावरून भाजपमध्ये मोठा गोंधळ निर्माण झाला होता. नाशिक पश्‍चिमच्या आमदार सीमा हिरे यांनी कन्येसाठी आणि दिरासाठी उमेदवारी मागितली होती. मात्र प्रभाग ७ मध्ये त्यांचे दीर योगेश हिरे यांना उमेदवारी देण्यात आली.

प्रचारादरम्यान आ. हिरे यांनी केवळ त्यांनाच मते द्या अन्य उमेदवाराला देऊ नका तसेच प्रभाग ८ मध्ये दिनकर पाटील यांचा मुलगा अमोल पाटील यांना मतदान करू नका, असे एका कार्यकर्त्याला सांगितल्याची ऑडिओ क्लिप व्हायरल झाली. अगोदरच उमेदवारीसाठी पैसे घेतले जात असल्याच्या व्हिडीओ क्लिपमुळे कोंडीत सापडलेल्या भाजपमधील अंतर्गत संघर्ष यामुळे चव्हाट्यावर आला आहे.

पालकमंत्री गिरीश महाजन यांनी या प्रकरणी पडताळणी करू, असे संकेत दिले. आज नाशिक येथे आयोजित डिजिधन मेळाव्याप्रसंगी पालकमंत्री महाजन आणि आ. हिरे एकाच व्यासपीठावर आले असता आ. हिरेंनी पालकमंत्र्यांशी चर्चा केली. ऑडिओ क्लिपसंदर्भात त्यांनी आपला खुलासा पालकमंत्र्यांना दिल्याचे समजते. यासंदर्भात आ. हिरेंशी संपर्क साधला असता त्यांनी या गोष्टीचा इन्कार केला. मात्र आवश्यकता भासल्यास आपण पक्षाच्या वरिष्ठांशी चर्चा करू, असे सांगत यावर अधिक बोलणे त्यांनी टाळले.

LEAVE A REPLY

*