Type to search

ब्लॉग

वाढत्या धार्मिक मूलतत्त्ववादाचा परिणाम

Share

श्रीलंकेतील संपूर्ण प्रकाराला धार्मिक दहशतवादाचा प्रकार म्हणता येईल. हा दहशतवाद धार्मिक मूलतत्त्ववादाने प्रभावित असतो. विविध धर्मांमध्ये तेढ निर्माण करणे हाच या हल्ल्यांमागचा उद्देश असतो. दहशतवादी संघटनांची हिंमत वाढण्याचे कारण काही देशांकडून दहशतवादी संघटनांना समर्थन मिळत आहे. दक्षिण आशियातील कोणताही देश मूलतत्त्ववादापासून सुरक्षित राहिलेला नाही. ही धोक्याची घंटा आहे.

श्रीलंकेतील साखळी बॉम्बस्फोटांनी जग हादरून गेले. बरेचसे अल्पसंख्याक धर्म ज्या देशात गुण्यागोविंदाने नांदताहेत अशा ठिकाणी जाणीवपूर्वक धार्मिक प्रार्थना स्थळांमध्ये अशा प्रकारचे हल्ले केले जातात. त्यातून दोन धर्मांमध्ये, दोन समाजांमध्ये धार्मिक तेढ निर्माण होईल, असा हल्लेखोरांचा हेतू असतो. अलीकडील काळात हा प्रकार वाढण्याचे कारण म्हणजे मूलतत्त्ववाद होय.

कोलंबोमधील हल्ल्यांसंदर्भात भारताच्या गुप्तहेर यंत्रणांनी श्रीलंकेला सूचना दिल्या होत्या. त्यामध्ये श्रीलंकेतील विविध चर्चवर आणि भारतीय दूतावासावर हल्ला होण्याची शक्यता असल्याचे कळवले होते. एवढेच नाही तर नॅशनल तौहिद जमात या संघटनेचे नावही घेतले होते. ही श्रीलंकेमधील धार्मिक मूलतत्त्ववादी कट्टर धर्मांध संघटना आहे. श्रीलंकेच्या पूर्वेकडील भागात या संघटनेने मोठे जाळे विणलेले आहे. या संघटनेने 100 हून अधिक श्रीलंकन तरुणांना आयसिसमध्ये जाण्यासाठी प्रवृत्त केले होते. 2017-2018 मध्ये श्रीलंकेमध्ये बौद्ध आणि मुस्लिमांमध्ये जातीय दंगली झाल्या. त्यात या संघटनेची महत्त्वाची भूमिका होती. या संघटनेकडून घातपाती कारवाया घडवल्या जाऊ शकतात, असा इशारा भारताने दिला होता. पण श्रीलंकेने त्याकडे दुर्लक्ष केले. पण भारताचा इशारा खरा ठरला.

श्रीलंकन सरकारने नॅशनल तौहिद जमातचाच या हल्ल्यात हात असल्याचे म्हटले असले तरी या संघटनेने जबाबदारी आणि आरोप नाकारले आहेत. तथापि या प्रकरणात 20 हून अधिक लोकांना अटक करण्यात आली आहे. प्राथमिक माहितीनुसार हा हल्ला श्रीलंकेतील धार्मिक अल्पसंख्याकांनी केला असल्याचे स्पष्ट आहे. या हल्ल्यामागे आयसिससारखी संघटना असू शकते, असा अंदाज वर्तवण्यात येत आहे. आयसिससारखी संघटना या हल्ल्यामागे असण्याच्या शक्यतांना काही कारणांचा आधार आहे. आयईडीचा किंवा सुसाईड बॉम्बरचा वापर करण्याची ही मोडस ऑपरेंडी सध्याच्या काळात आयसिसच वापरत आहे. इराक, सीरिया, अफगाणिस्तान, पाकिस्तान या देशांमध्ये आयसिसने या माध्यमातून अनेक स्फोट घडवून आणले आहेत. यापूर्वी आयसिसने 2016 मध्ये बांगलादेशामध्ये अशाच पद्धतीने हॉटेलमध्ये बॉम्बस्फोट केले होते. दक्षिण पूर्व आशियामध्ये, इंडोनेशियामध्येही अशाच प्रकारे हल्ला केला होता. नायजेरिया, इजिप्तमध्ये असेच स्फोट घडवून आणले होते. 2017 मध्ये लाहोरमध्ये ईस्टर संडेच्या दिवशी अशा प्रकारचा हल्ला झाला होता. ईजिप्तमधील हल्लादेखील ईस्टर संडेलाच झाला होता. या हल्ल्यांमागे प्रामुख्याने जिहादी संघटना होत्या. आतादेखील संशयाची सुई त्याच दिशेने जाते आहे.

या सर्वांमधून आपल्याला काही प्रवाह स्पष्ट होतात. पहिला प्रवाह म्हणजे आयसिस या आंतरराष्ट्रीय दहशतवादी संघटनेने आपले केंद्र पश्चिम आशियाकडून दक्षिण आशियाकडे सरकवले आहे. ही संघटना आता इराक आणि सीरियातून हद्दपार झाली आहे. नाटो सैन्याने हवाई हल्ले करून या संघटनेला निष्क्रिय केले आहे. परिणामी आयसिसला आता नवे योद्धे हवे आहेत. त्यांना नवी भरती करायची आहे. त्यासाठी ते दक्षिण आशियामधील गरीब देशांना लक्ष्य करताहेत. अफगाणिस्तान, नेपाळ, पाकिस्तान, बांगलादेश, मालदिव, श्रीलंका या देशांमधील गरीब तरुणांना आकर्षित करण्याचा प्रयत्न करताहेत. मालदिव आणि श्रीलंकेमध्ये हा प्रकार अधिक आहे. श्रीलंकेत मूलतत्त्ववादाचे जे लोण पसरले आहे त्याचे श्रेय सर्वस्वी पाकिस्तानला जाते. राजेपक्षे यांच्या काळात श्रीलंकेत चीनचा प्रभाव वाढला होता. त्याच काळात श्रीलंकेने पाकिस्तानबरोबर एक करार केला होता. त्यानुसार पारपत्राशिवाय पाकिस्तानी नागरिकांना श्रीलंकेत येण्याची अनुमती देण्यात आली. याचा पाकिस्तानने मोठ्याप्रमाणावर दुरुपयोग केला. श्रीलंकेत मोठ्याप्रमाणावर जिहादी विचारसरणी पसरवण्याचा प्रयत्न पाकिस्तानने केला.

या पार्श्वभूमीवर भारताने सावध राहणे गरजेचे आहे. भारताच्या राष्ट्रीय तपास समितीने गेल्या आठवड्यात देशभरात वर्धा, हैदराबाद, केरळ आदी ठिकाणी टाकलेल्या छाप्यांमधून आयसिस संघटनेशी संबंधित काही लोकांना ताब्यात घेण्यात आले. यामध्ये काही महिलांचाही समावेश आहे. त्यातील माहितीनुसार, भारतातही अशा स्वरुपाचा बॉम्ब हल्ला करण्याची तयारी होती, असे समोर आले आहे. त्याच आधारावर भारताने श्रीलंकेला सूचक इशारा दिला. सध्या भारतात निवडणुकीचा काळ आहे. सर्वच सुरक्षा यंत्रणा निवडणुकीच्या बंदोबस्तासाठी व्यग्र असल्यामुळे आपण सावध राहणे अत्यंत गरजेचे आहे. दक्षिण आशियातील कोणताही देश मूलतत्त्ववादापासून सुरक्षित राहिलेला नाही. या देशांसाठी दहशतवाद ही महत्त्वाची समस्या झाली आहे. मुळातच दहशतवादी संघटनांची हिंमत का वाढते आहे किंवा मोठमोठे हल्ले करण्याचे सामर्थ्य त्यांच्यात कोठून येत आहे, हा यातील कळीचा आणि चिंतनाचा मुद्दा आहे. याचे प्रमुख कारण काही देशांकडून दहशतवादी संघटनांना समर्थन मिळत आहे. त्यामुळे या संघटनांची हिंमत वाढत आहे. या संघटनांना प्रचंड पैसा, शस्त्रास्त्रे, हल्ल्यांसाठी स्फोटके सहजपणे मिळत नाहीत. त्यासाठी एक जाळे काम करत असते. त्यामुळे दहशतवादाला समर्थन देणार्‍या पाकिस्तानसारख्या देशांवर नियंत्रण आणले जात नाही तोपर्यंत दहशतवादी कारवायांना आळा घालण्याला मर्यादा आहेत.

यासंदर्भात अलीकडेच घडलेली एक घडामोड लक्षात घ्यायला हवी. फ्रान्सने संयुक्त राष्ट्र परिषदेत एक ठराव मांडला आहे. हा ठराव अत्यंत महत्त्वाचा आहे. त्यानुसार दहशतवादाला प्रोत्साहन देणार्‍या देशांवर आर्थिक निर्बंध लादले जावेत, अशी तरतूद करण्याची गरज प्रतिपादित करण्यात आली आहे. या ठरावाला सर्व देशांनी समर्थन दिले पाहिजे. तरच या देशांच्या नाड्या आवळल्या जातील. जागतिक बँक, अमेरिकेसारख्या देशांनीही दहशतवादाला खतपाणी घालणार्‍या, पोसणार्‍या देशांना मदत देताना विचार करणे गरजेचे आहे.

शेवटचा मुद्दा म्हणजे जागतिक महासत्तांसह विविध देशांनी दहशतवादाच्या मुद्यावर राजकारण करणे थांबवले पाहिजे. आज दहशतवादाच्या 200 हून अधिक व्याख्या आहेत. प्रत्येक देश आपल्या दृष्टिकोनातून दहशतवादाकडे पाहत आहे. आपल्या पद्धतीने सोयीस्करद़ृष्ट्या त्याचा अर्थ लावत आहे. जागतिक पातळीवर याबाबत एकवाक्यता नसल्याने दहशतवाद्यांचे फावते आहे. कोलंबोमधील हल्ल्याची खूप मोठी किंमत श्रीलंकेला चुकवावी लागणार आहे. तिथे कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न आहेच. पण आता येणार्‍या काळात या देशाला कदाचित मोठ्या राजकीय पेचप्रसंगाला सामोरे जावे लागू शकते. आज श्रीलंकेत चीन, पाकिस्तानसह अनेक देश पाय पसरण्याचा प्रयत्न करताहेत. विशेष म्हणजे श्रीलंकेची अर्थव्यवस्था आर्थिक डबघाईला आली आहे. या देशावर जीडीपीच्या 80 टक्के कर्ज आहे. या कर्जातून बाहेर पडण्यासाठी युरोपिय देशांकडून मदत घेतली जात आहे. अमेरिका श्रीलंकेला आर्थिक मदत करत आहे. हा हल्ला परतवण्यात श्रीलंका अपयशी ठरल्याने त्यांना मिळणार्‍या मदतीवर परिणाम होणार आहे. त्याचप्रमाणे मानवाधिकार उल्लंघनाबाबत श्रीलंका प्रकाशझोतात आली आहे. या मुद्यावरून श्रीलंकेवर आंतरराष्ट्रीय दबाव वाढू शकतो, हे विसरता येणार आहे.

श्रीलंका, मालदिव हे अशा प्रकारच्या दहशतवादाचे लॉचपँड असू शकतात. दहशतवादी ज्या देशांमध्ये अस्थिरता आहे त्याच देशांची निवड करतात. अशा देशात जाळे पसरवून तिथे केंद्र करून इतर ठिकाणी हल्ले करण्याचा दहशतवादी संघटनांचा इरादा आहे. श्रीलंकेचे हिंदी महासागरातील स्थान पाहता तिथे जिहादींनी आपला कब्जा केला तर ते दक्षिण पूर्व आशियामध्येही हल्ले करू शकतात. त्यामुळे श्रीलंकेसह अनेक देशांनी येणार्‍या काळात अत्यंत सतर्क आणि सजग राहण्याची गरज आहे. या दहशतावादी हल्ल्यातून पुन्हा एकदा धार्मिक दहशतवादाचा उग्र चेहरा समोर आला आहे. त्यामुळे कोणत्याही प्रकारचे राजकारण न करता अशा हल्ल्यांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी सर्वसहमतीने आणि एकजुटीने प्रयत्न होणे गरजेचे आहे.
– डॉ. शैलेंद्र देवळाणकर

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!