वाढत्या उन्हाने काहिली!, रस्ते प्रखर उष्णतेच्या विळख्यात

0

नाशिक : गत आठ दिवसांपासून सूर्य आग ओकू लागल्याने उष्णतेच्या झळा प्रखर झाल्या आहेत. कमाल तापमान 40 अंशाच्या पुढे आणि किमान तापमान 22 अंशाच्या दरम्यान राहत असल्याने वातावरणात हवेची झुळूक उष्णतेच्या प्रखर झोतात परावर्तीत झाली आहे. जमीन आणि रस्ते प्रचंड तापू लागल्याने नागरिकांचया जीवाची काहिली होत आहे.

आज नाशिकमध्ये तापमानाचा पारा 40.3 अंशावर स्थिरावला होता. तर किमान तापमान 21.8 अंशावर होते. त्यामुळे दिवसभर प्रखर उन्हाच्या झळांनी वातावरण व्यापून गेले होते. सायंकाळी हवेत गरम झळाच होत्या. रात्रीही उकाड्यात भर पडली होती.

तापमान सर्वाधिक झाल्याने तीव्र उन्हाळ्याची झळ नागरिकांना आतापासून बसत आहे. सकाळी 10 वाजेपासूनच उन्हाचा पारा 40 अंशाच्या पुढे सरकून तो दुपारी 4 वाजेपर्यंत त्याच तीव्रतेवर राहत असल्याने नागरिकांना दिवसभर प्रचंड उन्हाचा सामना करीत आपला दिनक्रम पूर्ण करावा लागत आहे. महिला, युवती डोक्यापासून तर पायांपर्यंत कपड्यात लपेटूनच रस्त्यांवरून जाताना दिसत होत्या.

तर वाहनचालक, विद्यार्थी व इतर नागरिक डोक्यात टोपी, तोंड रुमालाने बांधून, हेल्मेट घालून रस्ते व इतर ठिकाणी दिसत होते. दुपारी उन्हाचा पारा उच्चांकावर असल्याने रस्त्यांवरही शुकशुकाट होता. त्यामुळे शहरातील वर्दळ दुपारी घटली होती. वाहनातून प्रवास करतानाही नागरिकांना प्रचंड उकाड्याचा आणि उष्णतेचा सामना करावा लागत होता. त्यामुळे रिक्षा, बसमध्येही प्रवाशांची गर्दी तुरळक होती.

बाजारपेठा सामसूम : मेनरोड, रविवार कारंजा, भद्रकाली, सराफ बाजार, कापड बाजार, शिवाजी रोड, एम.जी. रोड, कॉलेजरोड, अशोकस्तंभ, मेहेर सिग्नल, टिळकपथ आदी बाजारपेठांना वाढलेल्या उन्हाचा फटका बसला. उन्हामुळे नागरिक बाहेर पडत नसल्याने या बाजारपेठांना ग्राहकांची प्रतीक्षा होती. ऊन वाढलेले असल्याने व्यावसायिकांना त्याचा फटका बसला.

LEAVE A REPLY

*