वाकडीत शेतकर्‍यांचा संप तीव्र

0

वाकडी बंदची हाक; फुटीरवाद्यांचे प्रतिकात्मक जाळले पुतळे

 

वाकडी (वार्ताहर) – मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, कृषीमंत्री सदाभाऊ खोत, फुटीरवादी कोअर कमेटीचे जयाजी सूर्यवंशी मिळून शेतकर्‍यांचा विश्‍वासघात केला आहे. कोणत्याही शेतकर्‍यांना विश्‍वासात न घेता सदरहू शेतकरी आंदोलनात फूट पाडण्याचा प्रयत्न केला.

 

 

यांच्या निषेधार्थ राहाता तालुक्यातील वाकडी येथे संतप्त शेतकर्‍यांनी शिवाजी चौक येथे जमून त्यांच्या पुतळ्याला जोडे मारो आंदोलन केले, तसेच त्यांच्या पुतळ्याचे दहनही करण्यात आले.

 

 
यावेळी वाकडी गावातील शेतकर्‍यांची संख्या लक्षणीय होती. पाचशे ते हजार लोक रस्त्यावर जमा झाले होते व प्रत्येक शेतकरी याविषयी संताप व्यक्त करत होता. आम्हाला नुसते आश्‍वासन नको तर लेखी पाहिजे, आमच्या सर्व मागण्या मान्य झाल्या पाहिजे, तोपर्यत हे आंदोलन मागे घेणार नाही असा पवित्रा शेतकर्‍यांनी घेतला. हे आंदोलन आणखी तीव्र होणार असून उद्या सोमवार दि. 5 जून रोजी वाकडी बंदची हाकही देण्यात आली आहे.

 

 

सरकारच्या निषेधार्थ वाकडीतील शेतकर्‍यांनी उद्या संपूर्ण वाकडी गाव बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. वाकडीतील दूध संकलन केंद्रेही बंद ठेवण्यात आली आहेत.

 

 
आजही शिवाजी चौक येथे शेतकर्‍यांनी सुमारे 3 हजार लिटर दूध रस्त्यावर ओतून देवून सरकारचा निषेध करण्यात आला. या संपाला विविध संघटनांकडून पाठिंबा मिळाला असून हा संप आणखी तीव्र होणार असल्याचे शेतकरी वर्ग सांगत आहे. आमच्यात कोणीही फूट पाडू शकत नाही, शेतकरी जागा झाला आहे, यात कोणी हस्तक्षेप केला तर जशाच्या तसे उत्तर दिले जाईल. हा संप शांततेच्या मार्गाने असाच चालू राहील असे विठ्ठल शेळके, अशोक लबडे, अनिल कोते, महेश लहारे, साहेबराव आहेर, विनोद लहारे यांनी आपल्या भाषणात सांगितले आहे. तसेच सोमवारी बंदच्या दिवशी वाकडीतील तरुण शेतकरी वर्गाने राहाता तालुका व श्रीरामपूर तालुक्यातील काही गावांतून मोटार सायकल रॅली काढून या संपाबाबत जनजागृती करणार असल्याचे स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे विठ्ठल शेळके यांनी माहिती दिली आहे.

 

 

 

याबाबत सोमवारी सकाळी वाकडी येथील मारुती मंदीर येथे सकाळी 8 वाजता वाकडी व जवळपासच्या गावातील शेतकर्‍यांची बैठक आयोजीत केली असल्याचे त्यांनी सांगितले. यामुळे पुणतांबा पाठोपाठ आता वाकडी आंदोलनाचे केंद्र ठरू शकते अशी येथील शेतकरी वर्गात चर्चा आहे. यावेळी वाकडीतील शेतकरी मोठ्या संख्येने स्वयंस्फूर्तीने या आंदोलनात सामील झाले होते.

 

 

 

LEAVE A REPLY

*