वर्तमानपत्रात बांधलेल्या खाद्यपदार्थांतून कर्करोग

0

नाशिक | दि. ११ प्रतिनिधी- रस्त्यावरील विक्रेते खाद्यपदार्थ बांधून देण्यासाठी वर्तमानपत्राचा सर्रास वापर करतात, मात्र हे आरोग्यासाठी हानीकारक असून वर्तमानपत्रात बांधलेले खाद्यपदार्थ विषारी होत असून, कर्करोगाला कारणीभूत ठरणारे घटक त्यात निर्माण होत असल्याचा इशारा भारतीय अन्नसुरक्षा प्राधिकरणाने दिला आहे. त्यामुळे अन्नपदार्थ गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्राचा वापर करू नये, असे आवाहन अन्न, औषध प्रशासनाने केले आहे.

वर्तमानपत्रासाठी वापरली जाणारी शाई आरोग्यासाठी मोठ्या प्रमाणात घातक आहे. या शाईमध्ये मानवी आरोग्याला हानीकारक रंग, रंगद्रव्ये, चिकटपणा आणणारे पदार्थ आणि विविध रसायने असतात. त्याचबरोबर रद्दीत रोगराईला कारणीभूत ठरणारे विषाणूदेखील असतात. याकरिता एफएसएसएआयने त्यानुसार मार्गदर्शक सूचना जाहीर केल्या आहेत. वर्तमानपत्रामध्ये खाद्यपदार्थ बांधणे अनारोग्यकारक असून, असे खाद्यपदार्थ खाणे प्रकृतीसाठी धोकायदायक आहे.आरोग्याला वर्तमानपत्राच्या कागदामध्ये असलेले जैविक घटकही अपायकारक आहेत.

कागदाचा पुनर्वापर करून तयार केलेली वृत्तपत्रे आणि कागद अथवा काडबोर्ड बॉक्समध्ये धातू, खनिज तेल आणि विषारी रसायने आढळतात. यामुळे पचनाच्या समस्येसोबत विषबाधाही होऊ शकते, कागदावरील जड धातू अल्प प्रमाणात असल्याने पचनाला अडथळा निर्माण होतो.

वयोवृध्द व्यक्ती, बालकांची रोगप्रतिकारक शक्ती कमी असलेल्यांना अशा विविध घटकांमुळे कर्करोगाची लागणही होऊ शकते. त्यामुळे अन्नपदार्थ पॅकेजिंगसाठी किंवा गुंडाळण्यासाठी वर्तमानपत्राच्या कागदाचा उपयोग करू नये असे आवाहन अन्न व औषध प्रशासनाचे सह आयुक्त उ.श.वंजारी यांनी केले आहे.

LEAVE A REPLY

*