वरघोडा मिरवणुकीने अष्टमहासिध्दी तपाची पुर्णाहूती; 150 तपस्वींचा सहभाग

0

 कापडबाजारातील जैन मंदिरात उत्साह

अहमदनगर (प्रतिनिधी)- चार्तुमास पर्वानिमित्त कापड बाजारातील मंदिरात 14 जुलै ते 29 जुलै या कालावधीत अष्टमहासिध्दी तप हा अतिशय पवित्र असा धार्मिक कार्यक्रम उत्साहात झाला. या 16 दिवसांच्या अष्टमहासिध्दी तपाची पुर्णाहूती शनिवारी सकाळी वरघोडा मिरवणुकीने झाली. यात 150 तपस्वींसह श्रावक, श्राविका मोठ्या संख्येने सहभागी झाल्या होत्या, अशी माहिती जैन मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सुभाष मुथा यांनी दिली.
जैन धर्मियात अतिशय पवित्र मानल्या जाणार्‍या चातुर्मासानिमित्त कापडबाजार जैन मंदिरात साध्वीजी प्रखर वक्ता संवेगनिधीश्रीजी आदि ठाणा 7 यांच्या सानिध्यात चातुर्मासाची आराधना अतिशय उल्हासी वातावरणात होत आहे. अष्टमहासिध्दी तप 16 दिवसांचे असून यात आठ दिवस उपवास व आठ दिवस बियासने करण्यात येतात. नगर शहरात प्रथमच होणार्‍या या तपात 150 तपस्वींनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.
या तपाच्या सांगतेनिमित्त शनिवारी सकाळी शनिगल्ली येथील अक्षता अपार्टमेंट मधील भारतीबेन अजित गांधी यांच्या निवासस्थानापासून गौतमस्वामींच्या मूर्तीची सजवलेल्या रथातून भव्य वरघोडा मिरवणूक काढण्यात आली. मिरवणुकीच्या अग्रभागी बँड पथकाने सुरेल वादन सादर केले. साध्वीजींच्या सहभागाने अतिशय धार्मिक व पवित्र वातावरणात निघालेली ही मिरवणूक प्रारंभी गुजरगल्ली येथील जैन मंदिरात नेण्यात आली. याठिकाणी सामूहिक दर्शन, प्रार्थना झाली. यानंतर चितळे रोड, नवीपेठ, सेंट्रल बँक रोड मार्गे मिरवणूक कापड बाजारात जैन मंदिरात दाखल झाली. मिरवणुकीत श्री सिमंधर स्वामी भक्त मंडळ ग्रुपच्या नरेश शहा व त्यांच्या सहकार्‍यांनी अतिशय मनोहरी दांडिया रासचा कार्यक्रम सादर केला. मिरवणुकीची शोभा वाढविणार्‍या या कार्यक्रमाने उपस्थितांच्या डोळ्यांचे पारणे फेडले. तपस्वींच्या जय जयकाराच्या घोषणांनी वातावरण अतिशय धार्मिक बनले होते. प्रत्येकाने या आध्यात्मिक सोहळ्याचा आनंद लुटला.
जैन मंदिरात अध्यक्ष सुभाष मुथा यांनी सर्व तपस्वी व श्रावक श्राविकांचे स्वागत केले. यावेळी साध्वीजी संवेगनिधीश्रीजी यांनी अष्टमहासिध्दी तपाचे महत्त्व विशद करून सांगितले. त्या म्हणाल्या, भगवान महावीर स्वामी यांचे प्रथम शिष्य गौतमस्वामी यांच्याकडे अनंत सिध्दी होत्या. त्यातील 8 सिध्दी प्राप्त करण्यासाठी अष्टमहासिध्दी तप अतिशय महत्त्वाचे आहे. या तपातून सर्व चांगल्या मनोकामना पूर्ण होत असल्याने भाविकांनी या तपाचे आचरण अवश्य केले पाहिजे.
यावेळी जैन मंदिराचे ट्रस्टी लालचंद कासवा, मणिकांत भाटे, दिनेश गांधी, राजूभाई शहा, विनोद शाह, बाळासाहेब भंडारी उपस्थित होते. सर्व तपस्वींचा अजितकुमार अक्षयकुमार गांधी परिवाराच्यावतीने सत्कार करण्यात आला. याप्रसंंगी गौतम प्रसादीची व्यवस्था करणारे बाळासाहेब गुगळे व गौतम गुगळे यांचा मंदिर ट्रस्टतर्फे सत्कार करण्यात आला.

LEAVE A REPLY

*