लोणीतील मुलीवर सामूहिक अत्याचार

0

आश्वी पोलिसांच्या अकार्यक्षमतेमुळे आरोपी मोकाट

 

मुलीची मृत्यूशी झुंज

 

 

लोणी (वार्ताहर) – लोणीत राहणार्‍या आदिवासी ठाकर समाजाच्या पंधरा वर्षीय मुलगी दहावीची परीक्षा दिल्यानंतर संगमनेर तालुक्यातील खांबे गावातील मामाकडे सुट्टीसाठी गेली असता रात्रीच्यावेळी तिचे अपहरण करून तिला कोल्हापूर, पुणे येथे नेण्यात आले. बारा दिवस तिला गुंगीचे औषध देऊन तिच्यावर तीन ते चार जणांनी सामुदायिक अत्याचार केला.

 

 

या मुलीला मारहाण करून सिगारेटचे चटके देऊन आरोपींनी तिच्यावर पाशवी अत्याचार केल्याने मुलगी प्रचंड तणावाखाली असून ती मृत्यूशी झुंज देत आहे. आश्वी पोलसांनी आरोपींना मोकळे सोडून मुलीच्या नातेवाईकांनाच आरोपींसारखी वागणूक दिल्याने पोलिसांच्या कार्यपद्धतीबद्दल प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

 

 

या घटनेची माहिती मुलीचे वडील, आई आणि चुलते यांनी देताना सांगितले की, दहावीची परीक्षा संपल्यानंतर ती खांबे येथे मामांकडे सुट्टीसाठी गेली होती. 25 मे रोजी ती गेली आणि दुसर्‍याच दिवशी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दोन जणांनी दुचाकीवरून येऊन तिचे अपहरण केले. आम्ही लगेच आश्वी पोलिसांकडे तक्रार देण्यासाठी गेलो. पोलिसांनी आम्हालाच उलट प्रश्‍न विचारत आरोपीसारखी वागणूक दिली. बारा दिवसानंतर आरोपींनी तिला आणून सोडले.

 

 

तिची परिस्थिती अतिशय नाजूक होती. तिच्या सर्व अंगावर सूज होती. सिगारेटचे चटके देण्यात आल्याने तिला प्रचंड वेदना होत होत्या. अशा परिस्थितीत आम्ही तिला घेऊन पोलिसांकडे 9 जूनला गेलो. पाऊस सुरु होता. आम्हाला चार तास बाहेर बसवले. कुणीही आमची दाखल घेतली नाही. शेवटी आम्ही निघून जायला निघालो तेंव्हा आमची तक्रार घेतली. मुलीला प्रवरा रुग्णालयात नेऊन तिची वैद्यकीय तपासणी करण्यात आली. त्यात तिच्यावर अत्याचार झाल्याचे समोर आले

 

 

पोलिसांनी फक्त अत्याचाराचे एक कलम वाढवले पण आरोपींना अटक केली नाही. त्यांचा शोधही घेतला नाही. आरोपी माहित असूनही केवळ आम्ही गरीब आणि आदिवासी आहोत म्हणून आम्हाला न्याय मिळत नाही. आमचा आश्वी पोलिसांवर विश्‍वास राहिलेला नाही.

 

 

त्यांनी पुढे सांगितले मुलीने पोलिसांना जबाब दिले आहेत. तिचे अपहरण दोघाजणांनी केले. मात्र तिला पुण्याला नेल्यानंतर आणखी दोघेजण तेथे होते. तिला गुंगीचे औषध सतत देऊन बेशुद्ध ठेवण्यात आले. तिच्यावर पुण्यात आणि कोल्हापूरला नेऊन अत्याचार करण्यात आले.

 

 

बारा दिवस चार ते पाच जणांनी तिच्यावर अत्याचार केले. तिला मारहाण करण्यात आली. तिच्या संपूर्ण शरीरावर सूज आली. तिला सिगारेटचे चटके देण्यात आले. अतिशय क्रूरपणे तिचा छळ करण्यात आला. या दहशतीमुळे ती भितीच्या सावटाखाली असून मला हे लोक कधीही मारतील अशी भीती तिला वाटत आहे. अत्याचाराची बळी पडल्याने ती खूप अशक्त झाली आहे. तिला जेवण जात नाही. ती सतत झोपूनच राहते.

 

 

घाबरून उठते. आम्ही गरीब आणि आदिवासी असल्याने दवाखान्याच्या खर्च करण्यास आमच्याकडे पैसे नाहीत. म्हणून तिला दवाखान्यात ठेवले नाही. खाजगी दवाखान्यात तीन चार दिवसातून एकदा नेऊन आणतो, यापेक्षा आम्ही काहीच करू शकत नाही. पोलिसांनी दखल न घेतल्याने आम्ही खचून गेलो आहोत.

 

 

 

आरोपी मोकाट असल्याने आम्हालाही भीतीच्या सावटाखाली जगावे लागते आहे. या घटनेतून एक गोष्ट समोर आली ती म्हणजे समाज असो की सरकार कुणीच कामाला येत नाही, ज्याचे दुःख त्यालाच सहन करावे लागते. या मुलीला भेटून चर्चा करण्याचा प्रयत्न केला असता ती प्रचंड मानसिक धक्क्यात असल्याने जास्त बोलू शकली नाही. पण मला न्याय मिळेल का? असा प्रश्‍न करून ती लगेच बेशुद्ध पडली.

 

 

 

तिचे वडील आणि आई मजुरी करतात. मुलीच्या उपचारासाठीही त्यांच्याकडे पैसे नाहीत. मुलीचे अपहरण होऊन 21 दिवस झालेत. तर ती परत आल्यानंतर तिची वैद्यकीय तपासणी होऊन दहा दिवस झाले तरीही पोलिसांना आरोपी मिळत नाहीत. यावरून आश्वी पोलिसांच्या कार्यपद्धतीवर प्रश्‍नचिन्ह उभे राहणे साहजिकच आहे. या अत्याचाराच्या घटनेमुळे प्रवरा परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

 

 

ती दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली पण…  ती दहावीची परीक्षा उत्तीर्ण झाली पण… अत्याचार झालेली मुलगी लोणीतीलच एका नामांकित शाळेत दहावीत शिकत होती. नुकताच दहावीचा निकाल जाहीर झाला. ती 73 टक्के गुण मिळवून उत्तीर्ण झाली. निकालाचा आनंद ती साजरा करू शकली नाही कारण ती मृत्यूशी झुंज देत आहे. पालकांनी तिला उत्तीर्ण झाल्याचे सांगितले पण तिला होणार्‍या वेदना खूप जास्त असल्याने ती या आनंदापासून खूप दूर गेलीली आहे. निकाल ऐकूनही तिने काहीच प्रतिसाद दिला नाही.

LEAVE A REPLY

*