Type to search

लोकसभेची दोरी तरुणाईच्या हाती

ब्लॉग

लोकसभेची दोरी तरुणाईच्या हाती

Share
लोकसभा निवडणुकीची घोषणा झाली असून सतराव्या लोकसभेचे स्वरूप ठरवण्यात युवा मतदार मोठी भूमिका बजावणार आहेत. पुलवामा येथे झालेला दहशतवादी हल्ला, त्यात शहीद झालेले आपले 44 जवान, या हल्ल्याला प्रत्युत्तर म्हणून केंद्र सरकारने केलेली कारवाई या पार्श्वभूमीवर या तरुण वर्गात प्रखर राष्ट्रवादाची भावना निर्माण झाल्याचे दिसते. उलटपक्षी, विरोधी पक्षांच्या नेत्यांनी सरकारच्या कारवाईवर प्रश्नचिन्ह लावल्यामुळे चुकीचा संदेश युवकांमध्ये पसरला आहे. या मंथनातून युवा मतदार कुणाची निवड करतात, हे महत्त्वाचे ठरणार आहे.

सतराव्या लोकसभेच्या निवडणुकांची घोषणा नुकतीच झाली असून सर्वच राजकीय पक्षांनी युवा मतदारांवर लक्ष केंद्रित केले आहे. देशातील 543 जागांसाठी 7 टप्प्यात निवडणुका होणार असल्याचे केंद्रीय निवडणूक आयोगाने जाहीर केले आहे. या निवडणुकीत यंदा 90 कोटी मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. सर्वात कमी मतदान हे लक्षद्वीप येथे आहे. तिथे 49,922 मतदार आहेत. महाराष्ट्रामध्ये लोकसभेच्या एकूण 48 जागा असून सदस्य संख्येच्या दृष्टीने महाराष्ट्र हे भारतातील दुसरे सर्वात मोठे राज्य आहे.

नव्या लोकसभेचे स्वरूप कसे असेल, याचा निर्णय युवकांच्याच हाती असणार आहे. वाढत्या बेरोजगारीच्या समस्येमुळे युवक नरेंद्र मोदी सरकारवर नाराज असल्याचे वातावरण होते.

मात्र पुलवामा हल्ल्यानंतर आणि त्याची प्रतिक्रिया म्हणून भारताने पाकिस्तानातील दहशतवादी तळ उद्ध्वस्त केल्यानंतर युवावर्गात प्रखर राष्ट्रवादाची भावना निर्माण झाल्याचे दिसू लागले. ही भावना वाढीस लागण्याच्या प्रक्रियेत सोशल मीडियाने महत्त्वाची भूमिका बजावली.

यंदाच्या लोकसभा निवडणुकीत 8.1 कोटी मतदार आपला मतदानाचा हक्क पहिल्यांदाच बजावणार आहेत. 2014 ची निवडणूक झाल्यानंतर त्यांनी वयाची 18 वर्षे पूर्ण केली आहेत. यात अनेक मतदार असेही आहेत ज्यांनी 2018 च्या अखेरीस पाच राज्यांत झालेल्या विधानसभा निवडणुकीत प्रथम मतदान केले. त्यामुळे अनेक नव्या मतदारांचा कल लोकसभेच्या मतदानापूर्वी स्पष्ट झाला आहे. सतराव्या लोकसभेसाठी निवडणुकीची घोषणा झाली असून युवा पिढीने विवेकाने मतदान केल्यास देशाचे भवितव्य ठरवण्यात या पिढीची भूमिका निर्णायक ठरू शकते. कारण निवडणूक आयोगाने जारी केलेल्या ताज्या आकडेवारीनुसार, 282 लोकसभा मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य तरुणांच्या हाती असल्याचे स्पष्ट होत आहे. वयानुसार मतदारांच्या वर्गीकरणाचा जो अहवाल आयोगाने प्रसिद्ध केला आहे त्यानुसार या निवडणुकीत 8.1 कोटी नवे मतदार असतील. 29 राज्यांमधील किमान 282 मतदारसंघांतील उमेदवारांचे भवितव्य हे नवे मतदार ठरवणार आहेत. याखेरीज प्रत्येक मतदारसंघात किमान दीड लाख मतदार असे आहेत जे आयुष्यात प्रथमच मतदान करतील. 2014 मधील निवडणुकीत या 282 जागांवर विजयी उमेदवाराला मिळालेल्या मताधिक्क्यापेक्षा नव्या मतदारांची संख्या यावेळी अधिक असल्याचे आयोगाच्या अहवालावरून स्पष्ट होते.

अहवालानुसार, वेगवेगळ्या राज्यांत 2015 मध्ये झालेल्या विधानसभा निवडणुकीतील नव्या मतदारांपासून 2018 पर्यंत निवडणुकीसाठी नवीन मतदारांच्या संख्येची सरासरी काढण्यात आली आहे. यात असे आढळून आले आहे की, 12 राज्यांमध्ये नव्या मतदारांची संख्या 2014 च्या लोकसभा निवडणुकीत 217 जागांवरील विजयी उमेदवारांच्या मताधिक्क्यापेक्षा कितीतरी अधिक आहे. अशा मतदारसंघांत पश्चिम बंगालमधील 32, बिहारमधील 29, उत्तर प्रदेशातील 24, कर्नाटकातील 20, तामिळनाडूतील 20, राजस्थानातील 17, झारखंडमधील 13, आंध्र प्रदेशातील 12, महाराष्ट्रातील 12, मध्य प्रदेशातील 11 आणि आसाममधील 10 मतदारसंघांचा समावेश आहे.

सर्वाधिक जागा असणार्‍या उत्तर प्रदेशात नव्या मतदारांची सरासरी संख्या 1.15 लाखांच्या आसपास आहे. 2014 च्या निवडणुकीत विजयी उमेदवारांना मिळालेल्या सरासरी 1.86 लाखांच्या मताधिक्क्यापेक्षा ही संख्या कमी आहे. त्यावेळी समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्षाने स्वतंत्रपणे निवडणूक लढवली होती. परंतु आता अखिलेश यादव आणि मायावती यांनी त्यांच्या पक्षांची आघाडी करून मतविभागणी टाळण्याचा प्रयत्न केला आहे. सध्या या आघाडीत काँग्रेसचा समावेश नाही. जर काँग्रेसही यथावकाश या आघाडीत सहभागी झाली तर पूर्वी विखुरलेल्या स्वरुपात असणार्‍या या विरोधी पक्षांची ताकद आणखी वाढेल. परंतु राष्ट्रवादाच्या ज्वराने प्रेरित झालेली युवा पिढी या आघाडीला मते देईलच, असेही नाही. कारण राहुल गांधी, मायावती यांच्यासह अनेक नेत्यांकडून हवाई हल्ल्यात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांच्या संख्येविषयी आणि पुराव्यांविषयी जे प्रश्न उपस्थित केले जात आहेत त्यातून त्यांचे नुकसान होऊ शकते.

1997 ते 2001 दरम्यान जन्मलेले मतदार 2014 च्या निवडणुकीत मतदान करण्यास पात्र नव्हते. आता एकट्या उत्तर प्रदेशातच 24 जागा अशा आहेत जिथे उमेदवारांच्या भवितव्याचा फैसला युवा मतदार करणार आहेत. 18 ते 35 वयोगटातील मतदारांना युवा मतदारांच्या श्रेणीत ठेवले तर त्यांची संख्या 12 कोटी 36 लाख भरते. अर्थातच, हे तरुण मतदार सतराव्या लोकसभेचे स्वरूप ठरवण्यात सर्वाधिक महत्त्वपूर्ण भूमिका बजावणार आहेत. देशाचे नेतृत्व ठरण्याचा मार्ग उत्तर प्रदेशातून जातो, असे म्हटले जाते. त्यामुळे तेथील युवकांनी मनात आणल्यास ही परंपरा अबाधित राहू शकेल. या निवडणुकीच्या काळात युवकांच्या आकांक्षा आणि मांडले जाणारे मुद्दे कोणतेही असोत, निवडणुकीच्या माध्यमातून युवकांमध्ये होत असलेल्या बदलांची झलक पाहायला मिळणार, हे निश्चित झाले आहे.

जेव्हा वयाची 18 वर्षे पूर्ण करून पहिल्यांदा निवडणूक केंद्रासमोरच्या रांगेत मतदार उभा राहतो तेव्हा तो काहीसा अपरिपक्व असतो, असे मानले जाते. त्यामुळेच तो सामान्यतः निष्पक्ष मतदान करतो, असे मानले जाते. आता प्रत्येक युवकाच्या हातात मोबाईल असल्यामुळे धार्मिक, सामाजिक, आर्थिक आणि राजकीय क्षेत्राची प्रत्येक खबरबात युवकांकडे असते. या माहितीनुसार त्याचा पिंड घडत जातो. त्यामुळेच सोशल मीडियावरून तो निर्भिडपणे प्रतिक्रियाही मांडत असतो. वृत्तवाहिन्यांचा प्रभाव त्याच्यावर पडत असतोच, परंतु या सगळ्यातील गोलमाल ओळखण्याइतका तो परिपक्व झाला आहे. त्यामुळे खरी आणि खोटी बातमी यातला भेद युवक जाणतात.

पुलवामा येथे भारतीय जवानांवर झालेला दहशतवादी हल्ला आणि त्यानंतर पाकिस्तानात आपल्या वायुसेनेने केलेले हवाई हल्ले यामुळे युवा पिढीत मोठे मंथन घडून आले आहे. या घटनाक्रमाच्या आधी युवकांच्या मनात बेरोजगारी हाच प्राधान्यक्रमाचा प्रश्न होता. परंतु पुलवामामध्ये 44 जवान शहीद झाल्यानंतर तसेच त्यानंतर विंग कमांडर अभिनंदन यांनी दाखवलेले शौर्य पाहून युवकांच्या मनात राष्ट्रवादाची पेरणी पुन्हा एकदा झाली आहे. पाकिस्तानात मारल्या गेलेल्या दहशतवाद्यांची संख्या विचारणारे पक्ष आणि नेते केवळ आपल्या राजकीय स्वार्थासाठी तसे करीत असल्याची भावना युवकांमध्ये रुजू लागली आहे. सेनादलांच्या पराक्रमावर संशय व्यक्त केल्यामुळे युवकांचे मन बेचैन आहे. राष्ट्रीय सुरक्षा महत्त्वाचा मुद्दा असून दहशतवाद आणि देशाच्या आतच असलेला फुटीरतावाद यांना प्रोत्साहन देणार्‍या देशद्रोही विचारांवर नियंत्रण युवा पिढीला अपेक्षित आहे.

अशा तर्‍हेने पुलवामा हल्ल्यानंतर राष्ट्रीय चर्चेत जे मुद्दे आले आहेत ते पारंपरिक निवडणुकीच्या मुद्यांपेक्षा खूपच वेगळे आहेत. त्यामुळे कुटुंबात मान्य असलेल्या राजकीय विचारधारेविरोधात जाऊनसुद्धा युवा मतदार मतदान करू शकतात. हवाई हल्ले झाले हे युवकांना माहीत आहे. तरीसुद्धा देशातील काही नेते हवाई हल्ल्याविषयी प्रश्नचिन्ह उपस्थित करीत असताना अशा नेत्यांच्या देशभक्तीवरच युवा मतदारांना शंका आहे. अर्थात, तरीसुद्धा राष्ट्रवादाच्या भावनेत वाहून जाऊन युवा मतदार एकतर्फी मतदान करतील, असे मानणेही चुकीचे आहे. अर्थात, विरोधी पक्षाच्या नेत्यांनी या घडामोडींनंतर तोलूनमापून वक्तव्ये केली असती तर बरे झाले असते. त्यामुळे पुलवामा हल्ल्यानंतर केंद्र सरकारकडून करण्यात आलेल्या कारवाईकडे युवा मतदार एक साहसी पाऊल म्हणून पाहत आहेत.
– प्रा. पोपट नाईकनवरे

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!