Type to search

ब्लॉग

लोकसभेचा नवीन चेहरा

Share

उद्यापासून लोकसभेचे अधिवेशन सुरू होईल. 17 व्या निवडणुकीत निवडून आलले नवीन खासदार संसद सदस्यत्वाची शपथ घेतील. लोकसभेच्या नवीन अध्यक्षांची निवड होईल. लोकसभा व राज्यसभेच्या सदस्यांना उद्देशून राष्ट्रपतींचे अभिभाषण होईल आणि लोकसभा अधिवेशनाला सुरुवात होईल.

आहे नवीन लोकसभेचा चेहरा? तब्बल तीनशे नवे सदस्य लोकसभेत निवडून आले आहेत. तरुण व महिलांची संख्या वाढली आहे. 16 व्या लोकसभेच्या तुलनेत भाजपचे संख्याबळ वाढले आहे, तसेच काँग्रेस पक्षाची कामगिरी थोडी सुधारली आहे. काही राजकीय पक्षांची ताकद कमी अधिक झाली आहे. लालकृष्ण अडवाणी, डॉ. मुरली मनोहर जोशी, सुषमा स्वराज, ज्योतिरादित्य सिंदिया, मल्लिकार्जुन खरगे, अशोक चव्हाण, अनंत गिते, अडसूळ, उमा भारती इत्यादी वरिष्ठ अनुभवी चेहरे आता, लोकसभेत दिसणार नाहीत. अरुण जेटली हे राज्यसभेचे सदस्य आहेत, पण आता मंत्रिमंडळात नाही. त्यामुळे तेही लोकसभेत दिसणार नाहीत.

परंतु, नवीन सदस्यांकडून अपेक्षा आहेत. तशीच त्यांच्याबद्दल उत्सुकताही आहे. 300 नवीन सदस्यांबरोबर, लोकसभेत दुसर्‍यांदा निवडून आलेले 197 सदस्य आहेत. यापैकी 145 भाजपचे आहेत. उत्तर प्रदेशातील संतोष गंगवार व मनेका गांधी आठव्यांदा निवडून आले आहेत. नव्या लोकसभेत सर्वात तरुण खासदार चंद्राणी मुरुमु (बिजू जनता दल) 25 वर्षांच्या, तर सर्वात वृद्ध खासदाराचे वय आहे 86! 28 वर्षांचे तेजस्वी सूर्य (बंगळुरू), भाजपचे सर्वात तरुण खासदार. 47 टक्के खासदार 51 ते 65 वयोगटातील, तर एकतृतीयांश 36 ते 50 वयाचे. खासदारांचे सरासरी वय आहे 54.

17 व्या लोकसभेत निवडून आलेल्या खासदारांबाबत सर्वात धक्कादायक बाब म्हणजे 233 सदस्य किंवा 43 टक्के सदस्यांविरुद्ध गुन्हेगारीचे आरोप आहेत. असोसिएशन ऑफ डेमोकॅ्रटीक रेकॉर्डस या संस्थेने निवडणूक निकालाच्या विश्लेषणानुसार, या 233 खासदारांपैकी 116 भाजपचे, 29 काँग्रेसचे, त्याखालोखाल 13 जनतादल संयुक्त, 11 शिवसेना, 10 द्रमुक व 9 तृणमूल काँग्रेस पक्षाचे आहेत. 16 व्या लोकसभेत निवडून आलेल्या 185 खासदारांविरुद्ध गुन्हेगारीचे आरोप होते. लोकसभेतील खासदारांविरुद्धच्या गुन्हेगारी केसेसपैकी 29 प्रकरणे ही बलात्कार, खून, खुनाचा प्रयत्न किंवा महिलांविरुद्ध अपराध अशा स्वरुपाची आहेत. भाजप (5), बसपा (2), काँग्रेस राष्ट्रवादी व वायएसआर काँग्रेस या पक्षाने प्रत्येकी एक आणि एक अपक्ष असे मिळून 11 खासदाारांपैकी हत्येचा आरोप आहे. असे असोसिएशन ऑफ डेमोक्रेटीक रेकॉर्डस (एडीआर) ने म्हटले आहे.

या खेरीज मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणी खा. प्रज्ञासिंह ठाकूर यांच्याविरुद्ध दहशतवादाच्या आरोपाखाली खटला सुरू आहे. चिथावणीखोर व तिरस्कारयुक्त भाषणे दिल्याबद्दल 29 खासदारांविरुद्ध तर, घरात घुसखोरी, चोरी, धमक्या व अनाहुतपणे हत्येसकट अन्य काही गुन्हेगारी स्वरूपाच्या केसेस, इडुल्ली (केरळ) मधून निवडून आलेल्या एका खासदाराविरुद्ध आहेत.
नव्या लोकसभेतील खासदारांचे वय जसे 16 व्या लोकसभेतील सरासरी वयापेक्षा अधिक आहे, तशी त्यांची मालमत्ता व संपत्तीदेखील 45 (म्हणजे 88 टक्के) खासदार ‘करोडपती’ आहेत. भाजपचे खासदार सर्वाधिक (303) व काँग्रेसचे 52. पण मालमत्तेच्या बाबतीत मात्र काँग्रेसच भाजपच्या पुढे आहे. भाजपच्या 301 खासदारांची सरासरी मालमत्ता 14.52 कोटी, काँग्रेसच्या 51 खासदारांची मालमत्ता सरासरी 38.71 कोटी तर द्रमुकच्या 23 व वायएसआर काँग्रेसच्या 22 खासदारांची सरासरी मालमत्ता अनुक्रमे 24.51 कोटी व 54.85 कोटी रु. इतकी आहे. तुलनेने तृणमूल काँग्रेसच्या खासदारांबाबत हेच प्रमाण 6.15 कोटी इतके आहे. 17 व्या लोकसभेतील सर्वाधिक श्रीमंत तीन खासदार हे काँग्रेस पक्षाचे आहेत. छिंदवाडा (मध्यप्रदेश) मधून निवडून आलेले नकुलनाथ वसंतकुमार एच. (कन्याकुमारी) यांचा क्रमांक लागतो. एडीआरच्या अहवालात ही माहिती देण्यात आली आहे.

नव्या लोकसभेत 78 महिला खासदार आहेत. ही स्वागतार्ह बाब आहे. लोकसभेची निवडणूक लढलेल्या 8049 उमेदवारांमध्ये 724 महिला उमेदवार होत्या. पण निवडून आल्या 78 हे आकडे बरेच काही सांगून जातात. तरीही 2014 च्या निवडणुकीपैकी 2019 मध्ये 17 अधिक महिला निवडून आल्या, हे ही थोडके नव्हे. 78 महिला खासदारांमध्ये सुशिक्षित, नोकर्‍या करणार्‍या आहेत. डॉक्टर्स, वकील, कलाकारही आहेत. काही जणींच्या कथा स्फूर्तिदायक व अचंबित करणार्‍या आहेत. ओडिशातील चंद्राणी मुरूमु फक्त 25 वर्षांच्या. 2017 मध्ये मॅकेनिकल इंजिनिअर (बी. टेक) झाल्या. चार कंपन्यांमध्ये नोकरीसाठी अर्ज व सरकारी नोकरीसाठी परीक्षा दिल्या होत्या. अचानक बिजू जनता दलाकडून निवडणूक लढण्यासाठी विचारणा झाली. चंद्राणीने हो म्हटले आणि 45 दिवसांत त्या निवडणूक जिंकून खासदार झाल्या. किन्झोहार (आंध्रप्रदेश) येथील गोद्देती माधवी 16 वर्षांच्या आहे. आतापर्यंत एका आदिवासी शाळेत कंत्राटी शिक्षिका होत्या. वडील कम्युनिस्ट होते, जवळ पैसा अडका नाही. आई सरकारी शाळेत शिक्षिका गोद्देती वायएसआर काँग्रेसच्या तिकिटावर लोकसभेत निवडून आल्या. महिला खासदारांमध्ये त्यांची संपत्ती सर्वात कमी केवळ 1 लाख 47 आहे.

याउलट कृष्णानगर, (प. बंगाल) मधून खासदार झालेल्या महुआ मोईचा (तृणमूल काँग्रेस) मेसॅच्युसेट्स (अमेरिका)मधून गणित व इकॉनॉमिक्स विषयात पदवीधर बँकिंग क्षेत्रात अनुभव घेत जेपी मार्गन कंपनीच्या उपाध्यक्ष झाल्या. लंडन व न्यूयॉर्कमध्ये नोकर्‍या केल्या, आता आल्या राजकारणात. राहुल गांधी यांच्या आमआदमी की सिपाहीमध्ये प्रथम प्रशिक्षण झाले, लोकसभेची निवडणूक मात्र ममता बॅनर्जींच्या पक्षातून लढली आणि जिंकली.

तृणमूल काँग्रेसच्या नुसरत व मिमी चक्रवर्ती या दोघी खासदार व्यवसायाने अभिनेत्री, सुशिक्षित व सामाजिक कार्यकर्त्या सर्वाधिक महिला खासदार अनुक्रमे ओडिशा (बिजू जनता दल), छत्तीसगड (भाजप) व पश्चिम बंगाल तृणमूल काँग्रेसमधून निवडून आल्या आहेत.

यावेळी 27 खासदार हे मुस्लीम समाजाचे आहेत. यात उत्तर प्रदेश व पश्चिम बंगालमधून प्रत्येकी 6 खासदार आहेत. महाराष्ट्रात औरंगाबाद येथील खासदार मुस्लीम आहेत. अपक्ष खासदारांची संख्या 4 आहे.

शिक्षणाच्या बाबतीत 16 व्या लोकसभेपेक्षा 17 व्या लोकसभेतील खासदारांचा शैक्षणिक दर्जा थोडा वरचा आहे. 394 सदस्य पदवीधर आहेत तर 12 वी पास 12.5 टक्के, 10 वी पास 8.10 टक्के व 8 वी पास 2.2 टक्के आहेत. व्यावसायिक किंवा पेशेवर खासदार सांगायचे झाले तर 158 (कृषि व अन्य व्यवसाय) 124 (राजकारण), 82 (बिझनेस), 59 (सामाजिक कार्य), 21 (डॉक्टर), 18 (वकील), 16 (सेवानिवृत्त), 14 (नोकरी करणारे), 13 मनोरंजन क्षेत्र, 7 शिक्षणक्षेत्र, 1 पत्रकार व 9 अन्य (गृहिणी, खेळाडू इ.) अशी विभागणी आहे.

निवडून आलेले खासदार नेमके करतात काय, त्यांची जबाबदारी काय, मुख्य म्हणजे संसदेच्या अधिवेशन काळात सभागृहात उपस्थित राहणे व आपापल्या मतदारसंघातील जनतेचे प्रश्न उपस्थित करून सरकारने ते सोडविण्यासाठी मागणी करणे, याशिवाय जनता व देशाशी संबंधित कोणताही प्रश्न खासदार सभागृहात विचारू शकतो. याबरोबर देशांतर्गत, राष्ट्रीय, सामाजिक, आर्थिक इत्यादी विषयांवरील चर्चेत भाग घेणे व आपले मत, सूचना द्याव्या, ही खासदाराकडून अपेक्षा असते.

मतदार संघातील विकास कामांसाठी प्रत्येक खासदाराला 5 कोटी रु. चा निधी मिळतो, हा निधी त्याने मतदारसंघातील रस्ते, पूल, सामुदायिक भवन, पायाभूत व आवश्यक सोयी, क्रीडांगणे, इस्पितल इत्यादींसाठी वापरावा, असा संकेत आहे. प्रत्येक खासदाराला दर महिना 1 लाख रू. वेतन दिल्लीत त्याच्या ज्येष्ठतेनुसार सुसज्ज फ्लॅट किंवा बंगला, देशात कुठेही जाण्यासाठी वर्षभरात 34 मोफत विमान प्रवास, खासदार पती किंवा पत्नीला, वर्षभरात अधिवेशनाच्या काळात 8 विमान प्रवासांची सूट, तसेच वाहनाची सोय. खासदार, त्याची पत्नी किंवा पती एक मदतनीस यांना रेल्वेत प्रथम श्रेणी एसीचा मोफत प्रवास व सुविधा मिळते. वेतनाव्यतिरिक्त, दर महिना 40 हजार रुपयांचा निधी हा खासगी सहाय्यक सेवक वर्ग, संगणक ऑपरेटर यावर खर्च करण्यासाठी मिळतो. खासदार व त्यावर अवलंबून कुटुंब सदस्यांना मोफत वैद्यकीय इलाज इत्यादी सोयी व सवलती लोकप्रतिनिधींना मिळतात.
सुरेखा टाकसाळ

Tags:

You Might also Like

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!