लोकशाहीला पोषक पाऊल?

0
कारकिर्दीची तीन वर्षे पूर्ण झाल्याचा जल्लोष मोदी सरकार साजरा करत आहे. त्याचवेळी देशातील सतरा विरोधी पक्षांचे एकतीस नेते कॉंग्रेसच्या पुढाकाराने परवा नवी दिल्लीत एकत्र आले. संसद भवनातील ग्रंथालयात आयोजित प्रीतीभोजनानिमित्त ही बैठक झाली. कॉंग्रेस अध्यक्षा सोनिया गांधी यांनी याकामी घेतलेला पुढाकार महत्त्वपूर्ण ठरला. एरवी कॉंग्रेसशी फटकून वागणारे आणि विविध राज्यांत एकमेकांचे हाडवैरी असलेल्या विरोधी पक्षांनी कॉंग्रेसचे निमंत्रण मान्य करावे हे या घडीला कौतुकास्पद वाटते.

लोकसभा निवडणुकीनंतर राज्याराज्यांत भाजप अधिकाधिक मजबूत होत आहे. राजकीय भवितव्य आणि अस्तित्वाची चिंता लागल्यामुळे विरोधकांचे एकत्र येणे स्वाभाविक आहे. राष्ट्रपतीपदाची येती निवडणूक एकतर्फी होऊ नये आणि राष्ट्रपतीपदावर भाजपप्रभावित उमेदवार लादला जावू नये म्हणून विरोधक सचिंत असावेत. ही बैठक त्याचीच प्रचिती देते. या बैठकीत प्रामुख्याने राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीवर चर्चा झाली.

लोकशाहीत सत्ताधारी आणि विरोधी पक्ष यांची जबाबदारी सारखीच मानली जाते. सत्ताधारी पक्षाने विरोधकांना विश्‍वासात घेऊन देशाचा कारभार करावा, असा लोकशाही संकेत मानला जातो. तथापि गेल्या तीन वर्षांत असे चित्र अभावानेच दिसले. विरोधकांच्या बैठकीत राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीबाबत विचारमंथन झाले. मात्र कोणत्याही संभाव्य उमेदवाराच्या नावाचा उल्लेख कटाक्षाने टाळला गेला.

धर्मनिरपेक्ष प्रतिमा आणि राज्यघटनेची चांगली जाण असलेल्या उमेदवाराचे नाव सत्ताधारी पक्षाकडून पुढे आल्यास त्यावर सहमती दर्शवण्याची तयारी विरोधकांनी व्यक्त केली आहे. अर्थात एकजुटीतून भाजपवर दबाव निर्माण करण्याची विरोधकांची खेळी समयोचित आहे. राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीनिमित्ताने विरोधकांचा विधायक दृष्टिकोन प्रथमच जनतेच्या निदर्शनास आला आहे. सत्ताधारी पक्षाला मात्र सहमतीची आवश्यकता फारशी मानवत नसावी. जगात हेच चित्र सर्वत्र आढळते.

अमेरिका, मध्यपूर्वेतील काही देश तसेच उत्तर कोरिया आदी देशांमध्ये विरोधकांना न जुमानण्याचा विचारप्रवाह जोर धरत आहे. भारतातील विद्यमान सत्ताधारीही त्याला अपवाद नाहीत. अशा वातावरणात राष्ट्रपतीपदाच्या निवडणुकीसाठी विरोधकांनी दर्शवलेली सकारात्मक भूमिका आणि सहमतीची तयारी लोकशाहीला पोषक व पूरक आहे. अर्थात लोकशाहीबद्दल सत्तारूढ पक्ष तितकाच आस्थेवाईक असेल तर! विरोधकांनी देऊ केलेल्या या सहकार्याला सत्ताधारी पक्षाकडून कसा प्रतिसाद मिळतो आणि विरोधकांचा हा प्रयत्न किती यशस्वी ठरू शकतो हे राष्ट्रपतीपदाचे उमेदवार जाहीर होताना स्पष्ट होईल.

LEAVE A REPLY

*