लोकराज्य वाचक अभियान प्रेरणादायी

0

‘वाचाल तर वाचाल’ ही म्हण सद्यस्थितीत केवळ भिंतीची शोभा वाढवित आहे. कारण प्रत्यक्षात विद्यार्थी-पालक, शिक्षकांमधील वाचनाची सवय कमी होत आहे. पुस्तके वाचनामुळे बुध्दी, मन याचा विकास होतो आणि ज्ञानात भर पडते.

बालमनावर वाचनाचे संस्कार झाले पाहिजेत. वाचन संस्कृती जोपासण्यासाठी शिक्षक, पालकांची भूमिका महत्वाची आहे. यापूर्वीच्या पिढीपेक्षा आताच्या पिढीचे वाचन अगदी अल्प झाले आहे अशी तक्रार सर्वच करतात. मात्र तरूणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्व कळावे यासाठी प्रयत्न करणारे थोडेच आहेत. विद्यार्थ्यांचे हित लक्षात घेता महाराष्ट्र शासनाच्या माहिती व जनसंपर्क महासंचालनालयाच्या वतीने ‘लोकराज्य वाचक अभियान’ हाती घेण्यात आले असून ते विद्यार्थ्यांचे जीवन फुलविण्यासाठी नक्कीच प्रेरणादायी ठरेल.माणसाचे जीवन फुलविण्यात वाचनाचा महत्वाचा वाटा असतो. ज्ञानात सतत वाढ करण्यासाठी वाचन हा एकमेव मार्ग आहे. लहानांपासून मोठ्यांपर्यंत पुस्तके हा अनेकांच्या जिव्हाळ्याचा विषय.

पूर्वी पुस्तक मिळण्याचे एकमेव ठिकाण म्हणजे वाचनालय. एवढेच नाही तर अनेकांच्या घरात पुस्तकांचे कपाट असायचे. ‘ज्याच्या घरात नाही पुस्तकांचे कपाट, त्याचे जीवन होईल सपाट’ असे म्हटले जाते. मात्र आज त्या वाचनालयाची, कपाटांची जागा इंटरनेट आणि ई-बुकने घेतली. असे असले तरी वाचन संस्कृती हळूहळू कमी होत आहे. तरूणांमध्ये वाचनाची गोडी निर्माण व्हावी, त्यांना वाचनाचे महत्व कळावे यासाठी राज्य शासनाचे मुखपत्र असलेल्या ‘लोकराज्य’ मधील माहिती विद्यार्थ्यांच्या सर्वांगिण विकासासाठी उपयुक्त असल्याने दि. 1 सप्टेंबर 2018 रोजी जळगाव जिल्हा माहिती कार्यालयाच्या वतीने डॉ.आण्णासाहेब जी.डी.बेंडाळे महिला महाविद्यालयात ‘लोकराज्य वाचक अभियान’चा शुभारंभ अप्पर जिल्हाधिकारी श्री.गाडीलकर, प्राचार्य डॉ.एस.एस.राणे, जिल्हा माहिती अधिकारी विलास बोडके यांच्या उपस्थितीत पार पडला. लोकराज्य हे महाराष्ट्राच्या समाज मनाचा आरसा आहे. शासन समाजासाठी जे काही करते, त्याचे प्रतिबिंब यात उमटते. चालू घडामोडी, राज्यातील सर्व जिल्ह्यांची ऐतीहासीक, भौगोलीक, सांस्कृतीक, औद्योगीक, शैक्षणिक, कृषी, आर्थिक याची माहिती विद्यार्थ्यांसाठी व वाचकांसाठी उपयुक्त असे आहे.

पुस्तक हे केवळ शब्दसंपदा वाढविण्यास मदत करणारे साधन नसून पुस्तक हे अनुभवांसह कल्पनांचे, आशा-आकांक्षांचे क्षितीज निर्माण करणारे साधन आहे. वाचनाची सवय एकदा लागली की माणूस मनावरचा ताण कमी करण्यासाठी पुस्तकांच्या सहवासात गुंगून जातो. पुस्तकांमुळे कमकुवत मनाला धीर मिळतो. आजकालच्या तरूणांना खूप ताण असतो. त्या अनुषंगाने वाचन त्यांना मदत करू शकते. माजी राष्ट्रपती डॉ.ए.पी.जे.अब्दुल कलाम यांचा 15 ऑक्टोंबर हा जन्मदिवस राज्यभरातील सर्व शाळांमध्ये ‘वाचन प्रेरणा’दिन म्हणून साजरा केला जातो, याचे नक्कीच स्वागत करायला हवे. तंत्रज्ञान कितीही बदलले तरी वाचनाचे महत्व अबाधीतच राहणार आहे.

ऑनलाईन वाचनाकडे विद्यार्थ्यांचा कल जगभरात इंटरनेट वापरणार्‍यांची संख्या झपाट्याने वाढत आहे. तरूण पिढी ही अधिकच तंत्रज्ञान प्रेमी झाली आहे. मोबाईल हा त्यांच्या जीवनाचा अविभाज्य भाग बनला आहे. आपली वाचनाची गरज ते मोबाईलवरूनच भागवितात. मात्र पुस्तक वाचनाची मजा काही वेगळीच असते हे विसरायला नको. त्यामुळे विद्यार्थ्यांनी पुस्तकाशी मैत्री करा, पुस्तक वाचनाची गोडी निर्माण करा.
मो. 9403566381
– राजेंद्र पाटील

LEAVE A REPLY

*