लूटमार, जबरी चोर्‍या करणारे 15 आरोपी जेरबंद

0

पोलीस अधीक्षकांची माहिती : 15 गुन्ह्यांची उकल,  10 लाखांहून अधिक मुद्देमाल जप्त

अहमदनगर (प्रतिनिधी)- एमआयडीसी, संगमनेर शहर व तालुका, पारनेर, राहुरी, सुपा परिसरात जबरी चोर्‍या व लूटमार करणारे विविध गुन्ह्यांतील एकूण 15 आरोपी पोलिसांनी जेरबंद केले. स्थानिक गुन्हे शाखा व विविध पोलिस ठाण्यांनी संयुक्तरित्या ही कामगिरी बजावली. पोलिस अधीक्षक रंजनकुमा शर्मा यांनी शनिवारी दुपारी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. गेल्या आठवडाभरातच ही कामगिरी झाली आहे. आरोपींकडून पोलिसांनी एकूण 15 गुन्ह्यांची उकल झाली असून 10 लाख रुपयांपेक्षा अधिक मुद्देमाल हस्तगत केला आहे.
निमोण (ता. संगमनेर) येथे एका व्यक्तीला 5 जणांच्या टोळीने लुटले. त्यातील शरद भाऊसाहेब घुगे, विकास खंडू घुगे, भगवान वाळीबा घुगे (सर्व रा. संगमनेर) व राहुल संजय सोनवणे (सिन्नर फाटा, नाशिक) या चौघांना गुन्हे शाखा व संगमनेर पोलिसांनी पकडले. चोरुन नेलेल्या सव्वा सात लाखांपैकी 3 लाख रुपये हस्तगत केले आहेत. इतर आरोपींचा शोध सुरू आहे. 7 मेला सुपा परिसरात एका कुटुंबाला लुटणार्‍या बीडच्या आरोपींच्या टोळीतील दोघांना सुपा पोलिसांनी पकडले. अशोक राजेंद्र तळेकर (फुलसांगवी, ता. बीड) व राजाभाऊ आश्रुबा मुंढे (धारुर, बीड) अशी त्यांची नावे आहेत. त्यांनी पाच गुन्ह्यांची कबुली दिली.
9 मेला संगमनेर शहर हद्दीत ट्रकचालकाला लुटणार्‍या दोघांना पोलिसांनी पकडले. स्वप्निल विजय बोर्‍हाडे (साकुरी, राहाता) व सागर नामदेव साळुंके (रा. शिर्डी) अशी आरोपींची नावे आहेत. 11 मेला राहुरी हद्दीत बेवारस मारुती स्विफ्ट पोलिसांना मिळाली. त्यात गणेश उर्फ विशाल बाळासाहेब शेटे मिळाला. नंतर त्याचे साथीदार तोफिक मुक्तार शेख, अक्षय सुदाम भाले, सागर सुरेश शिंदे, अल्ताफ एजाज शेख यांनाही पोलिसांनी जेरबंद केले. ट्रकचालकांना मारहाण करुन लुटल्याची कबुली त्यांनी दिली आहे. त्यांच्याविरुद्ध राहुरी पोलिस ठाण्यात गुन्ह्याची नोंद आहे.
एमआयडीसी हद्दीत जबरी चोर्‍या करणारे अक्षय उर्फ मेंबर सुरेश गायकवाड (बोल्हेगाव) व वसंत उर्फ अमोल मारुती निमसे (खारेकर्जुने) यांनाही पोलिसांनी पकडले. त्यांच्याकडून एक चोरीचा मोबाईल जप्त करण्यात आला. त्यांच्याविरुद्ध तीन गुन्ह्यांची नोंद आहे. याच हद्दीत चारचाकी वाहनचोरी करणारा दाऊद शेख मंजूर शेख पोलिसांनी पकडला. तो चारचाकी वाहनचोरीमध्ये सराईत असून त्याने 20-22 वाहने चोरल्याची कबुली दिली आहे. सुपा हद्दीत प्रवासी म्हणून बसून लुटमार करणारा मच्छिंद्र चंद्रकांत पडवळ (रा. शेलु, ता. खेड) याला अटक करुन एक मोबाईल जप्त केला आहे.
या पत्रकार परिषदेला अतिरिक्त पोलिस अधीक्षक घनश्याम पाटील, स्थानिक गुन्हे शाखेचे पोलिस निरीक्षक दिलीप पवार, सुपा पोलिस ठाण्याचे पोलिस निरीक्षक श्यामकांत सोमवंशी आदी अधिकारी उपस्थित होते.
  शिर्डी येथे साईबाबांचा जन्मशताब्दी सोहळा सुरू होत आहे. या पार्श्वभूमीवर पोलिस दलातील 70 अतिरिक्त कर्मचारी बंदोबस्तासाठी दिले जाणार आहेत. याशिवाय शिर्डी संस्थानच्या सुरक्षा विभागातील कर्मचार्‍यांना आवश्यक ते प्रशिक्षण दिले जाणार आहे. परिसरात सीसीटीव्हीची संख्याही वाढवली जाईल. तपासची पॉईंटही ठरवण्यात आले आहेत. याबाबत सोमवारी नाशिक परीक्षेत्राचे विशेष पोलिस महानिरीक्षक बैठक घेत आहेत, असेही पोलिस अधीक्षक शर्मा यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

*