लायन्स क्लब सामाजिक कार्यासाठी एक ब्रॅण्डनेम : रमेश शहा

0

सतीश झिकरे, लतिका पवार यांनी स्वीकारली अध्यक्षपदाची सूत्रे

अहमदनगर (प्रतिनिधी)- लायन्स क्लब सामाजिक कार्यासाठी एक ब्रॅण्डनेम झाला आहे. आंतराष्ट्रीय लायन्स संघटनेला शंभर वर्षे पुर्ण होवून, जागतिक पातळीवरील सेवाभावी संस्था म्हणून नांवलौकिक प्राप्त झाला आहे. लायन्सचे सामाजिक कार्य सर्वांपर्यंन्त पोहचविण्याची जबाबदारी प्रत्येक सदस्याची असून, यामुळे समाजात इतरांना देखील प्रेरणा मिळणार आहे. लायन्स मिडटाऊनने शहरासह जिल्ह्यात आरोग्य, सामाजिक, शैक्षणिक क्षेत्रात भरीव कामगिरी करुन, लायन्सची प्रतिमा जनमानसात उंचावली असल्याचे प्रतिपादन उपप्रांतपाल रमेश शहा यांनी केले.
हॉटेल यश पॅलेसमध्ये लायन्स व लायनेस क्लब ऑफ अहमदनगर मिडटाऊनचा 24 वा पदग्रहण सोहळामोठ्या थाटात संपन्न झाला. यावेळी शहा बोलत होते.
याप्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून धर्मादाय उपायुक्त श्रीमती एच.के. शेळके, आनंद आंबेकर, संदिप कोयटे, किरण भंडारी, संतोष माणकेश्‍वर, नुतन अध्यक्ष संतोष झिकरे, श्रीकांत मांढरे, अ‍ॅड.रविंद्र शितोळे, भरत कोरडे, लायनेसच्या नवनिर्वाचित अध्यक्षा लतिका पवार, संपुर्णा सावंत, छाया रसाळ, राजश्री मांढरे आदिंसह शहरातील प्रतिष्ठित उद्योजक, व्यापारी, डॉक्टर्स, अ‍ॅडव्होकेट तसेच सामाजिक व राजकिय क्षेत्रातील मान्यवर मोठ्या संख्येने उपस्थित होते.
प्रारंभी सई दसरे या विद्यार्थीनीने गणेश वंदनेवर नृत्य सादर केले. उपस्थित पाहुण्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन होवून कार्यक्रमाला प्रारंभ झाले.
मावळते अध्यक्ष संतोष माणकेश्‍वर व लायनेसच्या राजश्री शितोळे यांनी मागील वर्षी राबविण्यात आलेल्या सामाजिक कार्याचा अहवाल सादर केला. श्रीकांत मांढरे यांनी गेल्या 24 वर्षात लायन्स मिडटाऊनच्या माध्यमातून विविध क्षेत्रातील सेवा कार्ये व कायम स्वरुपी प्रकल्पांची माहिती दिली. आनंद आंबेकर यांनी नुतन सदस्यांना शपथ दिली.
उपप्रांतपाल शहा यांनी नुतन सदस्य यांना लायन्सच्या कार्याची माहिती देवून, नवनिर्वाचित पदाधिकार्‍यांना आपल्या जबाबदारींची कल्पना दिली. यावेळी क्लबचे नुतन अध्यक्ष सतीश झिकरे व लायनेसच्या अध्यक्षा लतिका पवार यांनी पाहुण्यांच्या उपस्थितीत मावळत्या अध्यक्षांकडून पदाची सुत्रे स्विकारली.
झिकरे व पवार यांनी यावर्षीच्या कार्यकाळात भरीव सामाजिक कार्य करण्याचा व महिलांच्या सक्षमीकरणासाठी विशेष उपक्रम राबविण्याचा संकल्प व्यक्त केला. धर्मदाय उपायुक्त श्रीमती एच.के. शेळके यांनी आंतराष्ट्रीय ख्याती असलेल्या लायन्सच्या सामाजिक कार्य भावले आहे. समाजात वंचित घटकांसाठी लायन्सचे कार्य कौतुकास्पद असून, या सामाजिक कार्यात सहभागी होण्यासाठी लायन्सचे सभासदत्व स्विकारणार असल्याचे जाहिर केले. कार्यक्रमाचे सुत्रसंचलन शोभा भालसिंग व श्रीकांत मांढरे यांनी केले. पसायदानाने कार्यक्रमाची सांगता झाली. उपस्थितांचे आभार राजश्री मांढरे यांनी मानले.

LEAVE A REPLY

*