‘लाचलुचपत’ची पत घसरली!

0

अहमदनगर (प्रतिनिधी) –  प्रशासकीय खात्यातील भ्रष्टाचार संपवून नागरिकांच्या मदतीला धावण्याची महत्वाची भूमिका बजविणार्‍या लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने 2017 मध्ये केवळ सात कारवाया केल्या आहेत.  या विभागाकडे नागरिकांच्या तक्रारी येण्याचे प्रमाणही कमी झाले आहे. पांगरमल घटनेतील आरोपींच्या संपर्कात असलेल्या या शाखेची समाजात पत घटल्याची चर्चा खुलेआम सुरू आहे.

नगरची लाचलुचपत शाखा नेहमीच वादाच्या भोवर्‍यात सापडली आहे. कधी बनावट सापळे, कधी अधिकार्‍यांच्या विरोधात तक्रारी, तेथील अधिकारी व कर्मचार्‍यांचा आरोपींशी असलेला संपर्क, ब्लॅकलिस्टमधील आरोपींना लाचलुचपतचे अभय, जाळ्यात अडकविण्याच्या धमक्या असे अनेक प्रकार लेखी स्वरूपात उपलब्ध आहेत. पांगरमल घटनेतील काही आरोपी ‘लाचलुचपत’च्या काहींच्या संपर्कात राहुन पोलीस व महसुल शाखेसह अन्य शाखेतील अधिकारी व कर्मचार्‍यांना ब्लॅकमेल करीत असल्याचा प्रकार समोर आल्यानंतर तेथील अधिकार्‍याची बदली करण्यात आली. मात्र त्याचा परिणाम जनतेच्या विश्‍वासार्हतेवर झाला आहे.

2015 मध्ये ‘लाचलुचपत’च्या जाळ्यात 38 प्रकरणात 48 लाचखोर अडकलेे. 2016 मध्ये वर्षभरात 35 प्रकारणात 41 लाचखोरांना बेड्या ठोकल्या. ही अकडेवारी समाधानकारक असली तरी 2017 मध्ये केवळ सात कारवाया करून आठ जणांना अटक करण्यात आली आहे. म्हणजे अन्य वर्षाच्या तुलनेत ही अकडेवारी कारवाईचा आलेख कमी होत चालल्याचे स्पष्ट करते.

गेल्या सहा महिन्यात आरोग्य, कृषी खाते प्रत्येकी 1, महसुल 2, पोलीस 3, आशा केवळ 7 कारवाया झाल्या आहेत. या अकडेवारीचा विचार करता जनतेचा विश्‍वास उडत चालल्याचे दिसत आहे. हा विचार करता लाचलुचपत शाखेच्या महानिरीक्षकांनी काही अधिकारी व कर्मचार्‍यांची चौकशी सुरू केली आहे. अधिकार्‍याची बाजूच्या शाखेत बदली केली आहे. त्यांच्या जागी पोलीस उपअधिक्षक विष्णू ताम्हाणे यांनी पदभार घेतला आहे. त्यांना जनतेचा विश्‍वास संपादन करण्यासाठी कोठी कसरत करावी लागणार आहे.

‘लाचलुचपत’ शाखेत ब्लॅकलीस्टवर असणारे आरोपीच ‘लाचलुचपत’च्या अधिकारी व कर्मचार्‍यांच्या संपर्कात होते. त्यामुळे संगनमताने मोठा मेवा जमविण्याचे काम त्यांच्याकडून केले जात होते. जर एखादा अधिकारी अर्थपुर्ण तडजोडीला मान्य झाला नाही तर त्याच्यावर खोटा सापळा लावून गुन्हा दाखल करणे, त्याचे निलंबन करणे, अशा प्रकारे अधिकार्‍यांवर कारवाई केल्याच्या नोंदी कोतवाली पोलीस ठाण्याच्या नोंद रजिस्टरमध्ये दाखल आहेत. दरम्यानच्या कालावधीत कारवाई झालेल्या बहुतांशी केसेस निर्दोष झाल्या आहेत. लाचलुचपतच्या या बनावट छाप्यामुळे चांगल्या अधिकार्‍यांची बदनामी होत आहे. त्यामुळे याप्रकरणी एका अधिकार्‍यानेच उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे. अशा प्रकारामुळे या शाखेचे नाव बदनाम होत आहे.

तृतीय वर्गातील कर्मचारी बदनाम
सरकारी कार्यलयात प्रथमवर्ग, द्वितीय व तृतीयवर्ग असतात. वरिष्ठ अधिकार्‍यांचा मेवा जमा करण्याचे काम तृतीय वर्गातील कर्मचारी करीत असतो. मात्र लाचलुचपतची कारवाई झाल्यास कर्मचार्‍यालाच बेड्या ठोकल्या जातात. मु्ख्य सुत्रधार मात्र मोकाट राहतात. एखादा प्रथम दार्जाचा अधिकारी यात सापडला तरी येथे मोठी अर्थपुर्ण तडजोड होते. गेल्या तीन वर्षात केवळ चार प्रथमवर्गातील अधिकारी, तीन द्वितीय वर्गातील, 11 अन्य व 37 तृतीय वर्गातील कर्मचारी लाचलुचपतच्या जाळ्यात सापडले आहेत. त्यामुळे केवळ कर्मचारीच यात बदनाम झाला आहे. म्हणून या घटनेच्या मुळापर्यंत जाऊन तपास करण्याची गरज आहे.

बनावट ट्रॅप, ब्लॅकमेलींग, दलाली करुन देणार्‍यांना या शाखेकडून अभय दिला जात असल्यामुळे तेथील अधिकार्‍यांवर वरिष्ठांनी बदलीची कारवाई केली आहे. तर काहीची चौकशी सुरू आहे. त्यामुळे लाचलुचपत शाखेच्या कार्यक्षमतेवर प्रश्‍नचिन्ह निर्माण झाले आहे.

LEAVE A REPLY

*