लाख बंधारा फुटण्याची शक्यता

0

कार्यकारी अभियंत्यांनी केली पोलिसांकडे तक्रार

 

श्रीरामपूर (प्रतिनिधी) – प्रवरा नदीवरील लाख बंधार्‍याच्या भिंतीवरुन वाळुतस्करांनी रस्ता तयार करून वाळू उपसा सुरू केला आहे. त्यामुळे बंधारा फुटण्याची शक्यता निर्माण झाली असून त्याची गंभीर दखल जलसपंदा विभागाने घेतली असून कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी पोलिसांकडे तक्रार केली आहे.

 

 

प्रवरा नदीपात्रातील दायमाबाद ते मालुंजा बंधारा या लाडगाव हद्दीतील सुमारे 2 कोटी रुपयांची वाळूही तस्करांनी उचलली असून महसूल कर्मचारी या प्रकारात सामिल होते. आता या वाळू उपशाचा पंचनामा करण्यात आला नसल्याने तस्कर मोकळे झाले आहेत. या भागातील काही पुढार्‍यांच्या आशीर्वादाने वाळू उपसा सुरू आहे. आता दायमाबाद येथील वाळू संपल्याने त्यांनी आपला मोर्चा लाख बंधार्‍याकडे वळविला आहे.

 

 

लाख रेल्वेपुलाखालून तस्करांनी रस्ता तयार केला आहे. विशेष म्हणजे वाळूच्या मालमोटारी जाण्याकरिता बंधार्‍याच्या भिंतीवरून जाण्यासाठी दोन्ही बाजूने भराव तयार करण्यात आले आहे. या मोटारींची ये-जा होत असल्याने भिंतीला धोका निर्माण झाला आहे. रेल्वेपुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे. जलसंपदा विभागाच्या काही कर्मचार्‍यांनी हप्तेखोरी करून त्याकडे दुर्लक्ष केले. महसूल खात्याचे कर्मचारी तसेच पोलिसही यात गुंतले आहेत.

 

 

राज्यात नदीवर ब्रिटीशांनी लाख हे पहिले धरण बांधले. त्याला स्वतंत्र कायदा आहे. आमदार बाळासाहेब मुरकुटे यांनी कालव्याचे पुनरुज्जीवन करण्याचा प्रयत्न चालविला असून त्याकरिता सुमारे पाच कोटी रुपयांच्या प्रस्तावाला मंजुरी दिली आहे. मात्र आता बंधाराच धोक्यात आला असून रेल्वे पुलालाही धोका निर्माण होण्याची शक्यता आहे.

 

 

नगर पाटबंधारे मंडळाचे कार्यकारी अभियंता किरण देशमुख यांनी याप्रकरणी पाहणी करून अहवाल देण्याचा आदेश उपअभियंता दादासाहेब खोसे यांना दिला आहे. तसेच पोलिसांकडे कारवाई करण्यात येणार आहे. लाडगाव परिसरात अनधिकृत विटभट्ट्या सुरू असून त्यातील काही लोकांनी वाळूतस्करी सुरू केली आहे. आत्तापर्यंत कोट्यवधी रुपयांची वाळू उचलून कोणतीही कारवाई न झाल्याने तस्करांनी बंधाराच फोडण्याचा घाट घातला आहे. रेल्वे विभागाचेही त्याकडे दुर्लक्ष आहे.

 

 

त्यांच्या हद्दीतून वाहतूक होत असताना पढेगाव व टाकळीमियाँ येथील रेल्वेस्थानक प्रमुखांनी त्याकडे दुर्लक्ष केले आहे. स्थानक प्रमुखांविरुध्द वरिष्ठ अधिकार्‍यांकडे तक्रारी करण्यात आल्या आहेत. आता कार्यकारी अभियंता देशमुख यांनी दिलेल्या आदेशामुळे वाळुवाहतुकीला आळा बसण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे.

 

 

प्रांताधिकारी तेजस चव्हाण व तहसीलदार सुभाष दळवी यांनी याप्रकरणी कारवाई करण्यात येईल असे सांगितले. तसेच कर्मचार्‍यांना कारवाईचे आदेश दिले होते. पण अद्याप कारवाई झालेली नाही. विशेष म्हणजे अधिकार्‍यांनी दिलेले आदेश कर्मचार्‍यांनी डावलले असून यासंदर्भात लाचलुचपत प्रतिबंधक विभागाकडे संबंधितांविरुध्द तक्रार करण्यात आली आहे. जिल्हाधिकारी अभय महाजन यांच्याकडेही तक्रारी करण्यात आल्या आहेत.

LEAVE A REPLY

*