लघुसिंचन विभागाकडून शासन निर्देशांची पायमल्ली

0
रामकृष्ण पाटील,धुळे । दि.14 ।- एखादा जलसाठा राखीव ठेवण्याचा प्रश्न असो कि नव्याने निर्माण करण्याचा, प्राधान्यक्रमाने पिण्याच्या पाण्याला जास्त महत्व दिले जाते.
शेतीसाठी पाणी आवश्यक असले तरी शासनदरबारी त्याच्यापेक्षा जास्त काळजी निश्चितच पिण्याच्या पाण्यासंदर्भात घेतली जाते. परंतू शासनाच्या या निर्देशांची व ग्रामस्थांच्या मुलभूत प्रश्नाची पायमल्ली करण्याचा मुजोरपणा लघुसिंचन विभागाने केला आहे.
तिसगांवच्या टकर्या वस्तीचे पाणीस्तोत्र बळकट होतील या उदात्त हेतूने ग्रामस्थांनी भात नदीवरील बंधार्‍यात काम करायचे सुचविले.
परंतू पाणी मात्र वेगळ्याच ठिकाणी मुरले व वडेलच्या हिरव्या धरणात काम झाले. लघुसिंचनाच्या या मुजोरपणापायी टकार्‍या वस्तीचा पाणीप्रश्न मात्र जैसे थेच राहिला.

जलयुक्त शिवार अभियान या राज्य सरकारच्या महत्वाकांक्षी योजनेची सरकारने स्वत:ची अशी एक चौकट घालुन दिली आहे.

असे असतांनाही बर्‍याच ठिकाणी ही योजना बाबुगिरीच्या फेर्‍यात अडकल्याच्या तक्रारी ऐकावयास येत आहेत. या अभियानाचे निकष आप-आपल्या पध्दतीने वाकविण्याचा प्रकारही समोर येत आहे.

जलयुक्तीची कामे होतांना जलस्तोत्र बळकट करणे आवश्यक आहे. विशेषतः पिण्याच्या पाण्याचे स्तोत्र मजबुत करण्याबाबत शासनाची आग्रही भूमिका आहे. या प्राधान्यक्रमाणेच कामे व्हावीत, या हेतूने जलयुक्त शिवार अभियानात त्या-त्या गावाचा समावेश झाल्यानंतर त्या गावातील ग्रामस्थांना या प्रक्रियेत सामिल केले जाते.

विविध शासकिय विभागांच्या अधिकार्यांनी त्या गावातील जलयुक्तच्या कामांबाबत सरळ निर्णय घेणे हे त्या गावावर विकासात्मकदृष्ट्या अन्याय होऊ शकतो, कारण त्या गावाच्या समस्या व त्यावरील उपायांची जाण जेवढी तेथील ग्रामस्थांना आहे तेवढी निश्चितच अधिकार्‍यांना राहणार नाही.

हे शासनास ज्ञात असल्याने या अभियानाच्या प्रत्येक टप्प्यावर ग्रामस्थांच्या सहभागाचे नियोजन सरकारतर्फे करण्यात आले आहे.

तिसगाव येथे जलयुक्त शिवार अभियानाचे काम करतांना या शासकीय निर्देशांना मात्र लघुसिंचन विभागाने धाब्यावर बसविले आहे.

तिसगाव शिवारातील टकार्‍या वस्तीला पिण्याच्या पाण्याची भक्कम सोय नसल्याने या वस्तीजवळील बंधार्‍यात काम करण्यात यावे अशी मागणी ग्रामस्थांतून होती.

जेणेकरुन या वस्तीचा पाणीप्रश्न सुटण्यास मदत होईल. परंतू लघुसिंचन विभागाने नागरिकांच्या या मुलभूत प्रश्नाची पायमल्ली करत कामात बदल केला.

या बंधार्‍याऐवजी वेगळ्याच ठिकाणी पाणी मुरले व सबंधित विभागाने ग्रामस्थांच्या भावनांचा अनादर करत वडेल शिवारातील बंधार्‍यात काम केले.

लघुसिंचन विभागाच्या या सावळा गोंधळामुळे तिसगावच्या टकार्‍या वस्तीचा पाणीप्रश्न जैसे थे राहिला. यात मुजोरी करणार्‍या लघुसिंचन विभागाची सबंधित अधिकार्‍यांची चौकशी करुन कठोर कारवाई होण्याची मागणी ग्रामस्थांतून होत आहे.

याबाबत ग्रामस्थ कायदेशिर लढा लढणार असल्याचेही समजते.

 

LEAVE A REPLY

*