‘रोहिण्या’ निघाल्याने खरिपासाठी शेतकर्‍यांची लगबग सुरू

0

नांगरणीसाठी बैलांऐवजी ट्रॅक्टरला पसंती

 

पाडळी रांजणगाव (वार्ताहर) – मे महिन्याच्या सुरुवातीपासूनच अवकाळी पावसाने काही प्रमाणात सगळीकडे हजेरी लावल्याने आणि रोहिण्या नक्षत्र गुरूवारी (दि. 25) निघाल्याने शेतकरीदादा खरीप पेरणीपूर्व मशागतीसाठी लगबग करू लागला आहे.

 
यापूर्वी मान्सूनचे आगमन लवकर होणार असल्याचा अंदाज हवामान खात्याने वर्तविला आहे. 2-3 वेळा मान्सूनपूर्व अवकाळी पावसाने हजेरी लावल्याने बळीराजा कुटुंबीयांसह शेतातील नांगर, कुळवणी, जमीन सपाटीकरण, बांध बंदिस्ती आदी मशागतीची कामे करण्यात मग्न झाला आहे. मान्सूनचे आगमन अगदी काही दिवसांवर येऊन ठेपल्याने शेतातील कामे भर-भर आटोपून घेण्यासाठी बैलजोडीबरोबरच ट्रॅक्टरचा वापर केला जात आहे.

 
सध्या ढग वाढू लागल्याने व मान्सूनसदृश स्थिती निर्माण होऊ लागली आहे. रोहिणी नक्षत्र (25 मे) सुरू झाल्याने मृग नक्षत्रात खरिपाची पेरणी केल्यास पिकाची उगवण क्षमता चांगली होऊन उत्पन्न चांगले मिळते. पशुधन (बैल) मोठ्या प्रमाणात कमी झाल्याने ट्रॅक्टरवर कामे आटोपण्याशिवाय शेतकर्‍यांना पर्याय नाही. यामुळे अशी अद्ययावत अवजारे घरोघरी दिसू लागली आहेत.

 

काहीही असले तरी येत्या जून महिन्यात वेळेवर पाऊस झाला तर बळीराजाही हयगय न करता वेळेवर पेरणी करण्यासाठी आपल्या तिफणीवर मूठ ठेवणार असल्याची माहिती जाणकार भाऊ पाटील, बबन करंजुले, बाबा महाराज उबाळे या शेतकर्‍यांच्या चर्चेतून सध्यातरी मिळत आहे.

 

मृगातही चांगला पाऊस पडण्याची आशा!
खरिपाच्या हंगामासाठी मशागतीची सुरुवात खर्‍या अर्थाने याच नक्षत्रापासून सुरू होते. रोहिणी नक्षत्राच्या पावसाने जमिनीत वापसा तयार होऊन मृग नक्षत्रातील पेरणीस योग्य असे वातावरण तयार होते. त्यामुळे पेरणी केलेले बियाणे जमिनीत रुजण्यास मदत होते. मृगाआधी रोहिणीचा पाऊस चांगला झाल्यास शेतीची मशागत चांगली होऊन मृग नक्षत्रात पेरणी झालेल्या पिकाचे कमी खर्चात अमाप पीक हाती येते, असा आजवरचा ग्रामीण भागातील वयोवृद्ध शेतकर्‍यांचा अनुभव आहे. पंचांगशास्त्रानुसार यावर्षी रोहिणी व मृग नक्षत्राचा पाऊस चांगला होण्याचे संकेत आहेत.

LEAVE A REPLY

*