रोबो तंत्रज्ञान प्रत्येकाचे जगणेच बदलून टाकेल

0

अमेरिकेच्या डॉ.जेम्स इंग्लिश यांचा दावा; अ.नगर महाविद्यालयात रोबोटिक्सवर व्याख्यान

अहमदनगर (प्रतिनिधी)- संगणक व मोबाईल क्रांतीच्या आजच्या युगात रोबो तंत्रज्ञानाचा मोठा हातभार असून भविष्यात सर्वच क्षेत्रात रोबो तंत्रज्ञानाचा वापर मोठ्या प्रमाणात होणार असून अत्याधुनिक स्वयंचलित यंत्रणेतील रोबो तंत्रज्ञानाच्या वापराने येत्या 10 वर्षांत जगा बरोबर प्रत्येकाचे जगणेही बदलेल असे मत अमेरिकेचे एनरजिड टेक्नोलॉजीचे मुख्य तांत्रिक अधिकारी जेम्स इंग्लिश यांनी व्यक्त केले.

अ.नगर विद्यालयात संगणक विभागाच्या विदयार्थ्यांसाठी रोबोटिक्स या विषयावर डॉ.जेम्स इंग्लिश यांचे व्याख्यान झाले. यावेळी ते बोलत होते. यावेळी ते म्हणाले की रोबो हे संगणकाच्या सीपीयू सारखे हार्डवेअर असून संगणक प्रणालीच्या वापराने आपण विविध भाषेत त्याला सूचना देवून अचूक कार्य करून घेऊ शकतो. सध्या अनेक कंपन्यांत, विमानात रोबो प्रणाली कार्यरत असून स्वयंचलित वाहनेही रोबो तंत्रज्ञानावर आधारित आहेत. यासाठी कॅमेरा, लेझर किरण तंत्रज्ञानाचा वापर करून अचूक व गुणवत्ताधारक कार्य पार पडते.

रोबोची संकल्पना, रोबो काय आहे, कसे बनतात, कोणकोणते प्रोग्रॅम वापरतात याविषयी त्यांनी स्लाईड शोच्या माध्यमातून सखोल माहिती दिली . वैद्यकीय व कृषी क्षेत्रात रोबो वापराने कमी मनुष्यबळात उत्तम निष्कर्ष मिळाले आहेत त्यामुळे या क्षेत्रात प्रचंड वेगाने प्रगती झाली आहे. यावेळी त्यांनी विदयार्थ्यांच्या रोबो विषयी असलेल्या शंका, प्रश्नांचे निरसन त्यांनी केले व या क्षेत्राकडे विध्यार्थ्यांनी जास्त लक्ष देण्याचे आवाहन केले.

अ.नगर महाविद्यालयातर्फे प्राचार्य डॉ.आर.जे.बार्नबस, अकॅडमिक कॉओर्डीनेटर डॉ.एस.बी.अय्यर यांनी डॉ.जेम्स इंग्लिश यांचे स्वागत व सत्कार केला. यावेळी डॉ.शमा बार्नबस, संगणक विभाग प्रमुख डॉ.सय्यद रज्जाक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते.

डॉ. जेम्स इंग्लिश परड्यू विदयापिठाचे पीएचडी धारक तसेच इलेक्ट्रॉनिक इंजिनियर आहेत. एरोस्पेस अभियांत्रिकी विभागात सोफ्टवेअर डेव्हलपर म्हणून त्यांनी काम केले आहे.रोबोटिक्स या विषयावर विविध नियतकालिकांत, संमेलनात त्यांचे लेख प्रकाशित झाले आहेत. सध्या ते केम्ब्रिज अमेरिका येथे एनरजिड टेक्नोलॉजी या स्वतःच्या कंपनीत मुख्य तांत्रिक अधिकारी म्हणून कार्यरत आहेत. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संगणक विभागातील विदयार्थिनी स्वाती श्रीरामने केले. अतिथींचा परिचय आलिया सय्यदने करून दिला तर आभार अक्षय विजयकुमार यांनी मानले.

LEAVE A REPLY

*