रेशन दुकानदार ‘व्यावसायिक प्रतिनिधी’ ; जिल्हाधिकारी कार्यालयातील बैठकीत बँक अधिकार्‍यांकडून मार्गदर्शन

0

नाशिक : रेशन दुकानदारांना आर्थिक स्थैर्य मिळावे यासाठी बँकांचे व्यावसायिक प्रतिनिधी (बिझनेस करस्पाँडस्) म्हणून काम करण्याची संधी केंद्र सरकार उपलब्ध करून देणार आहे. रेशन दुकानदारांना व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करताना बँकेच्या ठेवी गोळा करणे, कर्जदार शोधणे व कर्जवसुलीचे काम मिळणार असून या कामाबद्दल त्यांना मानधन मिळणार आहे. या योजनेच्या अंमलबजावणीसाठी जिल्हा प्रशासनाने तयारी सुरू केली आहे. आज यासंदर्भात जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत बँक अधिकार्‍यांनी याबाबतची माहिती रेशन दुकानदारांना दिली.

केंद्र सरकारने 8 नोव्हेंबर 2016 रोजी रेशन दुकान व रॉकेल विक्रेत्यांना व्यावसायिक प्रतिनिधीसंदर्भात जिल्हा प्रशासनाला आदेश दिले आहेत. ही योजना राबवण्यासाठी जिल्हास्तरीय अंमलबजावणी समिती स्थापन करण्याबाबत सूचनाही केली आहे. त्यानुसार जिल्हाधिकार्‍यांच्या अध्यक्षतेखाली ही समिती नियुक्त करण्यात आली आहे. या समितीत जिल्हा अग्रणी बँकेचे प्रबंधक, जिल्हास्तरीय राष्ट्रीय सूचना केंद्राचे प्रतिनिधी (एनआयसी), जिल्ह्यातील बँकांचे प्रादेशिक प्रमुख, जिल्हा पुरवठा अधिकारी, मायक्रो एटीएम तंत्रज्ञान पुरवणार्‍या कंपनीच्या प्रतिनिधींची समिती कार्यरत झाली आहे. रेशन दुकानदारांना आर्थिक लाभ व्हावा व बँकिंग व्यवस्था बळकट व्हावी यासाठी केंद्र सरकारने रेशन दुकानदारांना व्यावसायिक प्रतिनिधी तयार करण्याची सुरुवात केली आहे.

या प्रक्रियेसाठी इच्छुक रेशन दुकानदारांकडून संमतीपत्र घेतले जाणार आहे. त्यानंतर या रेशन दुकानांची जबाबदारी बँकांना देण्यात येणार आहे. रास्त भाव दुकानात व्यावसायिक प्रतिनिधी म्हणून काम करताना महिन्यातून कमीत कमी 20 दिवस सेवा देणे अनिवार्य राहणार असल्याचे यावेळी सांगण्यात आले. शासनाने यासाठी काही बँकांसोबत करार केला आहे. नाशिक जिल्ह्यासाठी अ‍ॅक्सिस बँक, येस बँक, सारस्वत बँँकेची नियुक्ती करण्यात आली आहे.

नाशिक शहरात सुमारे 200 रेशन दुकाने आहेत. तर जिल्ह्यात 2600 रेशन दुकानदार आहेत. या व्यासायातून दुकानदारांना चांगले उत्पन्नही मिळू शकते, असे यावेळी सांगण्यात आले. अधिकाधिक रेशन दुकानदारांनी या योजनेत सहभागी होऊन बँकिंग व्यवस्था बळकट करण्याबरोबरच आर्थिक उत्पन्नाचे स्त्रोतही वाढवण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले. यावेळी रेशन दुकानदारांनी काही शंका उपस्थित केल्या.

यामध्ये रेशन दुकानदाराने कॅश उपलब्ध करून दिल्यास त्यास सुरक्षेच्या उपायोजना, पीओएस मशीन बँका पुरवणार की रेशन दुकानदारांना खरेदी करावे लागणार, सर्व्हरसंदर्भात येणार्‍या अडचणी कोण सोडवणार, असे अनेक प्रश्न उपस्थित करण्यात आले. यासंदर्भात संघटनेच्या बैठकीत चर्चा करून निर्णय घेण्याचे यावेळी सांगण्यात आले. अधिकाधिक रेशन दुकानदारांनी यात सहभागी होण्याचे आवाहन जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. यांनी केले. यावेळी जिल्हा पुरवठा अधिकारी सरिता नरके, रेशन दुकानदार संघटनेचे निवृत्ती कापसे, सलीम पटेल, गणपत डोळसे पाटील, निसार शेख, मारुती बनसोडे, जितू पाटील, दिलीप मोरे आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

*