रेशन दुकानदारांना पॉस मशीनवर मार्जिन; दुकानदारांचा विरोध; राज्य कार्यकारिणीत ठरणार आंदोलनाची दिशा

0
नाशिक । रेशन दुकानदारांच्या कमिशनमध्ये वाढ करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून रेशन दुकानदार संघटनेकडून करण्यात येत होती. त्यानुसार शासनाने ही मागणी मान्य करत आता पूर्वीच्या प्रतिक्विंटल 70 रुपये कमिशनमध्ये 80 रुपये वाढ करण्यात येऊन 150 रुपये प्रतिक्विंटल कमिशन देण्याचे मान्य केले आहे.

मात्र ही वाढ देताना पॉस मशीनद्वारे होणार्‍या व्यवहारांवरच वाढीव कमिशन देण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. या निर्णयाला रेशन दुकानदार संघटनेने विरोध दर्शवला असून याबाबत 17 सप्टेंबर रोजी होणार्‍या राज्य कार्यकारिणीच्या बैठकीत चर्चा करण्यात येऊन निर्णय घेण्यात येणार आहे.

धान्य वितरणासाठी कमिशनमध्ये वाढ करून द्यावी यासह इतर मागण्यांसाठी रेशन दुकानदार संघटनेने बेमुदत संप पुकारला होता. व्यवसाय कर, दुकानातील कर्मचार्‍यास अनुज्ञेय असलेली कमीत कमी मजुरी, सक्षम प्राधिकार्‍यांकडून आकारण्यात येणारे अनुज्ञेय शुल्क, परवाना नूतनीकरण शुल्क, विद्युत देयके, नोंदणी शुल्क आदी बाबींवर होणार्‍या खर्चात वाढ झाल्याने मार्जिनमध्ये वाढ करण्याची विनंती संघटनेने शासनास केली होती.

यावेळी कमिशनमध्ये वाढ करण्याचे आश्वासन शासनाच्या वतीने देण्यात आले होते. ही मागणी मान्य करत शासनाने दुकानदारांना देण्यात येणार्‍या प्रतिक्विंटल 70 रुपये कमिशनमध्ये वाढ करत 150 रुपये केले. परंतु वाढीव कमिशनला मान्यता देताना पॉस मशीन अर्थात पॉईंट ऑफ सेल मशीनद्वारे होणार्‍या वितरणावरच ही वाढीव कमिशन देण्याची अट शासनाने घातली आहे.

त्यामुळे जे दुकानदार पॉस मशीनद्वारे धान्य वितरण करणार नाही त्यांना जुन्याच दराने म्हणजे 70 रुपये प्रतिक्विंटलप्रमाणे कमिशन देण्यात येणार आहे. राज्यभरात स्वस्त अन्नधान्य वितरणामध्ये पारदर्शकता येण्यासाठी ‘इलेक्ट्रॉनिक पॉईंट ऑफ सेल अर्थात इ-पॉस मशीन’ बसवण्याचा धोरणात्मक निर्णय राज्य सरकारकडून घेण्यात आला. नाशिक जिल्ह्यात 2600 दुकानांमध्ये पॉस मशीन बसवण्यात आले आहे. मात्र शासनाच्या या निर्णयास रेशन दुकानदार संघटनेने विरोध दर्शवला आहे.

LEAVE A REPLY

*