रेल्वे सर्व्हेचे गौडबंगाल

0

बेलापूर-परळी मार्गाचे वेगवेगळे अभिप्राय

रितेश भंडारी @ कुकाणा :

कुकाणा (प्रतिनिधी)- बेलापूर – परळी रेल्वेमार्ग न परवडणारा सर्व्हे रिपोर्ट फेब्रुवारी 2017 मध्ये रेल्वे खात्याकडून देण्यात आला आहे. मात्र या मार्गाचे सर्व्हेक्षणाचे काम प्रगतीपथावर असल्याचे पत्र मुंबईच्या रेल्वे कार्यालयातून बेलापूर-परळी रेल्वे प्रवासी सेवा संस्थेला माहिती अधिकारात दिले. या सर्व प्रकारावरुन रेल्वे प्रशासनाचा ‘अंदाधुंदी’ कारभार त्यांच्याच अधिकार्‍यांनी चव्हाट्यावर आणला आहे.

याबाबत माहिती अशी की, गेल्या 8-10 वर्षापासून सेवा संस्था खा.दिलीप गांधी व माजी खासदार भाऊसाहेब वाकचौरे यांचे मार्फत वरील मार्गाच्या पूर्णत्वासाठी पाठपुरावा करीत आहे. 2012 मध्ये तत्कालीन रेल्वेमंत्री के.एच.मुनीअप्पा यांनी मंजुरीचे टोकण दिले. 2012 पासून 2017 पर्यंत या मार्गाच्या सर्व्हेक्षणासाठी जवळपास 3 कोटी रुपयांची तरतुद करण्यात आली. परंतु हा सर्व्हे बेलापूर-नेवासा-शेवगाव-गेवराई – बीड-परळी असा होणे अपेक्षीत असताना हा सर्व्हे शेवगावपासून गेवराई मार्गे न करता पाथर्डीमार्गे करण्यात आला. पाथर्डीपासून पुढे डोंगराळ भाग असल्याने हा मार्ग न परवडणारा सर्व्हे रिपोर्ट या अधिकार्‍यांनी दिला. या रिपोर्टमध्ये या मार्गाचे अंतर 167 कि.मी. दिले आहे.
नुकतेच सेवा संस्थेला रेल्वेच्या मुंबई कार्यालयातून मिळालेल्या पत्रामध्ये श्रीरामपूर-नेवासा-शेवगाव-गेवराई-परळी या मार्गाचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगण्यात आले आहे. एकीकडे हा मार्ग डोंगराळ भागातून जात असल्याने न परवडणारा सर्व्हे रिपोर्ट याच अधिकार्‍यांनी दिला. या रिपोर्टमध्ये या मार्गाचे अंतर 167 कि.मी. दाखवले. दुसरीकडे याच अधिकार्‍यांनी या मार्गाचे काम प्रगतीपथावर असल्याचे सांगून या मार्गाचे अंतर 230 कि.मी. दाखविले आहे. या वरुन या अधिकार्‍यांचे व रेल्वे खात्याचे काम किती बेजबाबदारीने चालते हे स्पष्ट होत आहे. रेल्वे खात्याकडून बेलापूर-परळीसाठी दोन वेगवेगळ्या मार्गाने सर्व्हे चालू आहेत की बेलापूर- बीड 167 कि.मी. व बेलापूर – परळी 230 कि.मी. असे दोन वेगळे मार्ग तयार करण्याच्या हालचाली सुरु आहेत. हा एक संशोधनाचा भाग बनला आहे हा मार्ग शिर्डी व नगर दक्षिण या दोन्ही मतदार संघातून जातो घडलेला प्रकार दोन्ही मतदार संघातील आजी-माजी खासदारांना माहित नसल्याने तेही हा प्रकार समजल्यानंतर
गोंधळून गेलेले दिसत आहे. परळीसाठी ब्रिटीशांनी 1922 ला मंजूरी दिली होती. जमिनीचे अधिग्रहण करून भरावही टाकण्यात आला होता. वास्ताविक पाहता या मार्गाचे सर्व्हेक्षण अगोदर होणे अपेक्षित असताना हा नवीन मार्ग कोणी सुचवला तसेच कोणाच्या सांगण्यावरून या मार्गाचे (पाथर्डीमार्गे) सर्व्हेक्षण एवढ्या तातडीने करण्यात आले? या घडलेल्या गोंधळाबाबत दोन्ही मतदार संघातील खासदार अनभिज्ञ कसे राहिले यावरून यांचे मतदान संघातील प्रश्‍नांकडे असलेले दुर्लक्ष समजावे की, सत्ताधारी असूनही वजन वापरण्यात कमी पडत आहे हे न उलगडणारे कोडे आहे. या सर्व चक्रव्युहामागील शुक्राचार्य कोण? असा सवाल जनतेतून विचारला जात आहे.

सर्व्हे रिपोर्ट न परवडणारा तसेच दुसर्‍या पत्रात सर्व्हेक्षणाचे काम प्रगतीपथावर एकीकडे या मार्गाचे अंतर 167 कि.मी तर दुसरीकडे 230 कि.मी यात काय गोंधळ आहे याची तातडीने चौकशी करणार आहे.
– खा. दिलीप गांधी

LEAVE A REPLY

*