Type to search

ब्लॉग

रॅगिंगविरुद्ध बहुविध उपायांची गरज!

Share

महाराष्ट्र सरकारने वीस वर्षांपूर्वीच रॅगिंगविरोधी कायदा केला आहे. तरीही रॅगिंगच्या घटना घडत आहेत. मुंबईतील एका डॉक्टर विद्यार्थिनीच्या आत्महत्येने अनेक प्रश्न उपस्थित केले आहेत. विद्यार्थ्यांशी संवाद वाढवणे, अशा तक्रारींची दखल घेण्याबरोबरच अन्यही काही उपाय करायला हवेत.

रॅगिंगमुळे मुंबईतील एका डॉक्टर विद्यार्थिनीने आत्महत्या केल्याची घटना धक्कादायक आणि चिंताजनक आहे. अशा घटना होऊ नयेत यासाठी विद्यार्थ्यांशी संवाद साधण्याबरोबरच पीडित विद्यार्थ्यांच्या तक्रारींची वेळीच आणि गांभीर्याने दखल घेतली पाहिजे.

मुंबईतील नायर मेडिकल कॉलेजमधील डॉ. पायल तडवी या जळगावच्या आदिवासी डॉक्टर विद्यार्थिनीने तिच्याबरोबर असणार्‍या अन्य डॉक्टर विद्यार्थिनी व तिला शिकवणार्‍या एका डॉक्टर शिक्षिकेने दिलेल्या त्रासाला कंटाळून आत्महत्या केली अशी तक्रार तिच्या आईने केली आहे. या विद्यार्थिनीची आई मुलीला होणार्‍या त्रासाबाबत तक्रार करण्यासाठी नायर रुग्णालयाच्या अधिष्ठात्यांना भेटण्यास गेली असता तिला स्त्रीरोग विभागप्रमुखांकडे पाठवण्यात आले. त्या ठिकाणच्या विभागप्रमुखांनी इंग्रजीत काय सांगितले ते आपल्याला कळले नाही, असे पायलच्या आईचे म्हणणे आहे. या घटनेनंतर आत्महत्येला प्रवृत्त करणे, रॅगिंगविरुद्धचा कायदा, भारतीय दंडविधान, अनुसूचित जाती-जमाती अत्याचार प्रतिबंधक कायदा आणि माहिती तंत्रज्ञान कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करून या घटनेचा तपास करण्यात येत आहे.

रॅगिंगच्या घटनांविरुद्ध महाराष्ट्र सरकारने वीस वर्षांपूर्वी कायदा करूनही व रॅगिंगविरुद्ध समिती आणि अन्य उपाययोजना केलेल्या असतानाही रॅगिंगच्या घटना घडत असल्याचे दिसते. जेवढ्या घटना घडतात त्यातील अतिशय थोड्या घटनांबाबत वाच्यता होते व त्यातील फारच थोड्या घटनांमध्ये प्रत्यक्ष कारवाई होते. सर्वोच्च न्यायालयाने अशा घटनांविरुद्ध वारंवार निर्णय देऊनही आणि कडक कायदे असूनही या दुर्दैवी घटना थांबत नाहीत. या व्यवसायातील अनेकजण या ना त्या प्रकारे रॅगिंग होऊ नये असे म्हणत असले तरी त्याविरुद्ध मनापासून उपाय योजण्यास तयार नसतात. किंबहुना रॅगिंगचे बळी असलेल्यांपैकी काहीजण पुढे जाऊन नवीन विद्यार्थ्यांना रॅगिंग करताना आढळतात. आपल्या कुटुंबाची बेअब्रू होईल या भीतीपोटी आणि व्यवसायातील अन्य लोकांनी आपल्याला बहिष्कृत करू नये या भावनेने नवीन विद्यार्थी/विद्यार्थिनीही रॅगिंगविरुद्ध तक्रार करत नाहीत.

हे प्रकार टाळण्यासाठी नवीन शैक्षणिक सत्राच्या प्रारंभीच नव्या विद्यार्थ्यांचे स्वागत करून योग्य व अयोग्य गोष्टींची सर्वांना सुस्पष्ट कल्पना देणे आवश्यक आहे. त्यात रॅगिंग किंवा लैंगिक त्रास किंवा अनुसूचित जाती-जमातींच्या नावाखाली अत्याचार, जात व धर्माच्या नावाखाली त्रास देणे, हिणवणे हा कायदेशीर गुन्हा आहे आणि तो खपवून घेतला जाणार नाही, हे स्पष्ट करणे आवश्यक आहे. वसतिगृहामध्ये केवळ सीसीटीव्ही यंत्रणा लावून रॅगिंगच्या घटना थांबतील, अशी अपेक्षा करणे बरोबर नाही. त्यासाठी वसतिगृहप्रमुख, सल्लागार यांनी नवीन विद्यार्थ्यांशी वारंवार संपर्क साधून त्यांना होणार्‍या त्रासाबद्दल सहानुभूतीने चौकशी करणे व वागणे आवश्यक आहे. रॅगिंगविरुद्धच्या समितीने काही तक्रार आल्यास चौकशी करणे अशा प्रकारे मर्यादितरीत्या काम न करता संस्थेतील प्राध्यापक, वरिष्ठ विद्यार्थी आणि अन्य सर्व यांच्यासाठी वारंवार सभा, चर्चा, स्पर्धा आयोजित करून रॅगिंगच्या घटना होणार नाहीत असे वातावरण निर्माण करणे गरजेचे आहे. रॅगिंगचे बळी असणार्‍यांना सहाय्य करण्यासाठी सल्लागार नेमणे आवश्यक आहे. विविध प्रकारच्या पार्श्वभूमीमधून आलेल्या नवीन विद्यार्थ्यांना भाषा, राहणीमान याबद्दल त्यांची विविधता राखून इतरांबरोबर कसे काम करावे यासंबंधीचे मार्गदर्शन करणे आवश्यक आहे.

नवीन तंत्रज्ञानाचा वापर करून सरकारने रॅगिंगविरुद्ध ‘प’ बनवणे व त्यातून रॅगिंगविरुद्ध माहिती सर्व संबंधितांना देणे ही तातडीची आवश्यकता आहे. आजमितीस सर्वप्रथम डॉक्टर पायलच्या कुटुंबियांना भरीव आर्थिक मदत द्यायला हवी. अशा घटना पुन्हा घडणार नाहीत यासाठी सर्व संबंधितांनी जबाबदारीने पावले उचलण्याची आवश्यकता आहे.
(लेखक निवृत्त पोलीस महासंचालक आहेत.)
– प्रवीण दीक्षित

Tags:

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

*

error: Content is protected !!