रुस्तमजी शाळेच्या ओपन स्पेसप्रकरणी प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास मनपाकडून विलंब

0

जळगाव |  प्रतिनिधी :  मनपा मालकीचे ओपन स्पेस ताब्यात घेण्यासाठी प्रशासनाने रुस्तमजी शाळेला नोटीस बजावली होती. या नोटीसच्या विरोधात शाळा प्रशासनाने जिल्हा न्यायालयात याचिका फेटाळल्यानंतर औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली.

मात्र या याचिकेवर प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास महानगरपालिका विलंब करीत असल्याचे बोलले जात आहे. दरम्यान, याप्रकरणी तडजोड करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचीही चर्चा जोर धरु लागली आहे.

मनपा मालकीची सी.स. क्रं.४३७/१ व ४३८/२ ब ही जागा महापालिकेने रुस्तमजी शाळेला दिली आहे. ही जागा देतांना मनपाने करारनामा केला होता. करारनाम्यानुसार शाळेच्या वेळेनंतर ही जागा परिसरातील नागरिकांना वापर करु देणे बंधनकारक आहे. अशा अटी-शर्ती आहेत. परंतु शाळा व्यवस्थापनांनी बेकायदेशिरपणे जागेभोवती ८ फुटाची संरक्षण भिंत बांधून गेट देखील लावले आहे.

त्यामुळे नागरिकांना या जागेचा वापर करता येत नाही. याप्रकरणी नगरसेवक पृथ्वीराज सोनवणे यांच्यासह तिघांनी मनपाकडे तक्रारी केल्या होत्या. त्यानुसार तत्कालीन नगररचना सहाय्यक संचालक चंद्रकांत निकम यांच्याकडे सुनावणी झाली.

सुनावणीअंती जागा ताब्यात घेण्यासाठी रुस्तमजी शाळेला नोटीस बजावली होती. या नोटीसच्या विरोधात रुस्तमजी शाळेने जिल्हा न्यायालयात याचिका दाखल केली. याप्रकरणी कामकाज झाल्यानंतर जिल्हा न्यायालयाने रुस्तमजी शाळेची याचिका फेटाळली.

त्यानंतर रुस्तमजी शाळेने पुन्हा औरंगाबाद खंडपीठात याचिका दाखल केली आहे. परंतु या याचिकेवर मनपा प्रशासन प्रतिज्ञापत्र दाखल करण्यास विलंब करीत असल्याचे बोलले जात आहे. तसेच याप्रकरणात तडजोड करण्याचा प्रयत्न सुरु असल्याचीही चर्चा आहे. मनपा प्रशासन आता औरंगाबाद खंडपीठात प्रतिज्ञापत्र दाखल करेल का? याकडे लक्ष लागले आहे.

LEAVE A REPLY

*